भारतात जेव्हा जेव्हा कोणतीही क्रांती झाली त्यावेळी त्याची मुहूर्तमेढ बहुधा महाराष्ट्रातल्या मातीतच रोवली गेली, मग तो स्त्री शिक्षण सारखा मुद्दा असेल किंवा आत्तापर्यंतच्या महिला सबलीकरणाचा. पण तरीसुध्दा जेव्हा स्त्री-पुरुष समानता सारखा महत्वपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्यावेळेस कुठेतरी तिच्यावर अन्याय हा झालाच. अगदी स्वातंत्र्यानंतरसुध्दा. पण जसजशी स्त्री शिकू लागली तसतसा तिच्यात सकारात्मक बदल घडून आला तो विचारांच्या माध्यमातून. सजगतेमुळे, नव्या उमेदीने नव्या विश्वात ती कतृत्वाची भरारी घेण्यास सज्ज झाली आणि कारकीर्दीत यशाची शिखरं पादाक्रांत करत इतरांसाठी ही प्रेरणास्त्रोत बनली. म्हणूनच म्हणतात ना प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे स्त्री असते. कारण कोणतीही महिला भावना आणि व्यवहार पातळीवर अगदी सखोलतेने विचार करुन निर्णय घेते, कदाचित यशाचं हेच गुपित असावं. नाही का? यामुळेच तिच्यातल्या नव्या प्रतिभेला आणि उद्यमशीलतेला जन्म मिळाला. यामध्ये महाराष्ट्राच्या स्त्रियांनी , मुलींनी नेहमीच बाजी मारली आहे.
या उद्यमशीलतेच्या मूर्तीमंतरुप म्हणजे सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यसेनानी प्रीतीलता वाडेदार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, स्त्रीमुक्ती चळवळीच्या ज्योती म्हापसेकर, मृणाल गोरे, आम्ही उद्योगिनीच्या मीनल मोहाडीकर, क्रिडापटू कविता राऊत तसेच जगातील सर्वोच्च शिखर गाठणारी शितल महाजन, यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय का लेख कदाचित अपूर्णच राहील. कारण महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या जडणघडणीत या सर्व महिलांचा मोलाचा सहभाग आहे. कालानुरुप कधी चौकटीत राहून तर कधी चाकोरी बाहरचा विचार करुन स्वत्वाच्या कक्षा रुंदावत तिचे यश भुरळ घालणारे असेच म्हणावे लागेल.
”भारताची नारी, किर्ती तिची भारी,
प्रेरणास्त्रोत विश्वासाठी, माणूस म्हणून सुजाणती किती”
आजही तिच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा दिवसागणिक वाढतोच आहे. आणि वाढतच राहणार आहे. ज्यावेळेला आपण समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रीयांविषयी ऐकतो, त्यांच्याविषयी वाचतो, पाहतो त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड संघर्ष. कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीची रचना किंवा अन्य कोणत्या समाजिक बाबी असतील परंतु स्त्रीला स्वत:ची कर्तबदारी पावलोपावली सिध्द करावी लागली.
इथून पुढे सुद्धा जेव्हा महिला वर्ग अडचणीत असेल त्यावेळी आद्य कर्तव्य म्हणून तिला सर्वार्थाने त्यातून बाहेर काढून मुक्तपणे तिला तिचा अधिकार उपभोगून दिला तरच समानतेची व्याख्या स्पष्ट होईल आणि सार्थ ठरेल. विशेषत: खेडोपाड्यात याची सक्षमरित्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व पुरुष मंडळी ही खांद्याला खांदा लावून स्त्रीच्या उद्धारासाठी कार्य करतील अशी माफक आशा आणि अपेक्षा करावयास काहीच हरकत नाही. कारण सावित्रीबाई फुलेंच्या जीवनविकासासाठी ज्योतिबा फुलेंनीच पुढाकार घेतला होता तेव्हाच सावित्रीच्या निडर लेकी या भारतात निर्माण झाल्या आणि महिला क्रांतीच्या युगाला सुरुवात झाली. हे सर्व आज सांगण्याचं तात्पर्य हेच की कोणत्यातरी विशेष दिनाचे किंवा महिन्याचे औचित्य साधून तिचा उदो उदो नको तर मनापासून तिचे कार्य स्वीकारून त्याला दाद देत केलेला सलाम हेच तिच्या कर्तृत्वाचे यश ठरेल.
— सागर मालाडकर
Leave a Reply