आईकडून आलेली नाटकाची आवड जोपासणारा, बालवयातच नाटकात भूमिका करणारा, राज्य नाट्यस्पर्धेत दिग्दर्शन-अभिनयाची छाप पाडणारा, निवेदनाच्या क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण संहितेनं आणि भारदस्त आवाजात श्रोत्यांचं मन जिंकणारा, कलाकारांवरील ध्वनि-चित्रफिती बनवून महाराष्ट्राच्या कलेचा वारसा जतन करणारा, प्रजासत्ताकदिनाच्या परेडपासून ते इंडोनिशियापर्यंत कलापथकांचे नेतृत्व करणारा, पण हे सगळं करतानाही रंगभूमीला न विसरलेला ठाण्याचा कलादूत म्हणजे नरेंद्र बेडेकर!
ठाण्यातील बालरंगायनच्या ‘एक होतं भांडणपूर’ या बालनाट्यातून इयत्ता 5वी/6वीत असताना नरेंद्रने आपली पहिली भूमिका केली. शालेय वयातच ‘कलासरगम’च्या नाट्यवर्तुळात तो सामावला गेला. मग ‘कुणाला कुणाचा मेळ नाही’, ‘बिनबियांचं झाड’, ‘जाळ्यात गावलाय मासा’ अशा लोकनाट्यांमधून त्याने भूमिका केल्या. त्यामुळे रंगमंचाची भीती गेली, उत्स्फूर्तता आली. प्रसंगावधान भिनले आणि व्यक्तिरेखा रंगवण्याची किल्ली सापडली. कलासरगमसारख्या गांभीर्याने, जबाबदारीने नाटक सादर करणाऱया संस्थेत कुमार सोहोनी, विजय जोशी, दिलीप पातकर, अशोक साठे यांच्या तालमीत नरेंद्र तावूनसुलाखून निघाला. मग राज्य नाट्यसाठी ‘अनंगदेही’, ‘विठ्ठला’, ‘असायलम्’, ‘ॲमॅड्युअस’ यातून भूमिका करता करता ‘कॅलिग्युला’ नाटकातील मध्यवर्ती भूमिकेसाठी नरेंद्रने प्राथमिक आणि अंतिम अशा दोन्ही फेरीत अभिनयाचे पारितोषिक मिळवले. 1977 ते 80 या काळात ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. त्या काळात प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शित ‘गुडबाय’, कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘तमासगीर’ यातून नरेंद्रने अभिनय केला. भूमिका करता करताच नरेंद्रला दिग्दर्शनाची वाट खुणावू लागली. त्याने दिग्दर्शित केलेली ‘भारतीय समाचार दर्शन’ ही एकांकिका दूरदर्शनच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली. नंतर नरेंद्रने राज्य नाट्यसाठी दिग्दर्शित केलेल्या ‘घनदाट’ नाटकाला स्पर्धेत तृतीय पुरस्कार मिळाला.
80च्या दशकाच्या मध्यावर नरेंद्रच्या अभिनय कारकीर्दीला वेगळं वळण लागलं. कलासरगमने ठाण्याचे जनकवी पी. सावळाराम यांच्या भावमधुर गीतांचा कार्यक्रम ‘अक्षय गाणी’ नावाने सादर करण्याचे ठरवले. या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी नरेंद्रवर सोपवण्यात आली. विजय जोशी, अशोक बागवे, माधव चिरमुले, सुनील गोडसे, जगदीश बर्वे यांच्या मदतीनं नरेंद्रने ही जबाबदीर इतकी उत्तम पार पाडली की, नंतर व्यावसायिक मंचावर हा कार्यक्रम सादर झाला, तेव्हा त्याची सगळी जबाबदारी नरेंद्रकडेच आली. त्यानंतर आला वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार या तीन वसंतांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित ‘वसंत बहार’. त्यानंतर नरेंद्रने विद्याधर गोखलेंबरोबर हिंदीतील रागदारीवर आधारित असलेल्या गाण्यांचा ‘सूरबहार’ हा कार्यक्रम केला.
मग असे कार्यक्रम ही नरेंद्रची खासियतच बनून गेली. पुढे संगीतकार यशवंत देव, दशरथ पुजारी, अनिल मोहिले, सुधीर फडके, भालचंद्र पेंढारकर, जयमाला शिलेदार अशा कलाकारांवर तीसहून अधिक स्वतंत्र कार्यक्रम नरेंद्रने सादर केले. गेली पंधरा वर्षे नरेंद्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये निवेदक, कार्यक्रम संयोजक, चित्रीकरणात सहभाग घेत आहे. महाराष्ट्र घडवणाऱया सुमारे 70-80 कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कारकीर्दीवर आधारित ध्वनी चित्रफीत बनवण्याचा प्रकल्प नरेंद्र केला आहे. या प्रकल्पातून कला, विज्ञान, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील नामवंतांची कामगिरी संग्रहीत झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना चौपाटीवर झालेला दिमाखदार ‘सुवर्ण महोत्सव’, अलीकडेच मोठ्या दणक्यात साजरा झालेला भव्य ‘रायगड महोत्सव’ या सोहळ्यांचे चित्रीकरण करण्याची कामगिरी नरेंद्रने बजावली आहे. आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.
(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)
Leave a Reply