नवीन लेखन...

पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर

पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी झाला.

अण्णासाहेब उर्फ नारायण यशवंत देऊळगावकर हे चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मोठ्या दोन बहिणी, धाकटा भाऊ विनायक व आई असे हे कुटुंब होते. अण्णांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील एस.पी. व फर्गसन या दोन महाविद्यालयात शिक्षण घेतले. मराठी व संस्कृत विषय घेऊन ते विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. त्यांना प्रा. श्री.म. माटे, प्रा. के.ना. वाटवे, डॉ. आर.एन. दांडेकर अशा प्रतिभावंत प्राध्यापकांच्या अध्यापनाचा लाभ झाला. त्यामुळेच अण्णांना त्या वयातच लेखनात रस वाटू लागला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निबंधस्पर्धेत अण्णांचा एकमेव निबंध बक्षीसपात्र ठरला होता. या काळात त्यांनी मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन व परिशीलन केले होते. एम.ए. करताना त्यांना मिलिटरी अकाऊंट्समधील नोकरी मिळत असल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून नोकरी स्वीकारली. पण नोकरीत रमण्याचा त्यांचा पिंड नव्हता. मोठ्या बहिणीचे (सुशीलाचे) पती बाळासाहेब (पीके) पाठक हे ‘प्रभात फिल्म कंपनी’त निर्मिती प्रमुख व महाव्यवस्थापक होते. अण्णा त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा ‘प्रभात’मध्ये जात असत. तिथेच त्यांना चित्रपट निर्मितीपासून तो प्रदर्शित होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया बघायला मिळाल्या. चित्रपटाची बरीच तांत्रिक अंगे त्यांच्या लक्षात आली. या काळात अण्णांनी पुण्यात थिएटर्स भाड्याने घेऊन इंग्रजी चित्रपटांचे वितरण सुरू केले. चित्रपटांचा अभ्यास केला. पटकथा लेखनावरची अनेक पुस्तके त्यांनी वाचली.

१९४८ सालच्या ‘सीतास्वयंवर’ या चित्रपटाची पटकथा लिहीली. ग.दि. माडगूळकर या चित्रपटाचे संवाद लिहिणार होते. त्यामुळे अण्णांनी पटकथा प्रथम माडगूळकरांना दाखवली. त्यांनी ती वाचून पटकथेचे कौतुक करत म्हटले, “अरे, तू पंचपक्वान्नाचा स्वयंपाकच तयार करून ठेवला आहेस. ओगराळ्यानं वाढायचं काम माझ्यासाठी शिल्लक ठेवलं आहेस!” सुरुवातीला अण्णांचे नाव प्रसिद्ध नसल्यामुळे श्रेयनामावलीत त्यांचे नाव नसे. पण इथेच अण्णांना पुढच्या वाटचालीचा मार्ग सापडला, तो म्हणजे चित्रपटासाठी पटकथा-संवाद आणि गीतलेखन करण्याचा. ‘मायाबाजार’ चित्रपटापासून बाळासाहेब पाठकांनी ‘माणिक चित्र’ ही चित्रपटसंस्था काढली. अण्णा या संस्थेच्या सर्व चित्रपटांच्या वितरणाशिवाय कधी पटकथालेखन, तर कधी गीतलेखन करत.

१९६३ सालच्या ‘सुभद्राहरण’ या वाडिया यांच्या चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवादलेखनामुळे अण्णांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. १९६९ साली निर्माते दत्ताराम गायकवाड यांच्या विनंतीवरून त्यांनी ‘सती मालाई’च्या पोथीवरून ‘सतीचं वाण’ या चित्रपटाचे पटकथा-संवाद लिहिले. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. गायकवाडांच्या ‘थापाड्या’ची कथा, पटकथा, संवाद व काही गीतेही अण्णांनीच लिहिली होती. लवकरच अण्णांनी ‘रसिकराज प्रॉडक्शन्स’ ही स्वत:ची चित्रसंस्था काढून तिच्यातर्फे ‘सासुरवाशीण’, ‘सतीची पुण्याई’, ‘लेक चालली सासरला’ व ‘साखरपुडा’ अशा चित्रपटांची निर्मिती केली. हे चित्रपट बऱ्यापैकी चालले. अण्णांना बऱ्याच निर्मात्यांकडून पटकथा-संवाद लिहिण्यासाठी बोलावणी आली. महेश कोठारे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांच्या यशात अण्णांचा मोठा वाटा होता. ‘धूमधडाका’साठी पटकथा-संवाद व ‘दे दणादण’ची कथा-पटकथा-संवाद त्यांनीच लिहिले होते. सचिन पिळगावकरच्या ‘कुंकू’चे संवाद, छगन भुजबळांच्या ‘नवरा बायको’चे कथा-पटकथा-संवाद, अरुण गोडबोले यांच्या ‘नशीबवान’चे पटकथा-संवाद तर ‘भाविका चित्र’च्या ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ची कथा-पटकथा-संवाद व गीतेही त्यांनी लिहिली होती.

विजय कोंडके यांच्या ‘माहेरच्या साडी’ने तर अनेक बाबतीत विक्रम केला होता. अण्णांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवले. या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी संवादांनी घराघरातल्या स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही काळजाला हात घातला होता. पत्नीच्या निधनानंतर अण्णा नागपूरला मुलीकडे राहत होते.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ (२००१), गदिमा प्रतिष्ठानचा ‘ग.दि. माडगूळकर पुरस्कार’ (२००४) व ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (२००९) अशा मानाच्या पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. अण्णांचे धाकटे बंधू विनायक देऊळगावकर हेही चित्रपट निर्मितीक्षेत्रात व वितरणक्षेत्रात नावाजले होते.

अण्णासाहेब देऊळगावकर यांचे ३ जून २००८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर

  1. अण्णासाहेब देऊळगावकर यांच्याबद्दल खूप छान माहिती वाचावयास मिळाली, त्यांच्या लेखनाला सादर दंडवत प्रणाम ??
    धन्यवाद ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..