नवीन लेखन...

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यातील १४ फूट उंचीच्या पुतळ्याचे पासष्ठव्या वर्षांत पदार्पण

देशाचे पहिले स्वातंत्र्यसमर म्हणून ओळख असलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ात ‘मेरी झांसी नही दूंगी’ हे ब्रीद साध्य करीत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील, संभाजी उद्यानानजीक असलेला १४ फूट उंचीचा पुतळा आज १८ जून रोजी पासष्ठव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. महाराणी लक्ष्मीबाईसाहेब झांसीवाले स्मारक समितीद्वारा पुणे महापालिकेला देण्यात आलेला हा पुतळा संभाजी उद्यानानजीक उभारण्यात आला. या चौकाचे नामकरणही झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक असे करण्यात आले आहे.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या शताब्दीनिमित्त या लढाईमध्ये अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पुण्यामध्ये स्मारक साकारण्याच्या उद्देशातून महाराणी लक्ष्मीबाई झांसीवाले स्मारक समितीची स्थापना झाली. रँग्लर र. पु. परांजपे अध्यक्ष असलेल्या या समितीने राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा करण्यासाठी शिल्पकारांकडून छोटय़ा स्वरूपाची मॉडेल्स मागविली होती. हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता. विनायक करमरकर यांनी घडविलेला छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा मुंबईहून पुण्याला रेल्वेने आणण्यात आला होता. मात्र, राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याची उंची अधिक होती. त्यामुळे रेल्वेने पुतळा पुण्यात आणताना खंडाळ्याच्या घाटात पुतळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून हा पुतळा मुंबई, सुरत, जळगाव, मनमाड आणि दौंड मार्गाने पुण्यात आणला. या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याची कोनशिला तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १६ ऑगस्ट १९५७ रोजी बसविण्यात आली.

त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिशताब्दीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ जून १९५८ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले होते. या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी राणी लक्ष्मीबाई यांचे नातू लक्ष्मणराव दामोदरराव आणि पणतू कृष्णराव हे दोघेही उपस्थित होते.

पुरुषासारखा वेष परिधान करून स्वातंत्र्यासाठी लढताना बलिदान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई या स्त्रीचा पुतळा आणि मराठी संगीत रंगभूमीवर आयुष्यभर स्त्रीची भूमिका करणारे नटसम्राट बालगंधर्व या पुरुषाचा पुतळा एकाच ठिकाणी म्हणजे संभाजी उद्यानानजीकच्या परिसरात आहे, असे हे जगातील एकमेव स्मारक आहे. पुणे महापालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी या वैशिष्टय़ाचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता.

— विद्याधर कुलकर्णी.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..