काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे यांचा जन्म १८ मार्च १९२१ रोजी मध्य प्रदेशात छिंदवाडा येथे झाला.
नरेंदकुमार पी. ऊर्फ एनकेपी साळवे हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ते कट्टर समर्थक होते. नामांकित चार्टड अकाऊटंट म्हणून ही त्यांची ओळख होती. इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये त्यांनी पोलाद आणि ऊर्जा मंत्रिपद भूषवलं होतं. त्यांनी राजकारणाबरोबरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुराही समर्थपणे सांभाळली होती.
राजकारणाव्यतिरिक्त अभिजात शास्त्रीय संगीत, क्रिकेट, अर्थकारण, करप्रणाली, राज्यघटना, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी एकाच वेळी विविध भूमिका वठवल्या. विद्याथीर्दशेत स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागानंतर भारतीय राजकारणाचे केंदस्थान असलेल्या दिल्लीत ते तब्बल ३४ वषेर् खासदार होते. १९६७ ते १९७७ या काळात त्यांनी मध्य प्रदेशच्या बैतुल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत केले. त्यानंतर १९७८ ते २००२ पर्यंत सलग २४ वर्ष ते महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य होते. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या साळवेंचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून जागतिक करव्यवस्थेपर्यंत गाढा अभ्यास होता. भारत हा सर्वाधिक करवसुली करणारा देश आहे, असे त्यांचे मत होते. इन्कम टॅक्स व प्रॉपटी टॅक्स कमी झाले पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिदीर्त साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशींनुसार, १९७५ साली भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले.
प्रदीर्घ संसदीय कारकिदीर्त साळवेंनी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदासह विविध संसदीय समित्यांवर काम केले. १९८०-८२ व १९८५-९० या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते होते. इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी, उर्जा, पोलाद आदी खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या कारकिदीर्तच ऊर्जा क्षेत्रात खासगी सहभागास सुरुवात झाली.
साळवे १९८२ ते १९८५ या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते. याच काळात १९८३ मध्ये भारताने प्रथम विश्वचषक जिंकला. त्यांच्याच प्रयत्नाने १९८७ मध्ये विश्वचषक स्पर्धा भारत-पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती.
क्रिकेटमधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन १९८८-८९ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीचे नामकरण एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी असे करण्यात आले. एन.के.पी.साळवे यांच्या नागपूर आणि दिल्लीतील निवासस्थानी मातब्बर कलाकार, खेळाडूंचा कायम राबता असे. अभिजात संगीताच्या अनेक मैफली त्यांच्या दिवाणखान्यात रंगत. शास्त्रीय संगीतातील क्वचितच एखादा कलावंत असेल ज्याने साळवेंच्या मैफलीत सूर छेडले नाहीत. कॉलेजवयापासूनच एनकेपींना क्रिकेटचे वेड होते. कसोटी सामन्यातील अंपायरपासून बीसीसीआय अध्यक्षपदापर्यंत अनेक भूमिका त्यांनी वठवल्या.
त्यांना मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि सिंधी भाषा उत्तम अवगत होत्या. त्यांच्या पत्नी निष्णात प्रसुतीरोगतज्ज्ञ होत्या. त्या जन्माने सिंधी होत्या. साळवे कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाने आंतरजातीय विवाह केला.
एन.के.पी.साळवे यांचं १ एप्रिल २०१२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply