लोकशाहीर ज्ञानेश पुणेकर (शिंदे) यांचा जन्म २२ जून १९४२ रोजी पुणे येथे झाला.
प्रसिद्धीच्या झोतात नसलेले आणि प्रसिद्धीच्या मागे नसलेले अनेक गायक, गीतकार आहेत. गीतकार ज्ञानेश पुणेकरही त्यापैकी एक. पुणेकरांनी लोकप्रिय गाणी दिली. स्वत: अभिनय सम्राट निळू फुले यांनी पुणेकरांच्या गीत लेखनाचं कौतुक केलं होतं.
झालो मी धुंद सजणे,
घेऊन एक प्याला,
प्याल्यामुळे गं माझ्या,
जीवनात रंग आला,
बेहोश करतो ऐसा जीवनात एक प्याला,
प्याल्यात स्वर्ग वाटे,
धुंदीत माणसाला…
हे गाणं ‘कडक लक्ष्मी’ या चित्रपटासाठी ज्ञानेश पुणेकर यांनी लिहिलं होतं. प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांच्यामुळे त्यांना या सिनेमात गाणं लिहिण्याची संधी दिली होती. प्रसिद्ध साहित्यिक मधूसुदन कालेलकर आणि संगीतकार राम कदम यांच्या सोबतच्या बैठकीत पुणेकरांनी अवघ्या १५ मिनिटात हे गाणं लिहिलं होतं. हे गाणं गोविंद म्हशीलकर आणि पुष्पा पागधरे यांनी गायलं होतं. तर प्रसिद्ध अभिनेते निळू फुले, शरद तळवळकर आणि उषा चव्हाण यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. हे गाणं ऐकल्यानंतर निळू भाऊंनी पुणेकरांना जवळ बोलावून घेतलं. छान लिहिलंस. असंच लिहीत राहा, प्रगती करा, असं निळूभाऊंनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. हा किस्सा ते आजही अभिमानाने सांगतात.
ज्ञानेश पुणेकर (शिंदे) यांचं मूळगाव सातारा जिल्ह्यातील आंबेगाव. त्यांचा जन्म पुण्यातला. त्यांचे आजोबा राणोजी शिंदे हे गावात उत्पन्नाचं कोणतंही साधन नसल्याने गाव सोडून पुण्यात आले. पुणेकरांचे वडील श्रीपतराव यांना तमाशाचा विलक्षण नाद होता. ते तमासगीर होते. कला हौसा कोल्हापूरकरीन यांच्या बारीत ते सोंगड्याची भूमिका करायचे. पुण्यात फारसं उत्पन्न मिळत नसल्याने श्रीपतरावांनीही मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्यावर परळच्या भोईवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामागच्या वस्तीत येऊन राहू लागले. त्यावेळी पुणेकरांचं वय होतं अवघं ९ वर्ष. याच आंबेडकर सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरचेवर येणंजाणं असायचं. त्यावेळी बाबासाहेबांना जवळून पाहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं.
मुंबईत आल्यावर पुणेकरांचे वडील श्रीपतराव यांनी तमाशा सोडला नाही. मुंबईतही ते तमाशा करायचे. भांगवाडी, पिला हाऊस थिएटर, हनुमान थिएटरला ते वडिलांबरोबर तमाशा ऐकायला जायचे. तमाशातील वग, गवळण, गण, आणि लावण्यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. इथूनच त्यांची कवी, गीतकार म्हणून जडणघडण झाली.
पुणेकरांचे शिक्षण तसे इयत्ता सहावी पर्यंतच झालं. सातवीला प्रवेश घेतला आणि गाण्याच्या वेडामुळे सहा महिन्यातचं त्यांनी शाळा सोडली.
शाळेच्या आठवणीतील एक किस्सा ते नेहमी सांगतात. तेव्हा ते सहाव्या इयत्तेत होते. त्यांना मनू पिरांडा नावाचे शिक्षक होते. या शिक्षकाला गाण्याचा विलक्षण नाद होता. शाळेची मधली सुट्टी झाली की हा शिक्षक पुणेकरांना जवळ बोलवायचा. अन् पुणेकरांना गाणं गायला सांगून स्वत: तबला वाजवायचा. वर तू मोठा गायक होशील असं भाकीतही वर्तवायचा. अगदी वर्षभर त्यांचा हा दिनक्रम सुरू होता. गाण्याच्या छंदामुळेच गाण्याची पुस्तके घेऊन वाचण्यापासून ते तमाशाला जाण्याची त्यांना सवय लागली.
— भीमराव गवळी.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply