अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेला हा लेख
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण. बालपण सुंदर असतं ही कविकल्पना वाटते. अर्थात सर्वांच्या दृष्टीने नव्हे तरीही अशी समजूत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बालपणाबद्दल लिहिणारे बाल नसतात, प्रौढ किंवा वयस्क असतात. त्यामुळे त्यावेळचं उड्या मारणं, डोंगर चढणं, हट्ट पुरवून घेणं… वगैरे गोड गोष्टी ज्यामध्ये काळजी, चिंता, फारसे कष्ट, जबाबदारी ही नसते. त्यामुळे बालपणानंतरच्या पुढच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात ते फारच आकर्षक आणि हवंहवंसं वाटायला लागतं. परंतु थोडं गंभीरपणे विचार केला आणि स्मृतीला ताण दिला तर आठवेल, तेव्हा म्हणजे लहान असताना मोठं व्हायची घाई झालेली असते. स्वतंत्र व्हायचं असतं, निर्णय घ्यायचे असतात. आपल्या मनासारखं वागायचं, जगायचं असतं. कारण त्या प्रत्येक गोष्टीवर कोणीतरी सत्ता गाजवित आहे असं वाटतं, मग प्रखर विरोध.
मध्यंतरी मला प्रसिद्ध चित्रकार पद्मश्री वासुदेव गायतोंडे यांच्यावरील संपादित एक पुस्तक वाचायला मिळालं. प्रतिभाशाली कलाकार फारच लहरी, गंभीर असतात. कोणाशी फार बोलत नाहीत, वगैरे अपसमज असतात. परंतु असं गंभीर वागण्याचं कारण कोणी शोधीत नाही. गायतोंड्यांचं बालपण अतिशय खडतर, हालअपेष्टा, अवहेलना सहन करीत त्यांनी आपली चित्रकला जोपासली. सगळ्या गरीब आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने श्रीमंत व्हावं, नाव कमवावं, मोठं व्हावं. त्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायला हवं. कलाकाराबद्दल मनात प्रतिष्ठाच नसते. गायक, चित्रकार, अभिनेता, खेळाडू व्हायचं म्हटलं तर त्या मुलाला त्यापासून दूर करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व मार्गांचा अवलंब केला जातो. मग आपल्याच माणसांबद्दल मनात प्रचंड राग ठेवून तो माणूस जिद्दीने पुढे जातो. अतिशय आत्ममग्न आणि प्रसिद्धीपराङ्गमुख अशी ही माणसं साधनारत होऊन इतक्या उंचावर पोहोचतात की तिथे गेल्यावर आपल्या कलाकृतीबद्दलचा मोहसुद्धा संपतो. सर्जनाचं महान वरदान लाभलेली ही माणसं त्यांच्या मनाचा वेध घेणं अशक्यच. कारण आपल्या भाव-भावना ही माणसं आपल्या कलाकृतीतून व्यक्त करतात.
खरं तर मालकांच्या मनात सत्ता गाजविणं नसतं तर आपल्या मुलाची वाटत असलेली ती काळजी, माया, ममता असते. परंतु इथेच मुलांना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होते व लवकर मोठं व्हायची घाई होते. पालक आपण केलेल्या चुका मुलांनी करू नये म्हणून चिंताग्रस्त असतात, तर मुलांना असं वाटतं, मला हे नाही आवडत. मला आवडतं ते करू दे. पालक मात्र बालपणीच त्यांचा भविष्यकाळ सुरक्षित करू पाहातात.
खरं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समाजातील परिवर्तन अनुभवाला येतात. म्हणजे पालकांच्या बालपणातील जगणं, जीवनशैली, आव्हान २५ वर्षानंतर त्यांच्या मुलाचं बालपण आणि त्यांच्या समोरील बदलत जाणारी राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि आव्हानं यांचा मेळ घालता यायला हवा. परंतु एकूण परिस्थितीचा रेटा, सतत चाललेली स्पर्धा, कुरघोडी यामुळे माणूस जगायचं विसरतो. सतत कुठलं तरी दडपण, ताण सहन करीत जगावं लागतं. मुलं फारच लवकर मोठी होतात. पटांगणावर हुतूतू, खोखो सारखे हार-जीत मजावणारे खेळ खेळायला न जाता अभ्यासाच्या टेबलाला चिकटून बसतात. आईवडिल मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून प्रयत्न करतात म्हणजे पालक आणि मुलं आपलं ध्येय गाठण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. यामध्ये कसल्या आठवणी आणि कसलं काय? परीक्षा झाल्यावर सगळं विसरत असतील आणि बालपण कधी संपलं आणि किशोरवयही संपल्याची जाणीव होते.
इतक्या अनंत अडचणी आणि आव्हानं असूनही कुठेतरी रेशमी स्मृतींचा स्पर्श असतोच जो वयाबरोबर नकळत येतो. त्यावेळी खरंच जबाबदारी नसते. अभावतही मन:पूत जगता येतं. तोपर्यंत बाहेरचं जग पाहिलेलं नसतं आणि तिथे जे असेल तेच सगळ्यात श्रेष्ठ असतं. त्या निरागसतेचा आनंदच वेगळा. अविस्मरणीय असतो.
मला आठवतं आहे लहानपणी आमचे आजोबा भूपाळी म्हणायचे आणि त्या भूपाळीने आम्ही जागे व्हायचो. ‘उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख, ऋद्धि-सिद्धीचा नायक, सुखदायक आम्हासी… याचवेळी गोठ्यात गाय आणि म्हैस हंबरू लागायच्या आणि त्यांची वासरं हाकेला ‘ओ’ दिल्यासारखी हंबरू लागायची. बागेत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा, देवीच्या देवळातील घंटानाद ऐकू यायचा. अशा विविध प्रकारच्या सुमधुर ध्वनि संयोजनात सकाळ उगवायची. या आवाजांमध्ये आणखी एक आवडणारा धीरगंभीर आवाज म्हणजे समुद्राची गाज. त्यावेळी आमच्या गावात संध्याकाळ इतकी शांत असायची की आमच्या अंगणात गाज ऐकू यायची. आम्ही आजोबांबरोबर अनेकदा सूर्यास्त बघायला जायचो. आजोबांना सूर्यास्ताप्रमाणे घड्याळ लावायचं असायचं. आम्ही मात्र समुद्राच्या लाटांचं एका लयीत उंचावून फेसाळत येणे आणि खळ्दिशी फुटून परत जाणं, इतका विस्तीर्ण, डोळ्यात न मावणारा जलाशय आणि समोर दिसणारं क्षितीज… प्रत्येक वेळी अद्भुत वाटायचं. या लाटा मला समुद्राच्या जिवंतपणाचं प्रतीक वाटतात. सतत एका मागून एक लाटांचा अखंड क्रम चालूच असतो. क्षितिजावर टेकलेला अस्ताला जाणारा सूर्य विलक्षण तेजस्वी दिसायचा. केशरी, सोनेरी, शेंदरी असा झळाळत असायचा. बघता बघता क्षणात सूर्यास्त व्हायचा. आजोबा म्हणायचे चला, अस्तानंतर पसरलेला संधिप्रकाश मन भारून टाकायचा. थंडगार वारा आणि पक्षांचं किलबिलाट करीत घरट्याकडे परतणं. खरंच एखादं चित्र जिवंत झालंय असं वाटायचं. त्या मंद प्रकाशात इतकं शांत, प्रसन्न वाटायचं की आम्ही गुपचूप घरी परत यायचो. मनातल्या मनात त्या गाजेची आवर्तनं चालू असायची आणि सूर्योदयाची आस असायची.
ते अविस्मरणीय, शांत, सुंदर क्षण, तो सूर्यास्त मनाच्या कोपऱ्यात अगदी सुरक्षित आहे. आता तिकडेही इतकी शांतता नाही आणि इथे तर नाहीच. म्हणूनच डोळे बंद केले की एका क्षणात मी समुद्राच्या वाळूत सूर्यास्त पाहत उभी असते.
-डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply