१९७१ सालातील गोष्ट आहे. त्यावेळी मी सहावीत होतो. हिंदी चित्रपट पहायला तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. शनिवार वाड्याजवळील ‘वसंत टाॅकीज’ला ‘कटी पतंग’ चित्रपट लागला होता. मी संध्याकाळच्या शोला गेलो. चित्रपट पाहिला. त्यातील सर्व गाणी, मला आधीच आवडलेली होती. राजेश खन्ना व आशा पारेख या दोघांच्या प्रेमामधील कारस्थानी कॅब्रे डान्सर शबनम उर्फ शब्बो, माझ्या डोक्यातच बसली. नंतर तिला मी अनेक चित्रपटांतून पाहिलं, मात्र शब्बोला मी आजपर्यंत विसरलेलो नाही..
१९७३ साली अमिताभचं करीयर बदलून टाकणारा ‘जंजीर’ प्रदर्शित झाला. त्यामध्ये व्हिलन तेजाच्या भूमिकेतील अजित सोबत असणारी ‘मोना डार्लिंग’ही अनेक वर्षे लक्षात राहिली..
शब्बो असो वा मोना डार्लिंग.. ती साकारणारी, बिंदू ही चित्रपटसृष्टी तब्बल चाळीस वर्षे गाजवणारी सहनायिका, खलनायिका व डान्सर आहे..
बिंदूचा जन्म झाला वलसाड येथे १७ एप्रिल १९५१ साली. तिचे वडील, नंदुभाई देसाई हे चित्रपट निर्माते होते. आई, ज्योत्स्ना ही अभिनेत्री होती. सहा भावंडांमध्ये बिंदू थोरली. ती अकरा वर्षांची असताना वडील गेले. तिला घर चालवण्यासाठी माॅडेलिंगचे काम करावे लागले. तेरा वर्षांची असतानाच ती मोठी दिसत होती. सहाजिकच तिला मोहनकुमार यांच्या ‘अनपढ’ चित्रपटात पहिली संधी मिळाली.
ती शाळेत जात होती तेव्हापासूनच जवळ रहाणाऱ्या चंपक जव्हेरीचं तिच्यावर प्रेम बसलं. तिने सुरुवातीला टाळाटाळ केली, नंतर मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं व सोळाव्या वर्षीच घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न केले. चंपकच्या घरच्यांनी त्याला वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केलं..
१९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ व ‘दो रास्ते’ चित्रपटानं, बिंदूला नावाजलं गेलं. मग तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येऊ लागल्या. १९७१ साली राजेश खन्नाच्या ‘दुष्मन’ चित्रपटात तिला एक कोठीवरचं गाणं दिलं होतं.. चित्रपट सुरु झाला की, पहिल्याच या गाण्यानं पब्लिक खुष होऊन जात असे. ते गाणं होतं, ‘वादा तेरा वादा…’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी बिंदू तापाने फणफणलेली होती.. तरीदेखील तिने हे गाणं, त्या अवस्थेत पूर्ण केलं..
१९७३ साली ‘धर्मा’ नावाचा एक डाकूपट प्रदर्शित झाला होता. त्यातील क्लायमॅक्सच्या प्रसंगी असलेली, प्राण व बिंदू यांच्यातील जुगलबंदीची कव्वाली फार गाजली होती. ‘राज की बात कहे दूं तो.. जाने मेहफिल में फिर क्या हो..’ या गाण्यामध्ये रेखाच्या जन्माचं रहस्य खलनायक अजितला, बिंदू कव्वालीतून जाहीर करणार असते.. प्राण तिला ते रहस्य सांगू नकोस, असं बजावत असतो.. हे गाणं ऐकण्याइतकंच, पहायला आजही हवंहवंसं वाटतं..
बिंदूने १९८५ सालापर्यंत अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातील ‘इम्तिहान’, ‘हवस’, ‘कामशास्त्र’ चित्रपटातील भूमिका व्हॅम्पीश होत्या. ‘अभिमान’, ‘अमरप्रेम’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका, दुसऱ्या टोकाच्या होत्या. ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटांतून तिने मावशी, आत्याच्या भूमिका केल्या. आजवर २०० हून अधिक चित्रपटात कामे करुन तिने आता चित्रसंन्यास घेतलेला आहे. तिच्या भूमिकांचं कौतुकही झालं, मात्र सात वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळूनही, तो पुरस्कार काही तिला मिळाला नाही..
तशी तिला पुरस्काराची गरजही नाहीये. चंपक जव्हेरीचे अनेक व्यवसाय आहेत, त्यातून ती आज अब्जाधीश आहे. त्या दोघांच्या मालकीचं मुंबईत स्टड फार्म आहे. पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कोलकता, म्हैसूर, उटी या ठिकाणी होणाऱ्या शर्यतीत त्यांचे घोडे धावतात. तिचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथे, आलिशान घर आहे.
चंपकला, वडिलोपार्जित संपत्तीतून जरी बेदखल केलेलं असलं तरी त्याच्या जीवनात ‘बिंदू’ आल्यापासून त्यानं संपत्तीचा ‘महासागर’ निर्माण केला.. आज या संपत्तीला वारस नाही, याचं तिला दुःख आहे.. तीस वर्षांपूर्वी तिला दिवस गेले होते, मात्र दुर्दैवाने ती आई होऊ शकली नाही.. आजही ती अनाथाश्रमांना आर्थिक मदत करुन त्या मुलांच्या सुखात, आनंद मानते..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-४-२२.
Leave a Reply