सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत. “ध्वनी ” एक ईश्वरी उर्जा ह्यामध्ये.
नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे – कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.
नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार. संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.
नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.
कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त” आनंद” हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद. आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.
एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.
ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप. ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन. ध्वनीला निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.
नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल. ” आनंद ” ज्याच्या अवती भवती असेल शांतता.
त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी *** १५
लग्नकार्यांत देण्या घेण्यावरुन रागवायच नसतं
शारिरीक, मानसिक, आर्थिक तणावाखाली
दुसरा किती दबलेला आहे ते समजायचं असत
Leave a Reply