कृष्णा सरीन नावाची एकोणीस वर्षांची लखनौमधील मुलगी, आई-वडील आपल्याला टॅलेंट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला जाऊ देत नाही म्हणून दिवसभर उपाशी राहिली.. शेवटी तिला परवानगी मिळाली व ती मुंबईला पोहोचली. त्या स्पर्धेत, ती यशस्वी झाली व तिला पहिला चित्रपटही मिळाला.. व त्याचे मानधन हे पारितोषिक स्वरुपात होते, तब्बल २५ हजार रुपये!!!
१९५१ साली ‘काली घटा’ हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.. त्याचे नायक व दिग्दर्शक होते, किशोर साहू! या चित्रपटापासून ती ‘बिना राय’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिचा जन्म झाला होता, पाकिस्तान मधील लाहोर मध्ये. फाळणीनंतर तिचं कुटुंब लखनौला स्थलांतरित झालं होतं.
१९५३ साली ‘सॅमसन ॲण्ड डिलाइला’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित ‘औरत’ या चित्रपटात प्रेमनाथ हा तिचा नायक झाला. शुटींग दरम्यान बिना, ही प्रेमनाथ समोर लाजत असे.. तिचं हे ‘घायाळ’ करणारं लाजणं, पाहून तो तिला म्हणाला देखील, की तू लग्न करुन संसार कर.. हे क्षेत्र लाजणाऱ्यांचं नाहीये.. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दोघांचंही प्रेम फुललं व त्यांनी २ सप्टेंबर १९५२ रोजी लग्न केलं.
त्याकाळी देव आनंद व राज कपूरपेक्षा प्रेमनाथला मिळणारं मानधन, हे अधिक होतं. प्रेमनाथने स्वतःची ‘पीएन फिल्म्स’ ही चित्रपट निर्मिती संस्था सुरु केली. त्याद्वारे ‘शगुफा’ची निर्मिती केली. मात्र या दोघांची जोडी, प्रेक्षकांना काही पसंत पडली नाही. चित्रपट अपयशी ठरला.. अजूनही पुढील चार चित्रपट, असेच पडले. ही गोष्ट प्रेमनाथला सहन झाली नाही.. कारण बिना व प्रदीप कुमार यांचा ‘अनारकली’ तुफान लोकप्रिय झाला.. ‘घुंघट’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ताजमहल’ ने तर चार चांद लावले..
हे सर्व पाहून प्रेमनाथला नैराश्य आलं. तो कुणालाही न सांगता हिमालयात गेला. इकडे बिना, दोन्ही मुलांचं संगोपन करीत, संसाराची जबाबदारी पार पाडून चित्रपटांतून कामं करीत राहिली. १९६६ साली ‘दादी माॅं’, १९६७ साली ‘राम राज्य’, १९६८ साली केलेला शेवटचा चित्रपट ‘अपना घर अपनी कहानी’ हा होता..
बिनाची, मोजून अठरा वर्षांची कारकिर्द ही सुमारे तीस चित्रपटांचीच झाली. ती खरी सुसंस्कृत स्त्री होती. तिने घर सांभाळून चित्रपटात, कामं केली. एक चित्रपट वगळता, तिने मुस्लीम अभिनेत्यासोबत कधीही चित्रपट केले नाहीत. ‘अनारकली’चं यश पाहून तिला ‘मुघल ए आझम’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं, तिने नम्रपणे नकार दिला.
प्रेमनाथ काही वर्षांनंतर हिमालयातून परत आले. त्यांनी पुन्हा चित्रपटात कामं करणं सुरु केलं.. मात्र आता त्यांच्या भूमिका या नायकाच्या नसून खलनायकी व चरित्र अभिनेत्याच्या होत्या. दरम्यान त्यांचा मोठा मुलगा, प्रेम किशन याने १९७७ साली ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटातून पदार्पण केलं. चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला.
३ नोव्हेंबर १९९२ रोजी प्रेमनाथ स्वर्गवासी झाले. बिना, आपल्या धाकट्या मुलाकडे, माॅन्टीकडे राहू लागल्या. मोठ्या मुलाने दूरचित्रवाणीवर काही मालिका केल्या.
६ डिसेंबर २००९ रोजी ही ‘अनारकली’ जग सोडून निघून गेली. ‘ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया..’ हे गाणं कानावर पडलं की, बिना रायच आठवते.. अशी ‘अनारकली’ पुन्हा कधीच होणार नाही…
बिना राय व प्रेमनाथ यांची लग्नानंतरची चित्रपट कारकिर्द ही १९७३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ व जयाच्या ‘अभिमान’ चित्रपटाशी सुसंगत आहे.. आपली पत्नी आपल्याच क्षेत्रात अधिक यशस्वी होते आहे हे सहन करणं, पतीला अवघड जातं…
कदाचित हिमालयातून परतताना, प्रेमनाथच्या मनात याच ओळी घोळत असाव्यात.. ‘तेरे ‘बिना’ जिंदगी से कोई, शिकवा.. तो नहीं.. शिकवा नहीं..’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-६-२२.
Leave a Reply