नवीन लेखन...

ती पाहताच बाला

शाळेत असल्यापासून मला वाचनाचं वेड होतं. बाबा कदम यांच्या अनेक कादंबऱ्या मी वाचनालयातून आणून, वाचून काढल्या. त्यातील ‘ज्योतिबाचा नवस’ ही कादंबरी मला विशेष आवडलेली होती. मी दहावीला असताना त्या कादंबरीवर आधारित ‘ज्योतिबाचा नवस’ हा चित्रपट विजय टाॅकीजला प्रदर्शित झाल्यानंतर मी पाहिला. त्यातील नायिका होत्या, पद्मा चव्हाण!!
‘कल्पनेचा कुंचला, स्वप्नरंगी रंगला..’ हे जगदीश खेबुडकर यांचं गीत, निसर्गरम्य पन्हाळागडावर पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रीत केलेलं होतं.. तेव्हा पद्मा चव्हाण यांना मी प्रथम पडद्यावर पाहिलं..

काॅलेजनंतर नाटक व चित्रपटांसाठी जाहिराती करु लागलो. १९८३ साली गजानन सरपोतदार निर्मित, ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती केल्या. त्या चित्रपटात पद्मा चव्हाण यांनी, जावई अशोक सराफच्या खाष्ट सासूची धम्माल भूमिका केली होती..

‘अष्टविनायक’ चित्रपटात राजा गोसावींच्या बेरकी बहिणीच्या भूमिकेत त्याच होत्या. ‘सदमा’ चित्रपट पाहताना, हा ‘मराठी चेहरा’ लगेच ओळखू आला.. ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ चित्रपटात दादांनी, ‘दोन चव्हाण’ एकत्र आणण्याचं धाडस केलं होतं..

अशा या पद्मा चव्हाणांचा जन्म, कोल्हापूर येथील सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या कुटुंबात ७ जुलै १९४४ रोजी झाला. त्यांना शालेय शिक्षणात रस नव्हता.. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी शाळेला ‘रामराम’ ठोकला. चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच. तशी संधी त्यांना १९५९ साली, भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ मधून दिली. त्यानंतर ‘अवघाची संसार’ हा सुपरहिट चित्रपट मिळाला आणि एकापाठोपाठ एक चित्रपटांची रांगच लागली.. त्यांचा कणखर आवाज व परखड स्वभाव या वैशिष्ट्यांमुळे त्या इतर नायिकांपेक्षा वेगळ्या वाटल्या.. ‘आधी कळस मग पाया’, ‘लाखात अशी देखणी’, ‘अनोळखी’, ‘नेताजी पालकर’, ‘आराम हराम आहे’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘जावयाची जात’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘घायाळ’, ‘घाबरायचं नाही’, ‘अशी असावी सासू’ पर्यंत त्यांनी सुमारे २८ चित्रपट केले.

हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांचा दबदबा होता. ‘आदमी’, ‘कश्मीर की कली’, ‘नागिन और सपेरा’, ‘नरम गरम’, ‘जीवन धारा’, ‘आदमी सडक का’, ‘जिंदा दिल’, ‘अंगुर’ असे अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

‘लग्नाची बेडी’ या नाटकातील पद्मा चव्हाण यांची ‘रश्मी’ ज्यांनी पाहिली ते खरंच भाग्यवान!! ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..’ या काव्यपंक्तीनुसार त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचा ‘कलिजा’ शब्दशः खलास होत असे.. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लीन मन्रो’ व ‘सौंदर्याचा ॲ‍टमबाॅम्ब’ ही उपाधी दिली होती..
‌‌
‘गुंतता हृदय हे’ नाटकातील ‘कल्याणी’, ‘माझी बायको माझी मेहुणी’ मधील ‘रसिका’, ‘सखी शेजारिणी’ मधील ‘सुमन सातपुते’ यांना कुणीतरी विसरणं शक्य आहे कां?

सिने दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी पद्मा चव्हाण यांचं १९६६ साली लग्न झालं. तोरणे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. त्यांनीच सुरु केलेल्या ‘प्रेम चित्र’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘आम्ही दोघं राजा राणी’ या चित्रपटाची निर्मिती झाली होती.

१२ सप्टेंबर १९९६ रोजी ‘अशी असावी सासू’ या चित्रपटाचे शुटींग आटोपून मुंबईला परतत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला व वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी, पद्मा चव्हाण हे चतुरस्त्र अभिनयाचं वादळ शमलं..

एखादी दंतकथाच वाटावी, अशा या अभिनेत्रीला जाऊन कॅलेंडरची सव्वीस वर्षे पलटलेली आहेत.. जिच्या रंगमंचावरील प्रवेशाला, प्रेक्षकांचा ‘कलिजा’ खलास व्हायचा.. ती पिढी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. आताच्या पिढीत कुणा सौंदर्यवतीला पाहून ‘कलिजा’ खलास होत नाही, ‘हार्ट ब्रेक’ होतो…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

७-७-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..