अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये शिरीष जोशी यांनी लिहिलेला हा लेख
“मी जादू शिकतो.
तर मित्रांनो मी आता हे रॉकेल पाण्यात ओततो आणि पहा काय होते ते…” असे म्हणत मी एका काचेच्या ग्लासातील रॉकेल पाणी असलेल्या ग्लासात ओतले. ते तरंगायला लागले आणि मी अत्यानंदाने ओरडलो, “पहा, पहा… पाण्यावर पाणी तरंगत आहे; आहे की नाही जादूऽऽ जादू.
असे म्हणताच हास्याची एक लकेर फुटली. सगळे खो खो हसू लागले व त्यांनी माझी हुर्यो उडवली. मी भानावर आलो. चूक लक्षात आली. रॉकेलऐवजी पाणीच आहे असे सांगायचे होते. पण हातातून बाण सुटला होता. शब्द परत मागे घेता येत नाहीत.
तरीपण धीर धरून मग मी माझ्या साथीदाराला बोलावले आणि विचारले, “या ग्लासात काय आहे? नीट पाहून सांग.” तो म्हणाला, “रॉकेल. दुसरे काय?” मी कपाळावर हात मारला. त्याला मी ग्लासात पाणी आहे असे सांगावयास सांगितले होते.
आता मात्र माझी पंचाईत झाली. साथीदार फितूर झाला होता.
मी हिरमुसला होऊन माझ्या जागेवर जाऊन बसलो. साथीदाराने मग आमच्या मुख्याध्यापकांना समोर येऊन थांबायला सांगितले व विनंती केली की या रॉकेलचा त्यांनी स्वीकार करावा. आधीच्या अनुभवाने सावध झालेले ते (मुख्याध्यापक) नाइलाजाने तयार झाले. आणि त्याने बिनदिक्कतपणे ते रॉकेल त्यांच्या अंगावर फेकले. मी डोळे गच्च झाकले व मार खाण्यास मनाची तयारी केली. पण… पण टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. पाहतो तर काय… गुरुजींच्या अंगावर ग्लासातून चक्क पुष्पवृष्टी झाली होती. सर्वांनी त्याचे कौतुक केले.
तो जिंकला पण त्याने मला हरविले. ऐनवेळेस ग्लासांची अदलाबदल करून व माझ्या बाबतीत असहकार पुकारून त्याने माझ्या जादूतील हवाच काढून घेतली. त्या दिवसापासून तो जादूगार व मी फजितगार म्हणून ओळखले जाऊ लागलो. मी मात्र जादूचा नाद सोडला.
तर असे हे बालपण. कडुगोड अनुभवांनी, आठवणींनी आनंदाने, फजितीने व विस्मयाने भरलेले.
मळ्यातील फुले
एकदा काय झाले… मला माझ्या बाबांनी मळ्यातून फुले तोडून आणायला सांगितले. (त्या काळी ताजी फुले तोडून आणून देवाला वाहत. त्याला पैसे पडत नसत.) कारण त्या दिवशी संकष्टी होती व माझे वडील कडक गणेशभक्त. रात्री कितीही उशीर झाला तरी पण स्नान करून गणपतीला अभिषेक करत व मगच उपवास सोडत. कारण त्यांना कामावरून यायला उशीर होत असे. त्या दिवशीही बाबांना यायला रात्रीचे बारा वाजले. तोपर्यंत मी झोपून गेलो होतो. वडिलांनी पूजेची तयारी केली व आईला फुले मागितली. आईने घाबरत घाबरत सांगितले की बाळ (म्हणजे मी) फुले आणायला विसरलेला दिसतो. क्षणाचाही विलंब न लावता बाबांनी मला कान धरून उठवले व एवढ्या रात्री मळ्यातून फुले आणायला सांगितले. नाही म्हणायची काय बिशाद?
मी घाबरतच हातात टॉर्च घेऊन निघालो. बाहेर काळाकुट्ट अंधार. बाजूला भुंकणारी कुत्री, मध्येच कुठेतरी सरकन उडत जाणारे पक्षी, सरपटणारे प्राणी. राम राम म्हणतच मी दीडदोन मैल रपेट करून एकदाचा मळ्यात पोहोचलो. माझी चाहूल ऐकून मळेवाला धावत आला. ‘कोन हाय तिकडं?’ तो ओरडला. मी भीत भीत त्याला मी ‘बाळ’ आहे असे सांगितल्यावर मला ओळखले. कारण मी नेहमीच फुले आणायला जात असे. त्याने मला फुले तोडायला मदत केली व मळ्याबाहेरपर्यंत सोबत केली व धीर दिला. तिथून गावाच्या वेशीपर्यंत सतत रामनामाचा जप करून व नंतर स्वत:ला कुत्र्यांपासून वाचवत मी कसेबसे घर गाठले.
त्यानंतर मात्र मी कधीही फुले आणायचा कंटाळा केला नाही.
नदीवरचा प्रसंग
त्या काळी बहुतेक प्रवास बैलगाडीनेच करावा लागे. एस. टी. बसेस फार नव्हत्या. रस्तेपण नव्हते. शेताच्या बांधावरून बाजूबाजूने रस्ता असायचा. त्यातच मध्ये मोठमोठे खड्डे किंवा चिखल असायचा. यात कधी कधी बैलगाडी रुतून बसत असे आणि बैलांना ओढवत नसे. मग मात्र गाडीतले सगळे खाली उतरत व त्यांना रूतलेली गाडी कशीबशी काढावी लागे.
असेच एकदा आम्ही बरेच जण बैलगाडीने माझ्या मामाच्या लग्नाला जात होतो. पाच-सहा बैलगाड्या. आजोबांकडे खूप छान बैलगाडी होती. गवळ्या-पवळ्या खिल्लारी जोडी. दसऱ्याच्या शर्यतीत ते जीपच्या बरोबरीने धावत. उंच, पांढरेशुभ्र, टाकदार व सरळ शिंगे असलेले एकसारखे दिसणारे, उमदे व रूबाबदार. जणू जुळी भावंडेच.
माझा मामा त्यांना प्रेमाने दर सणाला पुरणपोळी खाऊ घालत असे.
आमचे वऱ्हाड लग्नाला निघालेले. जवळच्याच गावाला. जाताना मध्येच एक नदी लागे. त्यातून मार्ग काढून नदी ओलांडून पलिकडे जावे लागे. पूल नव्हता. नदी जशी दिसू लागली तसे बैल थबकू लागले. काही केल्या पाय उचलेनात. मामा बैलांना हाकून बेजार झाला. तशीच कशीबशी गाडी नदीत घातली. अर्धे अंतर गेल्यावर बरोबर मध्यभागी गाडी थांबली. काही केल्या पुढे जाईना. सगळे हैराण झाले. पोहोचायला उशीर होऊ लागला. बाकीचे अगाडीवाले मदतीला आले. कोणी म्हणे नदीत आसरा (जल देवता वगैरे) असतात. तेव्हा त्यांना खूश करा. बरोबर आणलेले लाडू नदीत फेका. कोणी म्हणे पुढे एखादे जनावर (साप, मगर हे ) असेल. माझी तर बोबडीच वळली. सगळ्यांनी पटापट खाली उड्या मारल्या. कोणाच्या कमरेपर्यंत तर कोणाच्या छातीपर्यंत पाणी लागले. मीही घाबरून मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली पण सरळ पाण्याखाली गेलो. नाकातोंडात पाणी गेले. मी बुडायला लागलो. तितक्यात कुणीतरी दुसऱ्या मामाने मला उचलून खांद्यावर घेतले व मी वाचलो. अखेर सगळ्यांनी चालूनच नदी पार केली. हळूहळू गाडीपण पैलतीरावर आली आणि सगळ्यांना हायसे वाटले. लग्न व्यवस्थित पार पडले. पण आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात.
नववीत असतानाची एक आठवण
आम्हाला सायकलवरून सात/आठ मैल (किलोमीटर नव्हे) दूर असलेल्या मोठ्या गावी शाळेला जावे लागे. कारण गावात चौथीपर्यंतच शाळा होती. वर्गातील इतरही मुले बरोबर असत. सकाळी सातची शाळा असे. पहाटे ४.३० ला उठून ५.३० पर्यंत निघावेच लागे. हिवाळ्यात तर सायकलवरून जाताना हात गोठून जात. कडक होत. त्यात आमचे गाव उंच डोंगर पठारावर व शाळा पायथ्याशी असलेल्या गावी. घाटाचा नागमोडी रस्ता. उतारावरून खाली जाताना थंडीत बर्फातून गेल्यासारखे वाटे. शिवाय रस्त्यावर धुके असे.
एकदा काय झाले, अचानक खूप पाऊस पडला. बरोबरची मुले पटापटा निघून गेली. मी एकटाच शेवटचा तास संपेपर्यंत थांबलो व मग घाईघाईने निघालो.
मध्यात डोंगरपायथ्याशी एक ओढा लागे. त्यावर छोटासा पूल होता. मी पुलापर्यंत आलो. पाहतो तो काय? पाणी पुलावरून वाहू लागलेले. पण मी हिंमत करून सायकल पाण्यात घातली. पाण्याचा जोर वाढू लागला. मग मात्र मी खाली उतरून हातात सायकल घेऊन चालू लागलो. पण पाय उचलला की पाय घसरायचा व सायकल पण. आता मी पाय न उचलताही सरकू लागलो. तरी अजून पाणी वाढू लागले व मी विरुद्ध बाजूला ढकलला जाऊ लागलो. शेवटी तर मी पुलाच्या दुसऱ्या बाजूला टोकापर्यंत ढकलला गेलो. मग मी थांबलो. पुन्हा जोराची लाट आली आणि सायकल पुलाखाली सटकली व लटकू लागली. मी जीवाच्या आकांताने सगळे बळ एकवटून सायकल पकडून ठेवली व एक पाय गार्डस्टोनला अडकवला. पूर्वी पुलावर दोन्ही बाजूला छोटे सिमेंटचे खांब असत. त्याला गार्डस्टोन म्हणत. ही युक्ती कामी आली. तिथे मी पूर्ण अडकला गेलो व फ्रीज झालो. कारण गार्डस्टोनचा आधार व आडोसा होता.
पण असे किती वेळ चालणार? माझ्या हातातली शक्ती संपत आली. शेवटी मी निश्चय केला. सायकल सोडायची व स्वतःला वाचवायचे. पाण्याचा जोर व आवाज ऐकून डोळे व डोके गरगरू लागले म्हणून डोळे गच्च मिटून घेतले व देवाचा धावा सुरू केला.
इतक्यात माझ्या कानावर एक हाक ऐकू आली, “ए मुला, घाबरू नकोस. सायकल घट्ट पकडून ठेव मी आलोच.” म्हणतात ना की तुम्ही मनापासून देवाची प्रार्थना केली तर देव नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतो. तसेच काहीसे झाले. एक इसम देवासारखा माझ्या मदतीस धावून आला. त्याने आधी सायकल पकडली व मग मला धरले आणि हळूहळू पैलतीरावर सोडले.
माझा विश्वासच बसेना. एका क्षणापूर्वी मी वाहून जाणार होतो व आत्ता मी तीरावर सुखरूप पोहोचलो.
मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता.
मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो.
–शिरीष जोशी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply