गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचा जन्म १९२९ सालात सांगली येथे झाला.
गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले मोहन रानडे हे मराठी कार्यकर्ते होते. गोवा मुक्ती मोर्चामध्ये मोहन रानडे यांचे महत्वाचे योगदान होते. या मुक्तीसंग्रामामध्ये आझाद गोमंतक दलाचे नेते अशी त्यांची ओळख होती. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी लढणाऱ्या रानडे यांना पोर्तुगाल सरकारने २६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच गोवा मुक्त झाल्यानंतरही त्यांना १४ वर्षे तुरुंगात रहावे लागले होते. गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले.
रानडे यांची पोर्तुगाल सरकारच्या तावडीतून सुटकेसाठी तत्कालीन विरोधीपक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठवला होता. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनी व्हॅटिकन सीटी येथे पोपची भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर रानडे यांची सुटका झाली होती.
दरम्यान, रानडे यांच्या सुटकेसाठी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ची स्थापनाही करण्यात आली होती.
मोहन रानडे यांच्या गोव्याच्या मुक्ती संग्रामातील योगदानाबद्दल गोवा सरकारने त्यांना ‘गोवा पुरस्कारा’ने गौरविले होते. तसेच भारत सरकारनेही त्यांचा ‘पद्मश्री’ने गौरव केला होता.
रानडे यांनी गोवा मुक्तिसंग्रामावर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तर ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तकही लिहिले आहे.
मोहन रानडे यांचे २५ जून २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply