“काका अंधश्रद्धा निमूर्लन विशेषांसाठी, अंधश्रद्धा निमूर्लनासंबंधी लवकरच सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कायद्याबाबत तुम्ही कायदेमंत्री चिंधड्यांची मुलाखत घेणार होता, त्याचे काय झाले?”
रोजची पहाट या प्रख्यात दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट सूर्याजी रविसांडे यांनी त्यांचे मुख्य मुलाखतकार काका सरधोपट यांना कार्यालयात आल्या आल्या प्रश्न विचारला.
“साहेब, त्यांच्या मुलाखतीसाठी तारीख मिळवता मिळवता अगदी नाकीनऊ आले. अखेर शेवटी उद्या सकाळी आठ वाजता त्यांनी त्यांच्या बंगल्यावर भेटायला बोलावले आहे.’
“ठीक आहे. जाऊन या. विशेषांकाचा पन्नास पानी अंक जवळजवळ तयार आहे, आता फक्त तुमची मुलाखत तेवढी बाकी आहे.”
“मला किती पानं ठेवली आहेत?”
“चार पानं.”
“काय? फक्त चार? चार पानात मंत्र्यांची मुलाखत? साहेब निदान सात आठ पानं तरी द्या.”
“काका, ते आता शक्य नाही. नेहमी सारखे मियाँ मूठभर आणि दाढी हातभर असं करू नका. तुमचा सगळा मसाला फक्त चार पानात बसवा. हा पण लक्षात ठेवा ही मुलाखत सुरुवातीलाच आहे तेव्हा चांगली चटपटीत व्हायला हवी.”
“साहेब, त्याची चिंता करू नका. ते काम मी करतो.”
“ठीक आहे. मग लागा कामाला.”
दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक आठ वाजता काका कायदेमंत्री खुशालराव चिंधडे यांच्या मलबार हिलवरील सिंधुगर्जना बंगल्यावर पोहोचले. मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक म्हणजे प्रचलित मराठी बोली भाषेत पी.ए. आणि ग्रामीण बोली भाषेत पी.ये. काका कावळे यांनी त्यांचे स्वागत केले. (खाजगीत पी.ये. ना त्यांची मित्रमंडळी प्यायला ये म्हणतात.)
“या या काका, अगदी वेळेवर आलात. साहेबांना फार वेळ नाही. फक्त पंधरा मिनिटे दिली आहेत तुम्हाला.”
“कावळेसाहेब, तुमचा आभारी आहे. मुलाखतीत तुमची योग्य ती दखल घेईनच.” एवढ्यात मंत्री महोदय येतात. पांढरे शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे, वर कडक पांढरी टोपी, पायात मजबूत कोल्हापुरी चपला.
“नमस्कार, बोला काकासाहेब, आमची मुलाखत हवी ना? चला करा सुरू पण लवकर आटपा. आम्हाला एक भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे.”
“साहेब, भूमीपूजन ही अंधश्रद्धा नाही का वाटत?”
“छे, छे. अहो त्याचा अंधश्रद्धेशी काय संबंध? अहो भूमी म्हणजे आपली माता, तिचे पूजन करणे यात गैर काय? आईवडिलांचा मान राखणे ही आपली संस्कृती नाही का?”
“साहेब, लवकरच शासन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणार आहे. या कायद्यातील ठळक तरतुदी काय आहेत?”
“घटनेने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या चौकटीत राहून हा अंधश्रद्धा निमूर्लन कायदा बनवला आहे.”
“थोडक्यात कल्पना द्याल का?”
“हो, देतो. प्रथम अंधश्रद्धा या शब्दाची व्याख्या करण्यासाठी त्या शब्दाची फोड केली आहे.”
“ती कशी?”
“काका, आधी पूर्ण ऐकून घ्या, मध्ये मध्ये बोलून माझी विचारांची साखळी तोडू नका.”
“ठीक आहे साहेब, सांगा.”
“हा, तर प्रथम अंधश्रद्धा या शब्दाची फोड केली आहे. ती अशी-अंध+श्रद्धा=अंधश्रद्धा. श्रद्धा या शब्दाला कोणाचा आक्षेप नाही परंतु श्रद्धा ‘अंध’ असू नये ही मुख्य गोष्ट या कायद्याने अधोरेखित केली आहे.”
“हे ठीक आहे. पण श्रद्धा अंध आहे का डोळस आहे याबाबत कायद्यात काय तरतूद आहे, ते कसे ठरवायचे?”
“फार सोपे आहे काका. अंध म्हणजे काही दिसत नाही ते! आणि डोळस म्हणजे जे दिसते ते! आता देव दिसत नाही पण त्याची मूर्ती दिसते तसेच.”
“खरे आहे, पण ही अमुक देवाची मूर्ती असे आपण कसे सांगू शकणार? देव कुणी पाहिला? कायद्यात त्याची तरतूद कशी करणार?”
“काका नीतिशास्त्र सांगते, थोरांनी दाखविलेल्या रस्त्याने जावे. मोठमोठ्या संतमहात्म्यांनी देव पाहिला आहे. त्याची वर्णने केली आहेत. त्याप्रमाणे चित्रकारांनी. मूर्तिकारांनी चित्रे, मूर्ती तयार केल्या. त्या दिसतात त्यांना आपण देव मानतो. श्रद्धेने त्यांची पूजा करतो.’
“खरे आहे. पण कायद्याला पुरावा लागतो. अशा सांगोवांगीने चालत नाही. शिवाय या महात्म्यांना जर देव दिसला तर त्यांनी तो इतरांना का नाही दाखवला? ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नाही का?”
“काका तसे पाहिले तर मग श्रद्धा हाच शब्द कोशातून काढायला हवा. श्रद्धा ही दाखवता येणारी चीज नाही. पण धूर्तपणाने त्या श्रद्धेचा कोणी गैरवापर करून कुणाचे नुकसान करणार असेल किंवा केले असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हावी हा या कायद्याचा मुख्य विषय आहे.”
“म्हणजे देव आहे का नाही याबाबत हा कायदा गप्पच आहे असे म्हणावयाचे का?”
“काका, हा फार गहन विषय आहे. प्रत्येक धर्माने देवाचे किंवा अशा शक्तीचे अस्तित्व कुठे ना कुठेतरी मान्य केले आहे. तो परंपरेचा, संस्कृतीचा एक भाग झाला आहे. देव काही आपल्याला सांगत नाही की माझी देवळे बांधा, मशिदी बांधा, चर्च बांधा, पूजा करा. सत्यनारायण करा, बकरं कापा, कोंबडं कापा. ते आपणच आपल्या समाधानासाठी करतो.”
“म्हणजे देवापुढे, बकरी, कोंबड्या, प्राणी बळी देणे याला या कायद्यात अंधश्रद्धा मानलेले नाही का?”
“काका, मी सुरुवातीलाच सांगितले की घटनेच्या चौकटीत राहून व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य ज्याचे त्याने समाजाला आणि नागरिकांना त्रास न होता पाळावे. अशामुळे समाजाचे काय अहित होते? तसे तर एरवीही आपण बकऱ्या, कोंबड्या, डुकरे कापून खातोच ना? मग ते देवाच्या नावाने कापले काय आणि नाव न घेता कापले काय एकच. फायदा झालाच तर विकणाऱ्याचा, कापणाऱ्याचा आणि प्रसाद मिळणाऱ्या भक्तांचा होणार. हा, यात अंधश्रद्धेचा भाग येतो तो असा की जर कोणी म्हणाला की तू अमुक अमुक नवस बोल, बकरं कोंबडं काप म्हणजे तुला अमुक अमुक मिळेल आणि ते त्याला मिळत नाही तेव्हा, म्हणजे असे आश्वासन देऊन नवस बोलायला लावणे ही फसवणूक होऊ शकते. तो गुन्हा होऊ शकतो.”
“वा, छान! म्हणजे आपण याची कायद्यात योग्य ती दखल घेतली आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पण कायद्यात आपण काय तरतूद केली आहे?”
“असे पहा काका, कायदा आंधळा असतो म्हणतात. तरी अशा अंध कायद्यावर आपण विश्वास ठेवतोच ना? त्याला अंधश्रद्धा म्हणता येते का?”
“नाही तसे म्हणता येत नाही. कारण पुरावा असेल तर कायदा शिक्षाही करतो. कायदा आंधळा असतो याचा अर्थ तो पुराव्याशिवाय काही करू शकत नाही. परंतु चिंधडेसाहेब या अंधत्वाचा अंधश्रद्धेशी काय संबंध?”
“आहे ना, नाही कसा? अहो अंधश्रद्धा सिद्ध करायची असेल तर कायद्यात तशी तरतूद नको का? तीच आम्ही केली आहे या नवीन कायद्यात!”
“ती काय?”
“उदाहरणार्थ सांगतो. एखाद्याने नवस केला की देवा मला मुलगा होऊ दे, तुला कोंबडं कापीन. तर ज्या देवाला नवस केला त्याच्याशी त्याने कायदेशीर लेखी करार करावा.
“काय? देवाशी करार? साहेब हे तर अशक्य आहे.”
“काही अशक्य नाही. अहो देवाशी म्हणजे देवळाच्या पुजाऱ्याशी, मांत्रिकाशी किंवा जो कोणी असे आश्वासन देवातर्फे देईल त्याच्याशी -तो कोणी साधू, महंत, महाराज, मांत्रिक किंवा कोणीही मध्यस्थ असेल.”
“साहेब हे तर अशक्यच आहे. देवाच्या वतीने कोण असा लेखी करार करणार? म्हणजे ही तर उघडउघड कायद्यातून पळवाटच नाही का होणार?”
“काका इथेच तर आम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा विचार केला आहे.”
“तो कसा?”
“काका असा लेखी करार करणे बंधनकारक आहे हे माहीत असूनही एखाद्याने तो केला नाही तर ती त्याची कृती डोळसपणाने केली असे कायदा मानेल. कोणाला जर स्वत:हून असे करावयाचे असेल तर तो त्याच्या श्रद्धेचा भाग आहे असे कायदा मानेल.’
“साहेब, परंतु अशा श्रद्धेलाच तर अंधश्रद्धा म्हणतात ना? या कायद्याने तर अंधश्रद्धा कायदेशीर होण्याचा धोका आहे असे आपणास वाटत नाही का?”
“काका मी सुरुवातीलाच अंधश्रद्धा या शब्दाची फोड करताना स्पष्ट केले आहे की श्रद्धेला कोणाचा आक्षेप नाही. ती अंध असता कामा नये. आता असे पहा की श्रद्धा ही फक्त देवावरच असते का? ती कित्येक गोष्टींवर असते. आईवडिलांवर, गुरूजनांवर, विद्वानांवर, मित्रांवर, नशिबावर, नियतीवर, निसर्गावर, डोंगरांवर, नद्यांवर अगदी कशा कशाही वर असू शकते. त्यामुळे श्रद्धा या शब्दाअंतर्गत येणाऱ्या सर्व श्रद्धांवर त्या डोळस का अंध हे ठरविण्यासाठी कायद्यात तरतूद आवश्यक होती आणि ती आम्ही अशा लेखी करारातून करण्याची तरतूद करून अंधश्रद्धा मुळापासूनच निर्मूल व्हावी असा प्रयत्न केला आहे.”
“म्हणजे अंधश्रद्धेविरूद्ध लढायचे असेल तर असा लेखी करार आवश्यक करणार आहात का?”
“हो तसेच.”
“या कायद्यात कोणकोणत्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून विशेषकरून अंतर्भूत केल्या आहेत?”
“काका मघाशी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा या संकल्पनेखाली येणारी कोणतीही गोष्ट या कायद्याखाली येते. अगदी स्पष्टपणे आणि सध्या ज्या गोष्टींबाबत अंधश्रद्धा निर्मूलनवाले आग्रही आहेत अशा गोष्टी, उदाहरणार्थ महंत, साधू, बाबा, पुजारी, देवस्की, मांत्रिक, भविष्यकथन, मरीआई, जाखाई, ओखाई, भानामती इत्यादी हे सर्व कायद्यानुसार गुन्हे ठरवण्यात आले आहेत. फक्त त्याबाबत कोणाची तक्रार असेल, फसवणुकीचा आरोप असेल तर त्याने लेखी कागदोपत्री पुरावा कोर्टासमोर हजर केला पाहिजे.”
“साहेब, पण असा लेखी पुरावा, करार कोण करणार? म्हणूनच त्याला अंधश्रद्धा म्हणायचे ना?”
“अहो काका, जिथे कायदाच आंधळा असतो असे म्हणतात तरी आपण कायद्यावर विश्वास ठेवतोच की नाही? तसेच अंधश्रद्धेचे आहे. श्रद्धा अंध आहे हे सिद्ध करावयाला लेखी पुरावा जरुरीचा आहे. एक उदाहरणच देतो. आपण शेअर बाजारातून शेअर खरेदी करतो. चांगल्या कंपनीचे भाव पाहून घेतो. कधी त्यातून फायदा होतो, रंकाचा रावही होतो तर कधी रावाचा कंगालही होतो. होतो ना? तरीही आपण अशी खरेदी करतोच.
भाव गडगडले तर आपण कंपनीकडे वसुली मागतो का? नाही. कारण त्यांच्या करारपत्रात शेअरचे भाव वधारणे किंवा कमी होणे याची जबाबदारी त्यांची नसते. बस, तशीच तरतूद आम्ही या कायद्यात सुचविली आहे.”
“म्हणजे अंधश्रद्धेचे चक्क व्यापारीकरण करायचे वाटते?”
“हे पहा काका, असा दोन्हीकडून विचार करू नका. एकतर ही तथाकथित अंधश्रद्धा ही वैयक्तिक बाब म्हणून सोडून द्या किंवा तिला कायद्याने आळा घालायला असेल तर कायद्याला समजेल असा कायद्यात बदल करा किंवा तरतूद करा. शेवटी आम्ही व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य विसरू शकत नाही. आम्ही लोकशाही मानतो. घटनेच्या चौकटीत राहून आम्ही हा कायदा करत आहोत.”
“म्हणजे शेअर मार्केटप्रमाणे निरनिराळी देवस्थाने, महाराजांची, बुवांची संस्थाने, मठ असे कायदेशीर करार करून, सध्या जी बेहिशेबी मालमत्ता, संपत्ती गोळा करतात ती ते उघडपणे कायदेशीर मार्गाने गोळा करायला मोकळे नाही का होणार?”
“हे पहा काका, असा कायदा नसल्यामुळे सध्या जी जनतेची फसवणूक होते ती होणार नाही. आता जर कोणाला जाणूनबुजून खड्ड्यात पडायचे असेल तर त्याला कायदा काय करणार?”
“वा, वा! चिंधडेसाहेब, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामुळे फार मूलभूत अशा स्वरूपाची तरतूद करून अंधश्रद्धेच्या जोखडातून जनतेला कायमची मुक्ती मिळण्याची सोय करण्यात येत आहे यात काही शंकाच नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सरकारने ही गाजराची पुंगीच केलीय. वाजली तर वाजली, नाही वाजली तर खाल्ली!”
“छे, छे, काका हे काय बोलताय? उलट या कायद्यामुळे आज जी अंधश्रद्धा बोकाळली आहे तिला लगाम बसेल. शिवाय आज अंधश्रद्धेविरुद्ध काहीही कार्यवाही होत नाही ती होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांनी, कार्यकर्त्यांनी, समाज सेवकांनी कायद्याचा आधार घेऊन आपली चळवळ मजबूत करावी. जागोजागी आपले प्रतिनिधी नेमून जनतेला जागृत करावे. त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टात कज्जे दाखल करावेत. या कायद्यामुळे कित्येक कार्यकर्त्यांना, समाजसेवकांना, वकिलांना चांगला कामधंदा मिळेल.”
“वा, छान! मग असे खटले चालविण्यासाठी नवी न्यायालये, न्यायमूर्ती यांचीही तरतूद असेल?”
“हो, आहे तर. कायद्याचा मसुदा मान्य करताना न्यायमूर्तीनी आधी तीच तरतूद केली आहे. शिवाय एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाविरूद्ध खटला असेल तर न्यायमूर्तीना सहकुटुंब देवस्थानाच्या आरामगृहात राहण्याची तरतूद आहे. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, इष्ट मित्रांना देवपूजा, अभिषेक इत्यादी सुविधा देवस्थानामार्फतच देण्यात याव्यात आणि सर्व खटल्याचा खर्च देवस्थानाकडून करण्यात यावा अशी तरतूद केली आहे. सध्या जागतिकीरणात जे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, तत्त्व वापरतात ना तसेच या अंधश्रद्धेच्या प्रकरणात सरकारला एका पैशाचाही खर्च करावा लागणार नाही अशी चोख तरतूद केली आहे.
“वा, वा! चिंधडेसाहेब, हा फारच क्रांतिकारी कायदा होणार असे वाटते. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसाठी काही तरतूद नाही का?”
“आहे ना, प्रत्येक लहानमोठ्या देवस्थानांमध्ये, धार्मिक स्थळांमध्ये, आश्रमामध्ये मठांमध्ये त्या त्या संस्थेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी एक सुसज्ज वातानुकूलित कार्यालय ठेवावे. कज्जे चालविण्यासाठी एक भरपगारी वकील ठेवावा. त्यांच्या राहण्यासाठी निवासस्थाने द्यावीत आणि खटले दाखल करणाऱ्या जनतेसाठी फुकट निवास, भोजन व्यवस्था करावी अशी तरतूद केली आहे.”
“साहेब, पण हे जरा विचित्र नाही का वाटत? कोण स्वत:वरच खटले दाखल करून घेण्यासाठी एवढा खर्च करेल?”
“छे, छ, काका, अहो ही तरतूद आम्ही निरनिराळ्या देवस्थानांच्या स्वत:हून केलेल्या मागणीनुसारच केली आहे.”
“काय सांगता?”
“हो ना. अहो काका त्यांचे म्हणणे असे आहे की आमच्या देवावर होणाऱ्या खटल्यांमुळे आमच्या देवाला फार दुःख होईल, आपल्या भक्तांच्या दु:खाकडे तो दयेने पाहतो हे आम्हाला त्यांना दाखवून द्यायचे आहे. शेवटी ज्याचे त्याचे प्राक्तन तो जन्माबरोबरच घेऊन येतो, त्याला देवाचाही नाईलाज असतो हे आम्ही त्यांना त्यांच्या खटल्याच्या कामाला लागणाऱ्या वेळात पटविण्याचा प्रयत्न करू.”
“वा! फारच छान! हे बील म्हणजे कायदा लवकर मंजूर होवो अशी सदिच्छा! धन्यवाद!”
“काका, मी आता जातो पण तुम्ही चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. मी बाबूला चहा पाठवायला सांगितले आहे. कावळे, चला उशीर होतोय.”
दोघे जातात. काका चहाची वाट पहात बसले आहेत. एवढ्यात फोन वाजतो. कोणी उचलत नाही. दोनतीन वेळा असेच होते तेव्हा काका नाईलाजाने फोन उचलतात.
“हॅलो काका बोलतोय!”
“काका? मी चंद्रहास स्वामी बोलतोय. साहेब आहेत का?” (स्वामींना वाटते पी.ए. काका कावळेच बोलतोय फोनवर ते बिनधास्त बोलतात).
“नाही. साहेब आत्ताच बाहेर पडलेत.”
“ठीक आहे. त्यांना एक निरोप सांगा. त्यांना म्हणावे ते अंधश्रद्धा निर्मूलन बील एवढ्यात मंजूर होऊ देऊ नका. त्यांचे ग्रह चांगले नाहीत. १/२ आठवड्यात मत्रीमंडळ पण गडगडतंय. शनी आडवा येतोय. येऊ द्या म्हणावं. पुढच्या मंत्रीमंडळात त्यांना . चान्स आहे. कायदामंत्री पद जाऊन दुसरे चांगले खाते मिळेल. मग हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे खापर त्यांच्या डोक्यावर फुटायचे नाही. मी उद्या येतोच त्यांना भेटायला.”
“या, या. सांगतो साहेबांना.”
“हा आणि काका, उद्या दोन नरसिंह पण पाठवतो त्यांना.”
“नरसिंह? ते काय?”
“अरे काका, तुम्हाला नरसिंह माहीत नाही? काय कालची उतरली नाही वाटतं अजून? अरे नरसिंह म्हणजे नरसिंहदेवाची पेटी रे? कमलेश मोदीने, बिग बुल ने पाठविली तशी!”
“हा, हा आलं लक्षात. पण त्या कशाला?”
“अरे काका, तुला पी.ए. कोणी केला? आज काय झालंय तुला? अरे आता नवीन निवडणुका होणार त्याला नको का?”
“हा अरे खरंच की! पाठव पाठव. बाय!”
“अच्छा, बाय बाय! जय बालाजी!”
-विनायक रा. अत्रे
Leave a Reply