भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात.
मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व आहे. ही गाडी १७०० कि.मी.चं अंतर ४६ तासांत आपल्या धीम्या गतीनं पार करते. या मार्गावरील सर्वांत महत्त्वाचं धार्मिक स्थान हरिद्वार. त्यामुळे या गाडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गाडी दिवसा पॅसेंजर आणि रात्री एक्सप्रेस असते. या गाडीच्या प्रवासात जितकी विविधता अनुभवता येते, तेवढी अन्यत्र कुठेच अनुभवता येत नाही.
जुन्या दिल्ली स्टेशनवर ही गाडी चांगली तासभर थांबते, प्लॅटफॉर्मवर मोठ्या कढईत गरमागरम तळल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या व बरोबर झमझमित बटाट्याचा रस्सा! आरामात उभं राहून खात बसावं. गाडी सुटण्याची घाई नसतेच. एकदा मी एकटाच प्रवास करत होतो. गाडीकडे पाठ करून आरामात मस्तपणे पुरी रश्श्याचा फडशा पाडत होतो, आणि मागे वळून पाहतो तो डेहराडून गाडी नाहीशी झालेली व रुळांवर कोणतीच गाडी नव्हती. ते रिकामे रूळ पाहून माझी गाळणच उडाली. कावराबावरा झालो. सर्व सामान आणि तिकिटं गाडीतच. खाण्यापायी गाडी घालविली. मी पुढे पळण्यास सुरुवात करणार, तोच पुरी तळणारा माणूस देवदूतासारखा शांतपणे म्हणाला, ‘घबराना नही, साहब. यहाँके प्लॅटफॉर्म इतनेऽ लंबे होते है! आपका डब्बा आगे खडा है। आप आरामसे नाश्ता कर लेना।’ जिवात जीव आला, पुढे बरंच अंतर चालत गेल्यावर माझा प्रिय डबा माझ्या प्रतीक्षेत उभा होता, संपूर्ण डब्यात मी एकमेव प्रवासी होतो. असा आनंद क्वचितच आणि तोही बहुधा डेहराडून गाडीच देत असेल.
दिल्ली सुटल्यावर मेरठ जवळच्या एका लहान स्टेशनवर अनेक दूधवाले आपले मोठाले कडीवाले अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन उभे असायचे आणि या नंतरचं दृश्य तर अफलातून दिसायचं. डब्याच्या दोन्ही बाजूंनी विजेच्या दिव्यांच्या माळा लावाव्या तसे दिसणारे खिडकीच्या बाहेर लटकणारे सर्व कॅन आणि दूधवाले ‘आत’ आरामात बसलेले! याचा उत्तम फोटो एकदा नॅशनल जिओग्रॉफिक मासिकात आलेला होता. या मार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन स्टेशन आहे सहाणपूर. येथे गाडी एका बाजूनं आत शिरते व बाहेर पडताना इंजिन विरुद्ध बाजूस लागतं, त्यामुळे गाडी दुसऱ्या मार्गाने बाहेर पडते. प्रथम प्रवास करताना मी चक्रावूनच गेलो. असाच प्रकार पुढे गजरोला स्टेशनशी होतो. ह्याचं कारण, गंगा नदीच्या अनेक उपप्रवाहांनी इथली जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे तो भुसभुशीत परिसर टाळून हे रेल्वेमार्ग भक्कम जमिनीवरून टाकलेले आहेत. ही गाडी या भागात आपल्या लोकलसारखी असल्यामुळे मधून मधून अनेक प्रवाशांची चढ-उतार चालू असते. त्यांची गडबड व डब्याभोवती कचो-या, ब्रेड, भजी, विकणारे विक्रेते. या सर्व माहौलाला एक लय आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंचा प्रदेश हिरवागार गहू, तांदूळ, कडधान्य यांनी सजलेला असतो. शेती, ऊसाचे मळे, ट्रॅक्टर्स, गाई-बैल, विटांची छोटी घरं, मध्येच पाण्याचे छोटे प्रवाह, या सर्वांतून या भागाची नैसर्गिक सुबत्ता प्रतीत होते.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply