पं. राम देशपांडे यांचा जन्म ७ एप्रिल १९६८ रोजी झाला.
पं. राम देशपांडे हे आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक आहेत. पं.डॉ.राम देशपांडे यांच्या या संगीतमय कारकिर्दीला ३० हून अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत. श्री. चेपे, श्री.पानके आणि पंडित प्रभाकर देशकर यांच्यामुळे राम देशपांड्यांना संगीतात रुची निर्माण झाली. राम देशपांडे यांनी नागपूर विद्यापीठात संगीत हा विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतली आणि त्यानंतर ‘मिश्र राग’ हा या विषयात पी.एच.डी घेतली. पं.वि.रा. आठवले हे त्यांचे पी.एच.डी चे मार्गदर्शक होते.त्यानंतर पंडित यशवंतबुवा जोशी आणि उल्हास कशाळकर यांच्याकडून प्रशिक्षण घेत राम देशपांडे यांनी ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांची गायकी संपादन केली. त्याशिवाय त्यांनी पं.बबनराव हळदणकर यांच्याकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली आणि पंडित यशवंतराव महाल्यांकडून भातखंडे परंपरेचे ज्ञान मिळवले.
गमक, बेहलाव आणि मींड या गायनाच्या अंगांवर डॉ.राम देशपांडे यांची हुकूमत आहे. त्यांच्या लयकारी आणि ताना यांबद्दल ते रसिकांत लोकप्रिय आहेत. प्रचलित आणि अनवट रागांचा डॉ.राम देशपांडे यांचा खास अभ्यास आहे. डॉ.राम देशपांडे यांच्या पत्नी अर्चना देशपांडे या पण शास्त्रीय गायिका आहेत. पं.डॉ.राम देशपांडे यांनी आजवर अनेक विद्यार्थांना विद्यादान दिलं आहे. त्यांचे शिष्यामध्ये स्वत: गंधार देशपांडे, व आदित्य मोडक, देबोज्योती बिस्वास, अक्षर वैरागी, सिद्धार्थ गोडांबे, मयूर कोळेकर, अक्षय भुस्कुटे, कौस्तुभ आपटे, स्वप्नील चाफेकर यांचा समावेश आहे.
डॉ.राम देशपांडे यांचे चिरंजीव गंधार देशपांडे गायक असून गंधार देशपांडे यांना ‘पं.निवृत्तीबुवा सरनाईक युवा पुरस्कार’ मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply