लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार डॉ. सदानंद मोरे (देहूकर) यांचा जन्म २५ जून १९५२ रोजी झाला.
महाराष्ट्राच्या राजकारण ,समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक , भाष्यकार , संशोधक आणि विचारवंत असलेले डॉ. सदानंद मोरे यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या वंशात झाला. वडील श्रीधरबुवा मोरे संत साहित्याचे अभ्यासक आणि आई संस्कृत शिक्षिका. या कौटुंबिक पार्श्वभूमीवर देहू येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी डॉ. सदानंद मोरे पुण्यात आले. एस पी कॉलेज मधून तत्वज्ञान विषयात एम ए पदवी संपादन केली. पुढे अहमदनगर येथे न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणून काम करत असतानाच प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास हा विषय घेवून त्यांनी पुणे विद्यापीठाची एम ए पदवी मिळवली. तसेच १९८२ मध्ये पुणे विद्यापीठाची तत्वज्ञान विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता गीता -कर्माची उपपत्ती (‘ गीता – थेरी ऑफ ह्युमन अँक्शन‘) या प्रबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला.
पुढे त्यांनी कृष्ण व्यक्ती आणि कार्य’ युजीसी करिअर अँवार्ड अंतर्गत शोधप्रकल्पात सहभाग घेतला. १९८५ मध्ये पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात व्याख्याता व प्रपाठक म्हणून रुजू झाले. पुढे प्राध्यापक झाल्यावर काहीकाळ तत्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख पदाचा कार्यभार ही सांभाळला. विद्यापीठामधील व बाहेरील विविध संस्था व समित्यांवर काम करत असतानाच राजकारण,समाजकारण,धर्मकारण विषयक विविध विषयावरील लेखन, व्याख्याने, चर्चासत्रात सहभाग चालूच होता. साप्ताहिक सकाळ मध्ये तुकारामांवर लिहिलेले लोकप्रिय सदर १९९६ मध्ये तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. या पुस्तकाला साहित्य अकादमी सह अन्य अनेक पुरस्कार मिळाले. या पुस्तकाने महाराष्ट्राला संततुकारामांची आणि वारकरी संप्रदायाची नव्याने ओळख झाली.
यानंतर शिवधनुष्य समजला गेलेल्या लोकमान्य ते महात्मा या प्रकल्पाला सुरवात झाली. बहुशाखीय आणि अनेक जणांनी एकत्र येवून पूर्ण करणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प सरांनी एकट्याने पूर्ण केला. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्वांतरण टिळकांकडून गांधीजींकडे होत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा समोर गेला याचा पट साप्ताहिक सकाळ मधून दोन वर्ष चाललेल्या लेखमालेतून मांडला. हि लेखमाला पुढे लोकमान्य ते महात्मा या नावाने दोन खंडात ग्रंथ रूपाने प्रकाशित झाली .हा ग्रंथ राजकीय सामाजिक इतिहासाचा एक संदर्भ ग्रंथ ठरला असून इथून पुढे महाराष्ट्राच्या या कालखंडातील राजकीय ,सामाजिक इतिहासावर भाष्य करायचे असल्यास या ग्रंथाचा परामर्ष घेणे अनिवार्य ठरलेआहे.
सध्या महाराष्ट्राच्या प्रकृतीची विविधांगी चिकित्सा करणारी ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ नावाची लेखमाला साप्ताहिक सकाळ मध्ये चालू होती.
या शिवाय अनेक पुस्तकांचे लेखन ,सहलेखन ,संपादन ,सहसंपादन सरांनी केले आहे .अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. अनेक जणांना माहित नसलेली अशी डॉ. सदानंद मोरे यांची अजून एक ओळख आहेती म्हणजे – नाटककार व कवी. संदर्भाच्या शोधात, बखर, वाळूचे किल्ले हे तीन कविता संग्रह प्रकाशित झालेले असून ‘ उजळल्या दिशा ‘ हे बौध्द तत्वज्ञानावर आधारित नाटकही लिहिले आहे. हे सर्व करत असताना कोणत्याही वाद अथवा गटाला धरून न रहाता स्वताला जाणवलेले सत्य डॉ. सदानंद मोरे प्रांजळपणे मांडत राहिले . त्यामुळे संघाच्या विवेक पासून साने गुरुजींच्या साधना पर्यंत नेक नियतकालिकातून ते प्रसंगोत्पात लिहित असतात. विविध प्रकारच्या लेखन प्रकारां बरोबरच वक्तृत्वाचेही विविध प्रकार सरांनी हाताळले आहेत. डॉ. सदानंद मोरे यांचे वक्तृत्व अवघड गोष्टी सहज करून मांडणारे आहे. त्यांची शैली श्रोत्यांशी संवाद साधत विषय हळुवार उलगडत नेते. त्यामुळे अवघड ,क्लिष्ट विषयातही लोक रमून जातात. हि शैली वारकरी कीर्तन प्रकाराशी मिळती जुळती आहे. विविध व्यासपीठावरून व्याख्यान, निबंध वाचनापासून कीर्तन,प्रवचनापर्यंत अनेकमाध्यमातून डॉ. सदानंद मोरे व्यक्त होत रहातात.
डॉ.सदानंद मोरे घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. तसेच डॉ.सदानंद मोरे यांच्या’उजळल्या दिशा’ या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार मिळाले होते.
Leave a Reply