एकूण या तिन्ही मान्यवरांनी मला रियाजाकडे वळविले. पण एखादी गोष्ट जोरात सुरू होण्यासाठी एखादा जोरदार धक्का लागतो. माझे वडील चिंतामण जोशी हे निवडणूक जिंकून लायन्स क्लब इंटरनॅशनलचे मुंबईचे गव्हर्नर म्हणून निवडून झाले. त्यांचा शपथविधी समारंभ अमेरिकेत होणार असल्याने ते आणि माझी आई असे दोघेही अमेरिकेला गेले. मी एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण घर पुढील २५ दिवसांसाठी मला मिळाले. मग काय, माझा परममित्र विवेक दातार याची हार्मोनियम, तबलजी मित्र उपेंद्र पेंडसे, समय चोळकर यांचा तबला आणि सध्याचा आघाडीचा शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत गायक सुरेश बापट या सर्वांचाच तळ आमच्या घरात पडला. त्यात सध्याचा प्रख्यात शहनाई वादक शैलेश भागवत, आजचा प्रसिद्ध नाट्यसंगीत गायक मुकुंद मराठे, आजचा प्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव आणि असे अनेक गायनप्रेमी मित्र सामील झाले. त्या सलग २५ रात्री कोणीही झोपले नाही. सतत गाणे, वाजवणे मग इतर कलाकारांच्या रेकॉर्डस् ऐकणे असा कार्यक्रम सुरू होता. त्या २५ रात्री आम्ही सगळे आकंठ संगीत प्यायलो. त्यात बुडालो. जगणेच गाणे असावे ही स्थिती अनुभवली. रियाजाचा हा धडाका पुढे चालूच राहिला. दरम्यान व्ही. जे. टी. आय. मध्ये माझ्या इंजिनिअर मित्रांचा एक मस्त ग्रुप जमला होता. श्रीधर काणे, गिरीश कंदलकर, गिरीश केतकर, राजेंद्र पवार, शिशिर चव्हाण, विवेक दातार, राजू राजगुरू, योगेश दळवी आणि महेश देशपांडे ही सगळी मित्रमंडळी हॉस्टेलवर रहायची. आपल्याला संपूर्ण तीन तासांचा गझलचा कार्यक्रम सादर करता यावा अशी माझी इच्छा होती. त्यासाठी सतत तीन तास गाण्याचा स्टॅमिना तयार करणे आवश्यक होते. मी आणि विवेक जवळच ठाण्याला रहात असल्याने आम्हाला हॉस्टेल नव्हते. पण आम्ही कॉलेज संपल्यानंतर हॉस्टेलवर थांबायचो आणि संपूर्ण रात्रभर गझलचा कार्यक्रम सादर करायचो. मित्रमंडळींची दिलखुलास दाद आणि काही उपयुक्त सूचनाही मिळायच्या. सिव्हील इंजिनीयरींगच्या मित्रांचाही वेगळा ग्रुप होता. त्यात परशुराम करावडे, अनंत कदम, प्रमोद कांबळे, सुप्रभा मराठे, गणेश शेट्टी, प्रद्युम्न पटवर्धन, शिरीसकर, अफजलखान अशी अनेक मित्रमंडळी होती. व्ही.जे.टी. आय. जवळच माटुंग्यामध्ये असलेल्या फाईव्ह गार्डन्स्च्या लॉनवर कधी दुपारी, कधी संध्याकाळी मी गाण्याच्या अनेक मैफिली केल्या. सध्या या मित्रांपैकी बरीच मंडळी परदेशात आहेत. पण आजही व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे आम्ही टचमध्ये आहोत. या मैफिलींच्या सुखद स्मृती माझ्याइतक्या या सर्वांच्याच मनात अजून ताज्या आहेत. मनापासून प्रेम करणारे मित्र तुम्हाला मिळणे आणि त्यांचा प्रेमळ सहवास अखंड लाभणे ही तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. ईश्वराच्या आशीर्वादाने ही श्रीमंती मला खूप लाभली आहे. आमचे काळे सर देखील आम्हा सर्व शिष्यांना घेऊन टिटवाळ्याला प्रसिद्ध गणपती मंदिरात जात आणि संपूर्ण रात्रभर तेथे कार्यक्रम करीत. श्री. बाळासाहेब रानडे हे आमचे तबलजी होते. ते रेल्वेमध्ये नोकरीला होते. मुंबई लोकलच्या गर्दीमधून तबले, तंबोरे अशी वाद्ये नेणे ही एक मोठी अडचण असे. बाळासाहेबांच्या ओळखीमुळे वाद्ये घेऊन मी आणि विवेक रेल्वेगार्डच्या डब्यातून प्रवास करायचो. हा एक फार मजेशीर अनुभव असायचा. यामुळे गाण्याची सर्व वाद्ये घेऊन लोकल रेल्वे गार्डच्या डब्यातून प्रवास करणारा संपूर्ण भारतातील पहिला गझल गायक असा रेकॉर्ड माझ्या नावावर जमा झाला. या टिटवाळ्याच्या कार्यक्रमात रात्रीचे राग गायले जावेत असा सरांचा आग्रह असे. प्रत्येक रागाची गायची वेळ आपल्या गायन शास्त्रात नमूद केलेली आहे. रात्री बारापासून पहाटेपर्यंतचे राग त्यामुळे क्वचित ऐकायला मिळतात.
पं. वासुदेव जोशी, श्रीहरी भिडे, विदुला भागवत, पुरुषोत्तम आगवण, प्रकाश चिटणीस, शिरीष पाटणकर, सौ. भिडे, अरूण जोशी, सौ. होनवाड, सुतवणी, मंगल काळे, हार्मोनियम वादक विवेक दातार आणि इतर कित्येक कलाकार संपूर्ण रात्रभर टिटवाळ्याचे गणेश मंदिर स्वरमय करीत असत. त्यानंतर सर्वात शेवटी आमचे काळे सर एखादी नवीन बंदिश गात असत. पहाटे पहाटे सरांचा स्वर ऐकताना देहभान हरपत असे. आम्हा सर्व कलाकारांच्या स्वरमय पूजेनंतर त्या गणेशावर या बंदिशीचे लाल जास्वंदीचे फूल सर अर्पण करीत असत. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होई. अशा स्वरमय क्षणांनी माझे आयुष्य किती समृद्ध केले ते कसे सांगू तुम्हाला? त्या क्षणांचे साक्षीदार असलेले काळे सरांचे विद्यार्थीच ते समजू शकतील.
या गणेशाच्या आशीर्वादाने कॉलेजचे शेवटचे वर्ष अत्यंत चांगले गेले. इंडिया कल्चरल लीग आणि ‘कालिदास संगीत स्पर्धा’ या दोन्ही स्पर्धांमध्ये तसेच आय.आय.टी.च्या ‘मूड इंडिगो’ या स्पर्धेत मी पहिला नंबर मिळवला. ‘कालिदास संगीत स्पर्धे’च्या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सुप्रसिद्ध सतार वादक उस्ताद हलीम जाफर खान यांच्या हस्ते मी स्वीकारली. सतार वादनात जाफरखानी बाज असा स्वतंत्र बाज निर्माण करणाऱ्या या थोर कलाकाराची भेट आणि त्यांचे मार्गदर्शन हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतील घवघवीत यशामुळे व्ही.जे.टी.आय. चा स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मला मिळाला. सिव्हील इंजिनियरींगची परीक्षाही मी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालो. या सर्व वर्षात अगदी परीक्षा सुरू असतानाही मी कधीही गाण्याच्या रियाजात खंड पडू दिला नाही.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply