रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल गेल्या वर्षी अखेर इतिहास जमा झाला. द्रुतगती मार्गाला अडथळा ठरणार्यां पुलाच्या चारही खांबांना एकाचवेळी ब्लास्टिंग करुन ५ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोट करुन हा पुल जमिनदोस्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टिमने हे काम फत्ते केले. सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांना सुरुंगाची दारु भरण्याकरिता होल करण्याचे काम सुरु होते. साधारण प्रत्येक खांबाला पायाजवळ ४५ भोके पाडण्यात आली होती. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.
ऐतिहासिक अमृतांजन पूलाचा इतिहास.
इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला. त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली. सोबतच्या चित्रात दिसत असलेली हीच कोनशिला पुढे ३० वर्षांनी रेल्वेवरील पूल बांधताना त्याच खिंडीत, पण पुलाखालच्या कमानीत बसवण्यात आली. त्यावरील मजकूर अगदी स्पष्ट दिसतो. पुणे जिल्हा आणि तत्कालिन कुलाबा जिल्हा यांची हद्द ठरलेली ही खिंड १८३० पासून अस्तित्वात आली. रस्ताही १८३० पासून खुला झाला. मात्र हा पूल १८५७ ते १८५९ या काळात रेल्वेच्या रिव्हर्सिंग स्टेशनसाठी बांधण्यात आला. त्यासाठी मूळ खिंडीतील रस्ता रुंद करुन तिथे पुलासाठी भल्यामोठ्या कमानी बांधाव्या लागल्या. त्यातील मध्यवर्ती कमानीत बसवलेली ही कोनशिला काल पर्यंत दिसत असे. याच कमानीवर पुढे अमृतांजन कंपनीने १९२५-३० च्या दरम्यान लोखंडी अक्षरांतील अमृतांजन अक्षरांचा भलामोठा जाहिरातीचा सांगाडा पुलाच्या दोन्ही बाजूस लावून अमृतांजन बामची जाहिरात केली होती आणि तेव्हापासून तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जात होता.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply