अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. नेताजी रा. पाटील यांनी लिहिलेला हा लेख
पांडुरंग बुवा फुलावरकर नावाचे प्रसिद्ध भजनीबुवा माझ्या वडिलांचे मित्र होते. उंची सहा फुटांच्या वर, धिप्पाड शरीरयष्टी, तेज:पुंज चहरा, दिलखुलास स्वभाव आणि पहाडी आवाज असलेले बुवा उत्कृष्ठ हार्मोनियम पटू होते. बाजाच्या पेटीवर त्यांची बोटे जादू सारखी चालत. सहीसमाक्षीने गावी आले की मुक्काम आमच्याच घरी असे. गावातील श्रीराम प्रासादिक मंडळी त्यांना भजनाचं निमंत्रण देत असे. पांडुरंगबुवांची भजन आणि विशेषत: त्यांचं पेटीवादन माझ्या आजही स्मरणात आहे. मी त्या वेळी आठ-दहा वर्षाचा असेन. ‘धनिसारे सानिसा सानिधाप मपधप गमप मगरेसा’ हे बुवांचे नोटेशन माझ्या मुखोद्गत आहे. त्याच अबोध, अजाण वयात माझ्या मनात हार्मोनियमचं बीज अंकुरलं गेलं.
शिक्षण सुरू झालं, एस्.एस्.सी. झालो, गावातील माध्यामिक शाळेतच नोकरीला लागलो. नोकरी, संसार आणि अन्य छंद त्या व्यापात हा छंद बाजूलाच पडला. वय सरत गेलं आज आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे पण आपणास हार्मोनियम वाजवता यावी हे स्वप्न अधुरंच राहिलं. हार्मोनियमची धून ऐकली की मन मोहरतं, बहरतं, पण दुधाची तहान ताकावरच भागवावी लागते. ही उत्कट इच्छा आयुष्याच्या धबडग्यात पूर्णत्वाला गेलीच नाही.
मी सातवीत – आठवीत असताना गावातील भजनीमंडळ दसक्रोशीत प्रसिद्ध होतं. केशवबुवा आमचे भजनीमास्तर मुंबई नायगावचे वामन खोपकर नावाचे भजनीबुवा भजनीमंडळाचे मार्गदर्शक. परिसरात भजनाचे सामने असले की मंडळाला आवर्जून ‘सुपारी’ मिळत असे. आमच्या बुवांचं वैशिष्ट्य म्हणजे ‘नागीन’, ‘अनारकली’, ‘तुमसा नही देखा’, ‘प्यासा’ वगैरे सिनेमांतील सुप्रसिद्ध संगीत त्यांनी भजनात आणलं. ते हे सिनेसंगीत पेटीवर इतकं मस्त वाजवीत की पब्लिक त्यांच्यावर फिदा होत असे. माझं मन मला बजावून सांगत असे, “अरे तुला कधी अशी धून वाजविता येईल? ”
माझे मावसभाऊ सुभाष आणि दिलीप हे दोघेही छान हार्मोनियम वाजवतात. शिवाय तबला, बासरी वाजविण्यात देखील दोघेही निष्णात. मनात आलं, सुभाषलाच आपला गुरू करावं आणि त्याच्याकडून पेटी शिकून घ्यावी. आपली स्वतःची पेटी असावी म्हणजे कधीही फावल्यावेळी पेटीचा सराव करात येईल. सुभाषला घेऊन शुभस्य शीघ्रम या न्यायाने दादरला विश्वनाथ हरीभाऊ कंपनीच्या दुकानात गेलो. आणि बाजाची पेटी खरेदी करून आणली.
सर पेटी शिकत आहेत, सुभाषकाका त्यांना शिकविणार आहेत ही कौतुक वार्ता गावात, शेजोळात पसरली तेव्हा माझं वय चाळीस-पंचेचाळीस असेल. रोज सुभाष माझ्या घरी येऊन काळी पाच, सफेद पाच सारेगमपदनी हे सप्तसूर कोणते वगैरे प्राथमिक माहिती देऊन पेटी शिकायची तर शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायची हा महत्त्वाचा धडा देत असे. पण मला पेटी शिकायची इच्छा असली तरी अवधानं अनेक नोकरी, संसार आणि समाजसेवा या शिवाय शेती व्यवसाय यात खूप वेळ जात असे. शिवाय वाचन-लेखन-भ्रमंती-निसर्ग निरीक्षण वगैरे छंद होतेच. नव्या छंदाला साहजिकच वेळ फार कमी मिळत असे.
सुभाषने सुरुवातीला स्वर दाखवून दिले आणि ‘तू प्यार का सागर है’ हे सिनेगीत शिकवलं. एका दिवसात हे गाणं मी पेटीवर वाजवू लागलो. आणि मला कोण आनंद झाला? ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग! आनंदची अंग आनंदाचे’ अशी माझी भावावस्था झाली. आपण लवकरच सराईतपणे पेटी वाजवू असं अंतर्गत म्हणू लागली. पण कसचं? ‘अ मॅन प्रपोजेस अँड द गॉड डिस्पोजेस्’ हेच खरं.
मला पोटदुखीने ग्रासलं, सुभाषला मुंबईला नोकरी लागली मला शिक्षकाची नोकरी करणं क्रमप्राप्तच होतं. दोन परिणामत: छंद पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. बाजाची पेटी कोणाला तरी देऊन टाकली. ‘तू प्यार का सागर है’ च्या पलीकडे मी गेलो नाही. आज पंच्याहत्तर वय चालू आहे. हा छंद पूर्ण होणं आता कठीण आहे.
– डॉ. नेताजी रा. पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply