सकाळच्या ‘दै. मराठवाडा’ तील हेडलाईन वाचली आणि मी सुन्नच झाले.
‘अरुंधती पांडे या कॉलेज युवतीची आत्महत्या!”
क्षणभर डोकं बधीर झालं. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पुन्हा पुन्हा वाचलं अन् धावतच गेले घरात. “मामी, मामी! वाचलीस का ही बातमी? अग आपली अरू गेली.’
“काय?’ मामी किंचाळलीच. “बघू बघू’ म्हणून पेपर हातात घेतला आणि डोळे विस्फारून ती हेडलाईनकडे पाहतच बसली.
“अग परवाच तर येऊन गेली. काही बोलली सुद्धा नाही तिला काही त्रासबीस आहे असं. मग हे असं अचानक एकाएकी काय झालं असेल बरं? किती गोड होती ग पोर!” मामी.
‘अरु’चा चेहरा माझ्या नजरे पुढून हलेना. खरंतर मी औरंगाबादला आले आणि सुभेदारी भागात कला आणि विज्ञान महाविद्यालयात एम.ए. साठी मानसशास्त्र विषयात प्रवेश घेतला तो केवळ अरुमुळे. आम्ही बरोबरच प्रवेश घेतला.
सांगायचा मुद्दा ज्या ‘अरु’च्या मैत्रीखातर मी औरंगाबादला उच्च शिक्षणासाठी आले, ती माझी जिवाभावाची मैत्रीण इतकी अचानक आणि अशा भयानक पद्धतीने जावी आणि मला, तिच्या जिवलग मैत्रिणीला तिने विश्वासातही घेऊ नये याचे मला फार दुःख झाले. हा धक्का सहन होण्यासारखा नव्हता. निदान माझ्यासारख्या जिद्दी मुलीला तरी.
मी ताबडतोब तिच्या घरी गेले. तिचे आईवडील तर काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अरू त्यांची एकुलती एक अत्यंत लाडकी मुलगी. फार लाघवी. आत्महत्त्येच्या बातमीत तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले होते. तिला दिवस गेले होते आणि त्याच भयाने म्हणे तिने हा अघोरी मार्ग पत्करला असावा!
औरंगाबादसारख्या बाबा आदमच्या काळात वावरणाऱ्या शहरी त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नव्हती. मुलगी तर गेलीच वर बदनामीही पदरी आली.
‘अरू’ अत्यंत बोलघेवडी. कुठेही कुणाशीही मिळून मिसळून वागणारी. वागण्या बोलण्यात एक प्रसन्न मोकळेपणा. त्यामुळे मित्र मैत्रिणींचा पसाराही तसाच मोठा. त्यातल्याच कोणा संधीसाधूने हा प्रकार केला असावा. हे कसे कळावे? तिने काही चिठ्ठीचमाटीही ठेवली नव्हती. ज्याने केले त्याने त्याचा स्वीकार करायला नकार दिला असणार म्हणूनच अरूने हा मार्ग पत्करला याची मला पक्की खात्री होती. अगदी संताप संताप झाला. तेव्हाच मी मनोमन ठरवले की हा जो कोणी नराधम असेल त्याला चांगला धडा शिकवीन तरच नावाची मधू! ‘अरु’ आणि माझ्या सात-आठ मैत्रिणी असा आमचा एक ग्रुप होता. आमच्या सुख-दु:खाच्या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकींना सांगायचो. मग अरूने ही गोष्ट का लपवली? तिच्या घरी तरी तिच्या सामानात काहीतरी सापडेल म्हणून आम्ही तिचे सगळे सामान उलथे पालथे केले. वहीन वही, पुस्तक अन् पुस्तक, कपाटांचा कानकोपरा शोधला पण काही म्हणजे काही सुगावा लागला नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले. अरू म्हणजे सळसळता उत्साह, एखाद्या निर्मळ निर्झराप्रमाणे प्रवाही. आम्हाला तिच्या वाचून करमेनासे झाले.
‘अरू’ गेल्यानंतरचे सर्व सोपस्कार आटोपले. त्यानंतर एके दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमधे आमचा ग्रुप जमला. कोणाचीच बोलायची इच्छा नव्हती. सगळ्या गप्प गप्प! शेवटी मी म्हणाले, “आपल्या अरूच्या आत्महत्येमागे कोण आहे याचा शोध घेऊन आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. त्याशिवाय अरूच्या आत्म्याला चैन पडणार नाही. काय? तुमचे काय मत?’
“मधू, अग काय बोलते आहेस? अग या घटनेमागे कोण होते हे आपल्याला कसे समजणार? अशा गोष्टी का कुणी उघडपणे करते? शिवाय आपण तिच्या सगळ्या सामानाची झडती घेतली तशी ती पोलीसांनी पण घेतली पण काही सापडले नाही आणि समजा, जरी सापडले तरी आपण त्यावरून बदला घ्यायचा म्हणजे काय करायचे?” शैला म्हणाली.
“हे बघ शैला, आपण मानसशास्त्राच्या विद्यार्थीनी. जो कोणी या प्रकारामागे असेल तोही या घटनेमुळे नक्कीच अस्वस्थ झाला असणार. अर्थात अरूच्या एवढ्या मित्रमंडळीतून शोध घेणे तसे कठीणच. अर्थात त्यातल्या मैत्रिणी सोडून दे. तिच्या सर्व मित्रांवर जर पाळत ठेवली तर त्यांच्या वागणुकीवरून काहीतरी माग लागेल. लागला पाहिजे असे मला वाटते.”
“अग पण मधू, तिचे मित्र काय फक्त आपल्याच कॉलेजात होते का? शेजारच्या आर्ट स्कूलमधे पण ती पॉप्युलर होती. शिवाय आपल्या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातही तिची अनेकांशी मैत्री होती. यंदाच्या राज्यनाट्यस्पर्धेसाठी मुख्य भूमिका मिळवण्याच्याही ती खटपटीत होती. मुख्य भूमिकेसाठी तिची निवडही जवळजवळ निश्चित झाली होती.” शैला.
नाट्यशास्त्र विभाग म्हणताच माझ्या डोक्यात एक कल्पना विजेप्रमाणे चमकून गेली. मी म्हणाले,
“तुम्ही सर्वजणी आता घरी जा. गेल्या चार-पाच महिन्यातले अरुचे तुमच्या बरोबरचे वागणे, बोलणे आणि आपल्या ग्रुप मधले वागणे, बोलणे, तुम्हाला जसे आठवेल तसे काळजीपूर्वक लिहून काढा. अगदी बारीक सारीक तपशीलही, तुम्हाला तो क्षुल्लक वाटला तरी, सोडू नका. त्यातूनच आपल्याला काहीतरी धागा दोरा सापडेल. त्यातून आपण संभाव्य संशयितांची एक छोटी यादी करू. नंतर काय करायचे ते मी तुम्हाला सांगेन.’
अग पण समजा आपल्याला लागला पत्ता त्याचा, तर आपण काय करणार आहोत? शिवाय नुसत्या ऐकीव किंवा काल्पनिक माहितीवरून आपण कशी शिक्षा करणार त्याला? हा तर सगळा व्यर्थ खटाटोप आहे असं वाटतं.’ सुषमाने पण शैलाचीच री ओढली.
“हे बघ सुषमा, आपण सर्व मानसशास्त्राच्या विद्यार्थीनी. मानसिक धक्का काय असतो ते आपल्याला चांगले ठाऊक आहे. मानसिक दबाव तंत्र किंवा टॉर्चर कसे काम करते तुला ठाऊक नाही का? गुन्हेगाराने जगाला कितीही फसवले तरी तो स्वत:च्या मनाला फसवू शकत नाही.
“ते सगळं ठीक आहे ग. पण समजा आपल्याला त्या व्यक्तीचा अंदाज आला तरी पुढे काय? पुढचा तुझा काय विचार आहे ते तरी कळू दे.’ शैला.
“शैला, आपण आधी आपलं होमवर्क पुरं करू. या प्रकारामागे कोण व्यक्ती आहे याचा अंदाज लागला तर त्या व्यक्तीची माहिती, मानसिकता, कमकुवत मर्म याचा शोध घेऊन पुढची पायरी काय घ्यायची ते ठरवू. आता तुम्ही सगळ्या घरी जाऊन कामाला लागा. सविस्तर अहवाल तयार झाल्यावर आपण पुन्हा भेटू. पण इथं नाही. त्यासाठी आपल्याला एखादी निवांत जागा लागेल. ती चर्चा अत्यंत गुप्त असेल. तशी जागा म्हणजे आपलं परिंदा’. आपण आठ दिवसांनी परिंदा’मधे भेटू.” माझा प्रस्ताव सगळ्यांना पसंत पडला.
-विनायक रा अत्रे
Leave a Reply