मित्रहो,
नमस्कार
क्रोध, राग, संताप, द्वेष, तिरस्कार, कुचेष्टा, निर्भत्सना, निंदा, मत्सर, अशा गोष्टी मानवी जीवनात अशांतता निर्माण करतात. मानवाला अस्वस्थ करतात. मानवाच्या विवेकबुद्धीला आव्हान देतात.
मानवी प्रकृती ही मूलतः पंचतत्वानी म्हणजे पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायु बनली आहे हे सर्वश्रुत आहे.
मानवी जीवनात सुखी जीवनासाठी चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगितले असून सात्विक परमोच्च सुखस्वास्थ्यासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, या सहा षडरिपुंचे निर्दालन केले पाहिजे असे म्हटले आहे. कारण हे षडरिपु जीवनात सदसद विवेकबुद्धिला घातक ठरतात.
त्यातून मानसिक संतुलन बिघड़ते. त्यातून अनेक दुष्परिणाम, असंतोष, जीवनात वाटयाला येतात. परस्पर प्रेम वात्सल्य, सहानुभूती, दया या मानवतेच्या जीवन मुल्यांचा ह्रास होतो. जीवनानंद हरवून जातो.
म्हणून जीवनात षडरिपुंवर ताबा मिळवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी संस्कारांचे संस्करण आवश्यक असते. आणि यासाठी आपल्या जीवनात आचार, विचार, आहार, सहवास, वाचन, मनन, चिंतन, आचरण विवेकी संयम या मुलभूत तात्विक सद्गुणांची नितांत गरज असते. हे मात्र खरं.!
जीवन जसं समजायला लागतं तेंव्हापासून आपल्या आयुष्यात अनेक भल्याबुऱ्या म्हणजे अनेक सुख दुखांच्या, चांगल्या, वाईट घटना घडत असतात. त्यांनाही आपण संयमाने सामोरं जाणं ही विवेकीबुद्धी आहे.
पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीतही सुपरिचित आहे.
मानवी जीवन हे पराधीन आहे
हा एक निष्कर्ष सर्वश्रुत आहे
पण मानवी जीवन हे महत्वाकांक्षी देखील आहे, त्याला आसक्ती, स्वार्थ, लालसा आहे. जे मनांत आहे ते प्राप्त करण्याची दुर्दम्य अशी ईछ्याशक्ती त्याच्याजवळ आहे. अनेक प्रलोभनांना तो बळीही पड़त असतो…अशा या साऱ्या गोष्टीतुन जे जीवन समोर सत्यवास्तव म्हणून उभं रहात.. त्याला आपण सर्वच प्रारब्ध, प्रारब्धभोग, संचित, पुण्यकर्म, पापकर्म, आशीर्वाद, भगवत्कृपा असे संबोधत असतो.
प्रत्येक माणसाला सर्वसुखाची लालसा असते. दुःख नको असते. जे मिळाले आहे, लाभले आहे त्यात माणूस संतुष्ट नसतो, त्याला अजूनही जे इच्छित आहे ते हवेच असते. ही असमाधानी वृत्ती त्याल्या स्वतःला विवेकापासून दूर नेते आणि मग अधर्मी, विकृती जन्माला येते मग षडरिपुंचा प्रभाव त्याच्या मनावर होतो. त्याला कुठल्याच परिणामाची चिंता उरत नाही. त्यातून क्रोधीत, द्वेष भावनां निर्माण होते व अनिष्टाला गती मिळते.
सर्व प्राचीन धर्मग्रन्थातुन, वाङ्गमयातुन अनेक कथामधून याचा दृष्टांत नेहमीच प्रत्ययास आलेला आहे..
क्रोधाने जग जिंकता येत नाही
परस्पर सामज्यस्य, नम्रता, तड़जोड याने जीवन सहज सुकर होते हे मात्र खरं!!
याबाबतची एक संक्षिप्त कथा पुढीलप्रमाणे…
एकदा सांदिपनी ऋषींच्या आश्रमातून ( गुरुकुलातुन ) भगवान श्रीकृष्ण, बलराम व सात्यिकी हे सुट्टीनिमित्त आपल्या घरी चालत निघालेले असतात. (त्यावेळी दळणवळणाची कुठलीच सोय नव्हती). संध्याकाळ होते,अंधार पडू लागतो, वाटेत दाट जंगल लागते त्यामुळे त्यांना मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. तेंव्हा ते तिघेही मुक्काम करण्याचे ठरवतात.
जंगलात एका मोठ्या वृक्षाखाली ते मुक्काम करतात. किर्ररात्र होते सात्यिकी घाबरतो कारण हिंस्र श्वापदांची तसेच चोर लुटारूंची भीती असते. तेंव्हा ते तिघेही एकएकाने पहारा करण्यासाठी जागायचे व दोघानी झोपायचे असे ठरवून एक एक प्रहर वाटून घेतात. पहिल्या प्रहरी सात्यकी पहारा करीत असतो आणि कृष्ण व बलराम झोपी जातात. अशावेळी पहिल्या प्रहरातच सात्यकी समोर त्या वृक्षावरील एक पिशाच्च्य येवून उभे रहाते व सात्यकीला तू माझ्याशी द्वंद कर, युद्ध कर अन्यथा शरणागती स्वीकार असे म्हणते. सात्यकी देखील युद्धनिपुण असतो. तो युद्धास सामोरा जातो. शरणागती पत्करत नाही. युद्ध सुरु होते. जसा जसा सात्यिकी त्वेषाने, क्रोधाने त्या पिशाच्च्याच्या अंगावर धावून जातो तसे तसे ते पिशाच्च्य मोठे, मोठे, आक्राळविक्राळ होत जाते. युद्ध सुरु रहाते. पण सात्यकीचा प्रहर संपतो. घडलेली घटना सात्यकी बलरामला सांगत नाही. दुसऱ्या प्रहरात बलराम पहाऱ्यास येतो. तोही पराक्रमी युद्धनिपुण असतो. त्याच्यासोबत देखील सात्यकी बरोबर जसे युद्ध होते तसेच युद्ध ते पिशाच्च्य करते. पिशाच्च्य मोठे होत जाते, तो तसाच अनुभव बलरामाला येतो. कुणीच पराभूत होत नाही. बलराम देखील या घड़लेल्या घटनेची वाच्यता करत नाही. सरते शेवटी तिसऱ्या प्रहरात भगवंत श्रीकृष्ण पहाऱ्यास येतात. त्यांनाही ते पिशाच्च्य माझ्याशी द्वंद ( युद्ध ) कर अन्यथा पराभव स्वीकार असे सांगते.
भगवान त्या वृक्षा शेजारील एका शीळेवर निवांत बसतात. फक्त स्मितहास्य करून त्या पिशाच्च्याकड़े पहात रहातात. त्या पिशाच्च्याला भगवंताच्या या तटस्थ भुमिकेचा प्रचंड राग येतो, मनांत तीव्र संताप, क्रोध निर्माण होतो. आणि ते पिशाच्च्य वारंवार श्रीकृष्णावर अगदी त्वेषाने धावून येते. तरी देखील कृष्ण अगदी शांत असतो, स्मितहास्य करीत असतो. तेंव्हा ज्या ज्या वेळी ते पिशाच्च्य त्वेषाने धावून येते त्या त्या वेळी ते पिशाच्च्य अगदी लहान होत जाते. शेवटी ते पिशाच्च्य थकून भागून अगदी सूक्ष्म, लहान होते. आणि अंती शरणागती स्वीकारते.
भगवंत त्या पिशाच्च्याला उचलून आपल्या शेल्यात बांधून ठेवतात. तीसरा प्रहर संपतो, सकाळ होते. अगदी शांत मुद्रेने त्या वृक्षापाशी येतात तेंव्हा श्रीकृष्णाला बलराम व सात्यकी विचारतात की हे वासुदेवा….
” तुला पिशाच्च्याबरोबर युद्ध करावे लागले कां? तू काय केलेस? ते हरले कां?
तेंव्हा श्रीकृष्ण त्यांना ते उपरण्यात छोटेसे पिशाच्च्य दाखवतात.
आणि सांगतात तुम्ही त्या पिशाच्च्या सोबत क्रोधित होवून द्वंद केले तेही तुमच्याशी तितक्याच क्रोधाने लढत राहिले. मी मात्र अत्यंत शांततेने क्रोध न करतां त्याच्याशी हसत राहिलो, तसे तसे त्याच्यातील क्रोधभावनां लयास गेली आणि अगदी दीनपणे माझ्या समोर उभे राहिले. त्यालाच मी माझ्या या उपरण्यात बांधले आहे. हे पहा..
बलराम, सात्यकी हे दोघेही पहात रहातात..
निष्कर्ष:- क्रोधाने विजय मिळवता येत नसतो. क्रोधाने मानसिक स्वास्थ्य हरवते.
इती लेखन सीमा.
वि.ग.सातपुते ( सहित्यिक )
संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, मुंबई, ठाणे, ( महाराष्ट्र )
9766544908
Leave a Reply