लंकाधिपती रावणाचा पराभव केल्यानंतर रामाने शिवलिंगाची पूजा जिथे केली, ती जागा म्हणजे रामेश्वरम्. रामनाथस्वामी मंदिर, बारा ज्योर्तिलिंगांतील पवित्र स्थान. गंगोत्री, वाराणसी, रामेश्वर या पवित्र त्रिस्थळी यात्रा केल्यावर महापुण्य लागतं. त्यामुळे हजारो यात्रेकरूंचे जथेच्या जथे रामेश्वरला भेट देत असतात.
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्यावर भारतभूमीपासून ५० चौरस कि.मी. परिसर असलेला बेटांचा समूह म्हणजे रामेश्वर व धनुष्यकोडी. ही ठिकाणं मन्नारच्या आखातात पसरलेली आहेत. या बेटांचं शेवटचं टोक श्रीलंकेपासून १९ कि.मी. अंतरावर आहे. याच जागी हनुमानाच्या मदतीनं रामाने सेतू बांधून लंकेत पदार्पण केलं होतं असे दाखले दिले जातात. रामेश्वर हे मुख्य बेट समुद्रावरील पम्बन रेल्वे पुलानं व अन्नाई इंदिरा गांधी मोटररस्त्याच्या पुलानं भारताशी जोडलेलं आहे.
मदुराई रामेश्वर प्रवास टॅक्सीनं व चार-पदरी पुलावरील रस्त्यानं होतो. हा प्रवास करताना डोळ्यांचं पारणं शब्दश: फिटतं. पुलाच्या मध्यात आल्यावर मग खालच्या पातळीवरचा रेल्वे पूल म्हणजे किती अजस्र काम आहे हे लक्षात येतं; तर दोन्ही बाजूंनी अथांग पसरलेला महासागर, त्यांतून डुलत जाणाऱ्या शेकडो होड्या, मचवे, मोटरबोटी… असा हा संपूर्ण परिसरच एखाद्या पेंटिंगसारखा वाटतो.
हजारो वर्षे छोटे पडाव, शिडाची जहाजं, मचवे यांमधून लक्षावधी यात्रेकरू भारतातून या पुण्यभूमीत जात असत. हा प्रवास अतिशय खडतर होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय तीर्थक्षेत्रांना जाण्याकरता रेल्वेमार्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी १९११ सालात या महान समुद्ररेल्वेपुलाचं काम हजारो कामगार व अभियंत्यांच्या मदतीने चालू करत, १९१३ पर्यंत भारतातून थेट रामेश्वर, धनुष्यकोडीपर्यंत रेल्वेमार्ग सुरू करण्याचं अशक्यप्राय काम तडीस नेलं. प्रवासी धनुष्यकोडी येथून स्टीमर बोटीनं थेट लंकेच्या किनाऱ्यावरील तलैमनार स्टेशनपर्यंत जात असत. तिथून थेट कोलंबोपर्यंत रेल्वेनं जाता येत असे. साधारण १९५०-१९५५ सालापर्यंत ‘मद्रास-सिलोन एक्सप्रेस गाडी’ २४ तासांत रेल्वे-बोट-रेल्वे’ असा प्रवास घडवत असे. पुढे भारत-सिलोन संबंध सलोख्याचे न राहिल्याने हा मार्ग बंद झाला व गाडी फक्त धनुष्यकोडीपर्यंत धावू लागली.
१९६४ सालात मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यांना वादळाचा इतका जबरदस्त तडाखा बसला, की संपूर्ण गाव, रेल्वेमार्ग, रेल्वेस्टेशन वाहून गेलं. येथील वाळवंटात जीपनं प्रवास करताना ह्या सर्वांचे भग्नावशेष जागोजागी दिसतात आणि मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही.
पम्बन रेल्वेपुलाची लांबी २०६५ मीटर असून, त्याला १४६ स्पॅन आहेत. एकदम सरळ रेषेत असलेल्या या पुलाला मध्यात ६५ मीटरचा ‘लिफ्ट स्पॅन’ असून तो मध्यात उघडला जाऊ शकतो, त्यामुळे मोठाल्या स्टीमर बोटी दोन्ही समुद्र ओलांडू शकतात.
भर समुद्रात त्या काळात बांधलेला हा भारतातील एकमेव लांब पूल असून, त्यावर अनेक जागी अॅनोमीटर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुलाजवळून वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाची माहिती सतत मिळते. वाऱ्याचा वेग ५८ कि.मी.पेक्षा जास्त असेल, तर वादळ होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित केली जाते.
१९६४ सालातील वादळाच्या तडाख्यात पुलाच्या १२४ स्पॅनचं नुकसान झालं होतं. युद्ध पातळीवर काम करत रेल्वेने हा पूल दुरुस्त केला होता. या पुलाच्या तुटलेल्या कमानी समुद्रातून काढून पुन्हा मूळ जागी लावण्याचं महाकठीण काम टी. श्रीधरन या जगप्रसिद्ध भारतीय रेल्वे इंजिनिअरनं केलं आणि वाहतूक पूर्ववत केली. हे श्रीधरन पुढे मेट्रो मॅन श्रीधरन म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत. डिसेंबर २०१२ मध्ये नेव्हीच्या एका बोटीला खेचून नेणाऱ्या बार्जनं पुलाला धक्का दिल्यानं काही स्पॅनचं नुकसान झालं होतं.
हे रामेश्वर स्टेशनही अगदी अद्ययावत पद्धतीनं बांधलेलं आहे. स्टेशनला दोन लांब प्लॅटफॉर्मस आहेत, जिथून थेट वाराणसी, द्वारका, भुवनेश्वर, तिरुपती, चेन्नईपर्यंत जाणाऱ्या गाड्या सुटतात. मी एकदा पम्बम ब्रिजवरील प्रवासाचा आनंद लुटण्याकरता मुद्दामहून दिवसाउजेडी रामेश्वरहून तंजावरला जाणाऱ्या गाडीचं पम्बन रेल्वेपूल तिकीट काढलं होतं. गाडीत प्रवासी इतके थोडे होते, की संपूर्ण प्लॅटफॉर्म मोकळा दिसत होता. आमच्या संपूर्ण डब्यात इन मिन १० ते १२ प्रवासी. रामेश्वर नंतर १५ मिनिटांनी पम्बम स्टेशन आलं. आम्ही डब्याच्या दोन्ही दारांशी दर्शनाकरता सज्ज झालो. आमच्याबरोबर दक्षिणेकडचं एक जोडपंही ब्रिज पाहण्यास उत्सुकतेनं जय्यत तयारीत होतं.
पम्बन स्टेशन सुटलं आणि काही क्षणात अथांग पसरलेला महासागर जणू कापत गाडीचा प्रवास धिम्या गतीने सुरू झाला. मोठ्या नद्यांवरील रेल्वे पुलांना दोन्ही बाजूंनी त्रिकोणी आकाराचे अजस्र लोखंडी गर्डर्स असतात. त्यांमधून गाडी जाताना घुमणारा आवाज छातीचा ठोका चुकवतो, पण नदीच्या पात्राचं भव्य स्वरूप डब्यातून दिसत नाही; मात्र या ब्रिजच्या दोन्ही बाजूस काहीच नसल्याने आपण थेट फेसाळत येणाऱ्या समुद्राच्या लाटांवरून मार्ग आक्रमत असतो. त्या प्रत्येक कमानीवरून जाताना येणाऱ्या ‘धडक आवाजा’ची एक लय असते. दोन्ही बाजूंच्या समुद्राच्या रंगाच्या निळसर, हिरवट, काळपट छटा पाहताना डोळे सुखावतात. जसजशी गाडी भर समुद्राच्या मध्यात येते तसतशी लाटांची उंची व जोर वाढत जातो, कमानींवर जोरात आपटत आणि फेसाळत येणारे शुभ्र तुषार थेट गाडीच्या चाकांपर्यंत भिडण्याचा प्रयत्न करीत असतात. गाडी अतिशय संथगतीने जात असल्याने प्रवासाचा आनंद मनापासून लुटता येतो. दोन्ही बाजूंना समुद्रात थेट क्षितिजापर्यंत शेकडोंनी छोट्या-मोठ्या बोटी, पडाव, मचवे हेलकावे खात मार्गक्रमण करीत असतात, तर एका बाजूस दुप्पट उंचीवरील मोटारी जाणारा बदामी रंगाच्या कमानींचा अजस्र पूल समुद्राच्या निळ्या रंगावर अधिकच उठून दिसत असतो. मधल्या उचलल्या जाणाऱ्या स्पॅनवरून गाडी जाताना प्रचंड गडगडाटासारखा आवाज घुमतो आणि ही सारी दृश्यं आपसुकच डोळ्यांत व कॅमेऱ्यात टिपली जात राहतात. पुलावरचा हा प्रवास संपूच नये असं मनोमन वाटतं. हळूहळू समुद्र मागे पडतो. हिरव्यागार कुरणांची जमीन भराभर मागे पळते. बघता बघता ८ ते १० मिनिटांच्या अविस्मरणीय प्रवासाची सांगता होते.
१०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतीय कामगारांच्या मदतीने या अवघड कामाचं धनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. रामायणात वर्णन केलेल्या वानरसेनेच्या सेतुबंधनाची ही पुनरावृत्तीच म्हणता येईल.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply