पहिल्या एक दिवसीय विश्व चषकावर क्लाइव्ह लॉइडच्या वेस्ट इंडिज संघाने आपले नाव कोरले, त्या घटनेला आज ४५ वर्षे झाली. वेस्ट इंडिजच्या या पहिल्या-वहिल्या विजयाच्या स्मृती जगभरच्या क्रिकेट रसिकांच्या मनात आजही तशाच ताज्या आहेत.
१९७५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने पहिल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये केले होते. प्रुडेन्शियल कंपनीने या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारल्याने स्पर्धेला `प्रुडेन्शियल क्रिकेट वर्ल्ड कप’ असेच नाव मिळाले. ७ जून ते २१ जून दरम्यान झालेल्या या क्रिकेट स्पर्धेने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या काळात कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेले सहा देश (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझिलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडिज) यांच्यासह श्रीलंका व पूर्व आफ्रिका, असे आठ संघ या स्पर्धेत खेळले.
अंतीम सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला व पहिला विश्वचषक जिंकला. क्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले. यानंतरच्या १९७९ च्या स्पर्धेतही लॉईडच्या वेस्ट इंडिजनेच इंग्लंडचा पराभव करून विश्व चषक आपल्याकडेच राखला. मात्र १९८३ च्या स्पर्धेत कपिल देवच्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजला खडे चारून लॉईडची हॅट ट्रिक रोखलीच, शिवाय विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. तेव्हापासून आजपर्यंत वेस्ट इंडिजला पुन्हा विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारतालाही पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी २०११ पर्यंत थांबावे लागले. ऑस्ट्रेलियाने मात्र पाच वेळा हा चषक (१९८७, १९९९, २००३, २००७ व २०१५) जिंकला.
पहिल्या तीन स्पर्धांत प्रत्येक संघाला ६० षटके मिळत. नंतर ही मर्यादा ५० वर आणण्यात आली. त्या काळी विद्युत झोतात सामने खेळवण्याची पद्धत नसल्याने सर्व सामने दिवसाच होत. नंतर मात्र रात्रीचे सामने सुरू झाले व ती वेळ लोकप्रियही झाली. त्या काळी सर्व खेळाडू कसोटीप्रमाणेच पांढरे कपडे वापरत.
१९७५ च्या पहिल्या स्पर्धेत भारताने केवळ पूर्व आफ्रिकेच्या दुबळ्या संघावर विजय मिळवला होता. १९७९ च्या दुसऱ्या स्पर्धेत तर वेंकट राघवनच्या भारतीय संघाने सर्व सामने गमावले.
१९७५ च्या स्पर्धेत भारताच्या नावावर लागलेला एक दुर्दैवी विचित्र विक्रम असा की, सलामीवीर सुनिल गावस्करने इंग्लंडविरुद्ध सर्वच्या सर्व ६० षटकांत विकेटवर राहून १७४ चेंडूंत एका चौकाराच्या सहाय्याने केवळ ३६ धावा जमवल्या. हा नीचांक आजही कायम असावा. मंदगतीने फलंदाजी करण्याबद्दल त्याच्यावर सर्वत्र टीका झाली. मात्र 1987च्या स्पर्धेत न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात गावस्करने नागपुरात घणाघाती फलंदाजी करत ८८ चेंडूंत शतक झळकावले व भारताला एकहाती मोठा विजय मिळवून दिला. एक दिवसीय सामन्यांतील गावस्करचे हे एकमेव शतक.
टी-२०च्या अति झटपट क्रिकेटचा जमाना येण्याअगोदर एक दिवसीय सामनेच `झटपट क्रिकेट’ म्हणून ओळखले जात. त्यातील १९७५ च्या वेस्ट इंडिज विजयामुळे या क्रिकेट प्रकारातील रंजकता व लोकप्रियताही अधिकच वाढली होती.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply