नवीन लेखन...

बाबल्याची गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २)

बाबल्याचे वडिल गेले आणि घरांत दोघंच राहिली.बाबल्या देहाने आणखीच थोराड वाटू लागला.बाबल्या जरी अभ्यासांत मंद होता तरी दुसऱ्यांना जाणूनबुजून त्रास देणारा वाह्यात मुलगा नव्हता.तो भोळसट होता.सिनेमातल्यासारखी नाटकी मारामारी त्याला आवडे पण तो खऱ्या मारामारीत पडणारा नव्हता.तो जे कांही पहायचा त्याचा त्याच्या मनावर असा प्रभाव पडे की त्याला अनुकरणाचा, तसंच करून पहायचा मोह होई.त्यामुळे त्याचा कुणाला उपद्रव नव्हता.

मात्र एकदा तो अंधेरीत धोबीघाटावर आलेली सर्कस पाहून आला.त्यातले विदूषक आणि त्यांचे विदूषकी चाळे पाहून बाबल्या चेकाळला.दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास त्याने चेहऱ्याला राख फासली, डोक्यावर हॕट घातली, एकुलती एक तोकडी फुलपँट घातली, नाकाच्या शेंड्याला लाल शेंदूर लावला, हातात एक काठी घेतली आणि टारारा पापापा असा विदूषकी आवाज करत तो वाडीत फिरायला निघाला.त्याचं विदूषकाचं सोंग विचित्रच वाटत होतं.वेळ रात्रीची साडे-सात आठची होती.पूर्वी आजच्यासारखा दिव्यांचा चमचमाट नव्हता.बंगल्याच्या जिन्यावर तर दिवे नव्हतेच.बाबल्याच्या मनांत काय होतं कोण जाणे !वाण्याच्या दुकानासमोर तो फिरला.वाण्याच्या नोकरांनी त्याला ओळखले, त्याची थोडी थट्टा केली, हंसले.बाबल्याला ते उत्तेजनच वाटले असावे.तिथून तो पुढे मालकाच्या बंगल्याच्या जिन्याकडे गेला आणि जिना चढू लागला. दुसऱ्या मजल्यावर मालकाच घर होत त्याला जिन्याशी छोटं फाटक होतं.बाबल्या काठी आपटत आवाज करत वर गेला आणि त्याने त्या फाटकाची कडी वाजवली आणि मग कडी काढून तो आंत गेला.मालकाच्या घरांत खूप गोतावळा होता.मालकाच्या मुलींपैकी कुणीतरी बाबल्याला पाहिलं आणि ओळखलंच नाही.मुली विशीच्या पुढल्या होत्या पण अतिशय भित्र्या.बाबल्याला वाटलं होतं आपल्या सोंगाच कौतुक होईल.पण झालं भलतचं.ती मुलगी “भूत, भूत, चोर, चोर” म्हणून किंचाळू लागली.मालकाच्या घरचे सर्व सावध झाले.पण घाबरून प्रथम कोणीच पुढे येईना.दार बंद करून बसले.पण बाबल्याच्या आवाजावरून कोणीतरी त्याला ओळखले.हा बाबल्या आहे, कुणी प्रतिहल्ला करेल असा चोर नाही हे लक्षात आल्यावर ते शूर होऊन बाहेर आले व सर्वांनी जे हातात मिळाले त्याने बाबल्याला झोडपायला सुरूवात केली.आता बाबल्या कळवळून ओरडू लागला.तेरा-चौदा वर्षाचा पोरगा.मालकाच्या घरांतील सहा सात तरूणांनी त्याला हवा तसा तुडवला.

बाबल्याचं विव्हळणं माझ्या आईच्या कानानी बरोबर टिपलं.ती तीरासारखी वर धावत गेली.त्यांच्यामध्ये पडून तिने बाबल्याला बाजूला काढला.तोपर्यंत पहिल्या मजल्यावरच्या कुटुंबातील माणसंही तिच्या मदतीला आली.आईने मालकाच्या मुलांना जाब विचारायलाही कमी केलं नाही.ती सर्व परत घरांत जाऊन कडी लावून बसली.बाबल्याच्या आईच्या कानावर बातमी गेली.तीही धांवत आली.ती आणि माझी आई बाबल्याला त्यांच्या घरी घेऊन गेल्या.बाबल्याच्या अंगावर माराचे वळ उठले होते.त्याला मलम लाऊ लागल्या.पुढे दोन दिवस बाबल्या विव्हळत होता आणि त्याची आई कळवळत होती.बिचाऱ्या बाबल्याच्या विदूषकाच्या सोंगाचा शेवट आनंददायी होण्याऐवजी दुःखपर्यवासी झाला.

बाबल्याची शाळा सुटलीच होती.बाबल्याच्या आईच्या सांगण्यावरून माझी आई त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असे.त्याला दम भरत असे.पण बाबल्या दुर्लक्ष करत असे.भरपूर सिनेमा पहायचे, रेडीओवर गाणी ऐकायची, हॉटेलात जाऊन भरपूर खायचं, या गोष्टीत तो गुंग असे.त्याची आई पूर्वी त्याला मारत असे.पूर्वी बहुतेक पालकांचा शिस्तीसाठी मार देण्यावर विश्वास असे.पण आता मोठा झालेल्या बाबल्याला मारणं त्याच्या आईला शक्य होईना.बाबल्याचे वडिल गेल्यानंतर त्याच्या आईलाच पैशाचे व्यवहार बघायला सुरूवात करावी लागली.एऱ्हवी ती भाजी आणायलाही जात नसे.पतिच्या निधनाने
खचली होतीच.पण आता तिला बाबल्याची काळजी सतावू लागली.आमच्या आईचा तिला खूप आधार वाटे.लहान सहान बाबतीत तिला आईचा सल्ला हवा असे.त्या एक दोन वर्षात त्यांची मैत्री अधिक बळावली.आमच्या आईचही त्यावेळी खस्ता काढणं चालू होतं.बेतास बात परिस्थिती.वडिलांना कायमस्वरूपी नोकरी नव्हती.त्यामुळे ती स्वतःपुढच्या प्रश्नांचा मुकाबला करतानाच थकून जायची.तिलाही आपल्या तीन मुलांची काळजी होतीच.अशा परिस्थितीत ती बाबल्याच्या आईला तिचं ऐकून घेण्यापलिकडे काय मदत करणार?

बाबल्याचे वडिल वारल्यानंतर दोन वर्षे व्हायला आली असताना एका मध्यरात्री तो प्रकार घडला.आमच्या दारासमोरच्या विहीरीवर एकदम लोकांचा मोठा गलबला ऐकू येऊ लागला.वाडीतले बाहेरचे खूप लोक तिथे जमा झाले होते.मी बाहेर ओटीवर येऊन आईच्या बाजूला उभा राहून भयभीत होऊन पहात होतो, ऐकत होतो.कुणी म्हणत होतं,”कुणीतरी पाण्यात पडल्याचा आवाज झाला”.कुणी म्हणत होतं,”कुणीतरी जीव दिला वाटतं?”तोपर्यंत एका धीट बलदंड माणसाने विहिरीत उडी टाकली.मग आणखीही एक दोन जण विहीरीत उतरले.त्या इसमाने बाबल्याच्या आईचा देह वर काढला.तिच्या पोटातले पाणी काढायचा प्रयत्नही करण्यात आला.पण खूप उशीर झाला होता.तिचा देह सरदारजींच्या (सुताराच्या) दुकानामागे असलेल्या नव्या घडवंचीवर ठेवण्यात आला.अजून माझ्या डोळ्यांसमोर ते दृष्य जसंच्या तसं येतं.पोलिस आले. पंचनामा झाला.रात्रभर सगळे सोपस्कार चालले होते.

आमच्या आईला तर खूपच मोठा धक्का बसला होता.इतक्या निरूपद्रवी, साध्या, सरळ बाईने जीव कां दिला, हा प्रश्न सर्वानाच पडला होता.काय कारण झालं असावं.अनेक दिवस नाना तर्क करण्यात येत होते.आमच्या आईला धक्का बसायला आणखी एक कारण होतं.ते कुणालाच ठाऊक नव्हतं.ज्या दिवशी बाबल्याच्या आईने जीव दिला, त्याच दिवशी दुपारी आमच्या घरी कोणी नसताना ती आईकडे आली होती.तिने एक मध्यम आकाराचा उभट पितळी डबा आईकडे दिला.आईने त्यात काय आहे विचारले तर ती सांगायला तयार नव्हती.”तुम्ही हे तुमच्याकडे ठेवा.ह्याच्याबद्दल आणखी कुणाकडे कांही बोलू नका.तुम्हाला ह्यात काय आहे ते कळेलचं.”या गूढ बोलण्यामुळे आईचं कुतूहल आणखीच वाढलं.तिने तो डबा तिच्या पुढ्यातच उघडला तर तो सोन्याच्या दागिन्यांनी गच्च भरलेला होता.आई म्हणाली,”नको ग बाई ! ही जोखीम माझ्याकडे नको.तुला चोरीची भीती वाटते काय?माझ्या घरात चोरी होणार नाही कशावरून?”असे अनेक आक्षेप घेऊन आईने ती जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.पण तिने आईच कांहीएक ऐकून घेतल नाही आणि कारणही सांगितलं नाही.तिने एकच धोशा लावला होता,”आता तर तुम्ही ठेवा.दोन तीन दिवसात कळेलच तुम्हाला.”त्यावेळी तिच्या मनांत आत्महत्त्येचा विचार चालू असेल असा किंचितसाही संशय आईला आला नाही.शेवटी “चार दिवसांत याची दूसरी काय व्यवस्था करता येते ते बघ.मी चार दिवसांपेक्षा जास्त हे सांभाळणार नाही.”असं सांगून आमच्या आईने तो डबा ठेवून घेतला आणि आता त्याच रात्री बाबल्याच्या आईने विहिरीत उडी मारून जीव दिला.

आईला त्यामुळे दुहेरी धक्का बसला होता.तिच्यापुढे तीन प्रश्न होते.एक बाबल्याच्या आईने अचानक जीव कां दिला?दुसरा त्याच दिवशी एवढ्या गुप्ततेने बाबल्याच्या आईने एवढं सोन तिच्याकडे कां दिलं होतं?तिसरा प्रश्न होता, आता ह्या सोन्याच पुढे काय करायचं?कांही असो.परंतु त्या काळी म्हणजे १९५० साली ज्यांच्या पोस्टाच्या बचत खात्यांत सुध्दा २०० रूपयेही नसतील अशा कुटुंबाकडे अचानक गुप्तपणे आलेला हा दुसऱ्याचा ठेवा आपण हडप करावा अशी ईच्छा माझ्या आईवडिलांना क्षणभरही झाली नाही.त्यांनी सकाळ होण्याआधीच स्वतःहून पंचाना खरी हकीगत सांगितली.साधारण ६०-७०तोळे किंवा त्याहून जास्त सोन त्या डब्यात असावं.एक सोन्याच्या मोठ्या मण्यांची माळच १५ तोळ्यांची असावी असा आईचा अंदाज होता.कांही असो.पण आमच्या आईवडिलांनी त्या दिवशी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शक ठरेल असा प्रामाणिकपणाचा धडा आम्हाला आपल्या वागण्याने दिला.अंधेरी तेव्हां लहान गांवासारखच होतं.

दुसऱ्याच दिवशी बाबल्याची काळजी घ्यायला विश्वस्त मंडळ स्थापन केलं गेलं.कारण बाबल्या अजून सज्ञान नव्हता.त्याच सोळावं वर्ष चालू असावं.अगदी लहान नव्हता पण कायद्याने लहानात जमा होता.अभ्यासात मागे पडलेल्या बाबल्याला आर्थिक व्यवहारात रस होता की नाही कुणास ठाऊक?पुढे तशी वेळच आली नाही.माझ्या आईवडिलांनी रितसर तो डबा संपूर्ण ऐवजासकट विश्वस्तांच्या स्वाधीन केला.विश्वस्तांच म्हणणं होतं की ज्याअर्थी बाबल्याच्या आईने आत्महत्त्या करण्यापूर्वी तो डबा आमच्या आईकडे दिला, त्याअर्थी तिच्या पश्चात् बाबल्याची काळजी माझ्या आईने घ्यावी अशीच तिची इच्छा असली पाहिजे.तेव्हां आमच्या आईने बाबल्याचा सांभाळ करावा व विश्वस्त त्याबद्दल बाबल्याच्या मालमत्तेतून, विशेषतः हॉटेलमधून येणाऱ्या उत्पन्नातून आईला कांही रक्कम देतील.बाबल्याबद्दल माझ्या आईला आपुलकी, सहानुभूती निश्चित वाटत होती.परंतु आपल्याच मुलांच पालन पोषण करताना ती थकत होती.आमचा एक आत्तेभाऊही आमच्याकडे रहात होता.शिवाय बाबल्याची अभ्यासांतली गती किंवा दुर्गती म्हणा, त्याचं उनाडणं, यांमुळे आपण त्याला संभाळू शकू अशी तिला खात्री वाटत नव्हती.विश्वस्तांनी तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला की या व्यवस्थेमुळे तिलाही थोडा आर्थिक मदत होईल असे पहाण्यात येईल.एवढा मोठा ऐवज परत करणाऱ्या आईला अशा आर्थिक मदतीचं आकर्षण कृसं वाटणार?प्रश्न होता फक्त बाबल्याच्या भवितव्याविषयी वाटणाऱ्या चिंतेचा.परंतु आमच्या आईने मनाचा दगड करून त्याचा सांभाळ करायला नकार दिला.

त्यानंतर विश्वस्तांनी बाबल्याला सांभाळायला म्हणून एक कुटुंबच त्याच्या घरांत आणून ठेवलं.तिथल्या एका खादी-ग्रामोद्योग दूकानात विक्रेता, त्याची पत्नी आणि लहान मुलगा त्या घरांत बाबल्याबरोबर त्याला सांभाळण्याच्या निमित्ताने त्याच्या घरी राहू लागले.बाबल्याच्या आईच्या मृत्यूबरोबरच बाबल्याचे वाईट दिवस सुरू झाले.थोड्याच दिवसांत बाबल्या गॕलरीत झोपलेला दिसू लागला.उंटानी घराचा कब्जा घेतला.घर बाबल्याचं पण बाबल्याच गॕलरीत.बाबल्या बाकी वेळ कसा घालवायचा, काय करायचा कोणास ठाऊक.पण दिवसांतून तीनदा ठराविक वेळेला जाऊन आपल्या हॉटेलमध्ये भरपेट खायचा.हॉटेल मॕनेजर शेट्टीने त्याला पोटभर जेवणापासून कधीच वंचित ठेवलं नाही.तेव्हाही नाही आणि पुढे बाबल्या पूर्ण वेडा झाल्यावरही नाही.

बाबल्याची अवस्था बघून आमची आई हळहळत असे.वर्ष दोन वर्षातच बाबल्याची लक्षणं वेगळीच दिसू लागली.बाबल्याच्या आईने आत्महत्त्या केली आणि त्यानंतर साधारण दहा महिन्यांनी माझ्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला.सुमारे दहा वर्षांनी आम्हाला भावंड घरांत आलं.वाडीतल्या बायका म्हणू लागल्या,”बघा, तुमच्याकडे डबोलं ठेवून गेली होती.तीच आली बघा आता ते परत वसूल करायला.आणि तुम्ही तर ते विश्वस्तांकडे देऊन टाकलतं.”आईची काम खूप वाढली.बाबल्याचा विचार करायला वेळच नाही राहिला.विचार करण्यासारखं आता कांही हातात राहिलंही नव्हतं.बाबल्या गॕलरीत झोपत होता, हॉटेलात जेवत होता आणि एऱ्हवी गॕलरीतच उभा रहायचा.हळू हळू अंघोळ करणं, कपडे धूवून वापरणं बंद झालं होतं.तेवढ्यात कायद्याच्या दृष्टीने बाबल्या सज्ञानही झाला असेल.पण फक्त वयाने. विश्वस्तांची भूमिका यावेळी काय होती कुणास ठाऊक.बाबल्याच घर त्याला सांभाळायला आलेल्या कुटुंबाने पूर्ण ताब्यांत घेतलं होतं.माझ्या आईने बाबल्याच्या आईचे परत केलेले दागिने, इतर चीजवस्तू यांच काय झालं तेही कळलं नाही.एकदा कधीतरी विश्वस्तांपैकी एकाच्या पत्नीच्या गळ्यात आईला ती सोन्याची वजनदार माळ दिसली.किंवा तशीच माळ दिसली असेल.तिला खात्रीने कसं सांगता येणार?पण शंका आली की घर आणि हॉटेल सोडून बाबल्याची सर्व मालमत्ता विश्वस्तांनीच फस्त केली की काय?पण त्या मालमत्तेलाही आता बाबल्याच्या दृष्टीने अर्थ नव्हता.त्याला खाण्याशिवाय कशाचीच गरज वाटत नव्हती.न कुणाशी बोलण्याची गरज वाटत होती.दाढी करणं, केस कापणंही त्याने बंद केलं होतं.बाबल्या वेडा झाला होता.

एक दिवस तो आमच्या घरासमोरून वाडीच्या शौचालयाच्या दिशेने जात असताना माझ्या आईने हातांतल्या पाण्याचे चार दोन शिंतोडे त्याच्या अंगावर उडवून त्याला दम देत विचारले,”काय रे, बाबल्या अंघोळ कां करत नाहीस?”बाबल्या बावचळला, रागावला पण न बोलतां विहिरीवर गेला.कुणाच्या तरी पोहऱ्याने पाणी काढले आणि ते बालदीभर पाणी आणून आमच्या घरांत दणकन् लोटून दिले.आईच्या प्रश्नाला असं उत्तर त्याने दिलं.आई गप्प राहिली.पुन्हां कधी त्याला कांहीं बोलण्याचं धैर्य तिला झालं नाही.बाबल्या आपल्या मार्गाने परत गेला.त्यानंतर बराच काळ बाबल्या तसाच रहात होता.त्याच्या घरांत रहाणाऱ्या कुटुंबाचीही वाताहत झाली.त्या विक्रेत्याला पक्षघात झाला.ते लुळे पांगळे झाले.त्यांचा मुलगा आजारी पडून त्यातच गेला.नोकरीही गेली.शेवटी विश्वस्तांनी त्या दोघांना तिथून हलवलं.पण बाबल्याच्या स्थितीत फरक पडला नाही.शेट्टी मॕनेजर जी जमेल ती काळजी घ्यायचा.दर महिन्याला त्याला पकडून जबरदस्तीने त्याची हजामत करून घेणं, जमेल तितका साफ ठेवणं आणि त्याला पोटभर खायला घालणं ही कामे त्याने बाबल्याच्या अंतापर्यंत इमाने इतबारे केली.अर्थात ते हॉटेल कायमच त्याच्या मालकीचं झालं.

पुढे आम्ही अंधेरी सोडली.फक्त कानोकानी कांही बातमी आली तरच वाडीतली हालहवाल कळायची.अंधेरीला कांही कारणाने जाणं झालं तर वाटेत बाबल्या आपल्या गॕलरीत कठड्याला टेकून उभा असलेला दिसायचा.त्याच्या मनांतल कुणाला कळायचा मार्गच नव्हता.बाबल्याच्या वेडेपणांत कांही फरक पडला नाही.ना कधी त्याला कुणा डॉक्टरनी तपासला ना कुणी त्याच्या वेडेपणावर कांही उपचार केला.बाबल्याला कोणता मानसिक आजार होता कुणास ठाऊक?पण बाबल्या कधी बेफाम झाला नाही.त्याने कोणाला त्रास दिला नाही.फक्त गप्प उभा असायचा.ते कुटुंब गेल्यानंतर रात्रीच जेऊन हॉटेलातून परत आला की घरांत झोपायचा.अनेक वर्षानंतर अंधेरीतच रहाणाऱ्या माझ्या भाच्याने मला सांगितलं की त्याच्या शेट्टी नावाच्या मित्राच्या वडिलांच हॉटेल होतं, त्या हॉटेलचा खरा मूळ मालक गेला.मी भाच्याला विचारलं,”कोण? बाबल्या कां?”तो म्हणाला,”हो, त्याला बाबल्याच म्हणत.”मी त्याच्या मित्राकडे चौकशी केली पण त्यालाही बाबल्याबद्दल इतर कांहीच माहिती नव्हती.आपल्या वडिलांच्या हॉटेलचा मूळचा मालक तो आणि तो वेडा झाल्यावरही वडिलांनी त्याला सांभाळलं एवढच त्याला ठाऊक होतं.बाबल्या वेडा कां झाला?बाबल्याच्या आईने जीव कां दिला? हे प्रश्न माझ्या मनात अनुत्तरीतच राहिले.

एव्हाना मी कथा लिहायला लागलो होतो.अनेकांनी मला बाबल्यावर कथा लिही म्हणून सांगितलं.मीही त्या घटनांचा अनेक अंगानी विचार केला.पण वरील दोन प्रश्न समाधानकारक रित्या सुटल्याशिवाय बाबल्याची गोष्ट पुरी होऊ शकत नाही हे माझ्या लक्षांत आलं.मी लहानपणी ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचे दुवे वेगवेगळ्या प्रकारे जुळवून पाहिले.बाबल्या आणि त्याच्या वयाच्या, म्हणजे पंधरा ते सतराच्या, मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.पौगंडावस्थेतील मुलांची लैंगिक सुखासाठी चाललेली धडपड (विकृत, कुणास ठाऊक?) माझ्या दोन तीनदा दृष्टीस पडली होती.मी तेव्हां लहान होतो.पण त्याचा अर्थ नंतर चांगला कळून आला होता.मग बाबल्याच्या आईच्या जीव देण्याचा संबंध त्या मानसिकतेशी होता काय?बाबल्या आणि त्याची आई यांच्या संबंधात बाबल्याच्या हातून अशी कांही लाजीरवाणी गोष्ट घडली होती काय?थोड्या रासवट, थोराड, भोळसर बाबल्याने अनावर लैंगिक वासनेपायी एकाच खोलीत झोपणाऱ्या आईला लाजीरवाणं वाटाव असा अतिप्रसंग तर केला नसेल ना? इडीपसची गोष्ट वाचल्यानंतर वाटायला लागलं, तसंच असावं.म्हणूनच बाबल्या वेडा झाला असावा.पण पुन्हां वाटायच नाही, नाही.तसं नसावं.बाबल्या साधा होता, सरळ होता.वयानुसार इतरत्र कसाही वागला तरी आईपाशी असलं कांही करण्याची त्याला हिंम्मतच झाली नसती.अजाणपणे तसं करायला तो मतिमंदही नव्हता.मग खरं काय झालं होतं?दुसऱ्या कुणी बाबल्याच्या आईचा गैरफायदा घेतला होता कां?तिला फसवलं होत कां?जीव देण्याआधी दोन दिवस एका संध्याकाळी शेजारीच असलेल्या वकीलाच्या ऑफीसमध्ये बसून रडताना तिला पाहिल्याचेही कुणीतरी नंतर बोललं होतं.कां रडली असेल?वकीलांना कांही माहिती होती असेल कां?आमच्या आईकडे एवढे दागिने देण्यात तिचा काय हेतु असावा?प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न?सुसंगत उत्तर न सापडणारे प्रश्न !आता हा बहिणीने विचारलेला प्रश्न.आपल्या आईने बाबल्याला ठेवून घेतला असता तर तो वेडा न होण्याची शक्यता नव्हती कां?बहिण असाही प्रश्न विचारेल,”तुला पण वाटतं कां की मी म्हणजे पुनर्जन्म घेतलेली बाबल्याची आईच आहे?”आणि यांतल्या एकाही प्रश्नाच उत्तर माझ्याकडे नाही.मग गोष्ट कशी होणार.मग विचार केला की सर्व हकीगत मांडावी आणि मग वाचणाऱ्यांपुढेच आपले प्रश्नही ठेवावेत.वाचक स्वतःच शोधतील या प्रश्नांची उत्तरं.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..