निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे. त्यांना दोन बायका होत्या. त्या निवर्तल्या तेव्हा त्यांना संसारापासून विरक्ती आली. ते बाळाजीपंत देव (निरंजनस्वामी) यांच्याकडे आले व प्रार्थनापूर्वक म्हणाले, शरण आलो आहे, संसार न लगे. तेव्हा देवांनी त्यांना पोटाशी धरून बोध केला. विरक्तीची परीक्षा घेतली. पुढे त्यांना सांगितले की, श्वसुरघरी जाऊन, सोयर्या-धायर्यांकडे भिक्षावृतीने जावे, त्याप्रमाणे ते बीडला गेले व भिक्षा मागू लागले. सोयर्यांची बोलणे सोसून मिळाले ते धान्य त्यांनी निरंजनस्वामींपुढे आणून ओतले. तेव्हा स्वामीही सद्गदित झाले. त्यांनी त्यांची पाठ थोपटून आशीर्वाद दिला. संस्कृतचे ज्ञान मिळवून गणेशपुराणावर टीका करण्याची आज्ञा केली. गुरुच्या आज्ञेवरून लिहिलेली गणेशगीता-टीका प्रासादिक आहे. हा ग्रंथ त्यांनी नामलगावी शके १६५१ जेष्ठ व. ४ ला पूर्ण केला. ग्रंथ पूर्ण करताना त्यांनी ज्ञानदेवांप्रमाणेच पसायदान मागितले आहे.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply