माझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे.
▪
“अध्यक्ष महाशय, मंचावरील मान्यवर आणि बंधु-भगिनीनो, आपण टीव्हीवरची मालिका किंवा क्रीकेटचा सामना बघण्यांत रंगलेलो असतो, पुढे काय होणार हे पहायला अतिशय उत्सुक असतो आणि मध्येच ब्रेक येतो. माझं हे भाषण हा तसाच ब्रेक आहे. तुम्ही सर्व इतर गायकांचं गाणं ऐकायला आतुर असताना संयोजकांनी हा ब्रेक लावला आहे. टी.व्ही. वरच्या ब्रेकचे कांही फायदेही असतात. एक म्हणजे उत्कंठा वाढते. दुसरं म्हणजे गृहिणी स्वयंपाकघरात फेरी मारून पटकन् फोडणी देणं किंवा इतर काम पटकन् आटपून घेतात. मुलांना एखाद्या धड्यावरून नजर फिरवल्याचं खोटं समाधान मिळवतां येतं. पाहुण्यांशी दोन शब्द (दोनच बरं कां) बोलता येतात. एखादी बाथरूमची फेरी मारता येते म्हणजे पुढलं कांही चुकायला नको. या ब्रेकमध्ये सुध्दा आता शक्य असलेल्या अशाच सगळ्या गोष्टी करायला सोय आहे आणि माझी कांही हरकत नाही. टी.व्ही.वरचे ब्रेक आपण सहन करतो कारण ते कमर्शियल असतात. मालिका त्यावरच चालतात. हा ब्रेक मात्र कमर्शियल नाही. भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मला आयोजकांना कांही द्याव लागणार नाही याची खात्री करून घेतली आहे.
▪
संगीताशी माझा संबंध एक अजाण श्रोता असाच आहे. मला गाणं ऐकायला आवडतं किंवा गाणं आवडलं ह्या पलिकडे मी गाण्याबद्दल कांही बोलू शकत नाही. पण मला जेव्हां जेव्हां शक्य होतं तेव्हां तेव्हां मी ह्या गुरूवंदना गृपच्या गुरूवारच्या बैठकांना हजर राहतो. त्या तेवढ्या अधिकारावर हा ब्रेक माझ्याकडे सोपवण्यात आलेला आहे. गाणा-या मंडळीत मी “अॉड मॕन आऊट” आहे. या गुरूवंदना गृपच वैशिष्ट्य असं की यातील सर्व सभासद नोकरीतून निवृत्त झालेले आहेत. साठीच्या थोडे अलिकडे/पलिकडे आहेत आणि संगीताची आवड हा त्यांच्यात समान धागा आहे. माझ्या भाषणांतल एवढच वाक्य लक्षात ठेऊन कार्यक्रमानंतर “संगीता कोणाची हो? देशपांड्यांची की जोशांची” असा प्रश्न कुणी विचारणार नाही अशी आशा आहे. (आशा कोणाची?).
▪
मी माझ्या कार्यक्रमांतून एक गोष्ट माझ्या विद्यार्थ्याना नेहमी सांगतो. एक अमेरीकन कंपनी एका अनुभवी सेल्समनला एका आफ्रीकन देशांत बूट विकायला पाठवते. त्याला तिथे आढळतं की सर्वच अनवाणी रहातात. तो लागलीच कळवतो, “बूट पाठवू नका. विक्री अशक्य. परत येत आहे.” कंपनी मात्र निराश न होता दोन महिन्यांनी दुस-या विक्रेत्याला पाठवते. दुस-याला तिथले सर्व अनवाणी दिसताच तो कंपनीला कळवतो, ” शक्य तेवढा बूटांच्या जोड्या तात्काळ पाठवा. इथे बूट विकायला अमाप संधी आहे.” परिस्थिती तीच पण एकाला त्यातली अडचण दिसते तर एकाला संधी. अनेक निवृत्त आता वेळ कसा घालवणार म्हणून धास्तावतात. तर कांही निवृत्त म्हणतात, “आम्हाला आमचा छंद जोपासायला आता मस्त वेळ मिळणार.” गुरूवंदनाच्या सदस्यांनी हा सकारात्मक विचार केल्याने सातत्याने अकरा वर्षे यशस्वीपणे त्यांचा हा उपक्रम चालू आहे आणि एक तप पूर्ण करण्यासाठी बाराव्या वर्षांत प्रवेश करतो आहे.
▪
मी आधी म्हटल्याप्रमाणे मला संगीतामधील ओ की ठो कळत नाही. राग म्हटल्यानंतर ( राग हा शब्द उच्चारताच) मला प्रथम लोकलमध्ये चौथी सीट द्यायला नकार देणाऱ्याबद्दल जो वाटतो तो राग आठवतो. राग हा शब्द ‘रञ्ज’ (रंज्) या संस्कृत क्रियापदापासून (धातू) आलेला आहे. म्हणजे रंजवितो तो ही राग आणि रंजीस आणतो तोही राग. गाण्यांतला रागात वेगवेगळे रसपूर्ण भाव असतात. गोड रसपूर्ण राग असतात. राग शब्द उलटा वाचला तरी ‘गरा’ गोडच असतो. पण व्यवहारातला राग सगळ्या दृष्टीने तापदायकच असतो. आता राग या एकाच शब्दाचे असे विरूध्द अर्थ कां झाले याबद्दल अनेक तर्क वितर्क करता येतील. पण ते सगळे या ब्रेकमधेच सांगत राहिलो तर तुमच्या गायक मित्रमंडळीनी आळवलेले ‘राग’ ऐकायला आतुर असणा-या तुम्हालाच माझा ‘राग’ येईल आणि मग आजचा रागरंगच बिघडून जाईल.
▪
मी खरोखरच सांगतो ‘गुरूवंदना’ या गृपचा आणि माझा संबंध ‘ऑड मॕन आऊट’ सारखाच आहे. मी वैद्यांचा साडू असल्यामुळे गायक नसूनही मी शक्य असेल तेव्हां गुरूवंदनाच्या बैठकीला हजेरी लावतो. मी जेव्हां जेव्हां त्यांच्या बैठकीला हजर रहातो, तेव्हां एक संस्कृत सुभाषित आठवतं. संसारविषवृक्षस्य द्वे फले ह्यमृतोपमे, संगीतस्य रसास्वादः संगति सज्जनैसह॥ संसाराच्या कटु वृक्षाला अमृताची उपमा देण्याजोगी दोनच फळे आहेत. एक संगीताचा रसास्वाद आणि दुसरा सज्जनांची संगत. मी जेव्हां यांच्या बैठकीत दोन अडीच तास बसतो, तेव्हां मला या दोन्ही अमृतोपमेय फळांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. या सर्वांच गाण्यावरचं निर्व्याज प्रेम आणि त्यांच परस्परांवरील निरपेक्ष प्रेम, यांतल सरस काय असं म्हणण्यापेक्षा त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणूनच हा उपक्रम बंद्या रूपयासारखा अकरा वर्षे खणखणीत वाजतो आहे. या सगळ्यांच्या गाण्याचा आनंद तुम्ही सर्वांनीही पूर्वी घेतलेला आहेच तसा मीही घेतला आहे. पण त्यांच्यात आता जे स्नेहबंध निर्माण झालेत, त्यापासून निर्माण होणारा आनंद अपरिमीत वाटतो.
▪
त्यांचा स्नेह पाहून आणखी एक संस्कृत सुभाषित आठवतं.”नागुणी गुणिनं वेत्ति, गुणी गुणीषु मत्सरी I गुणी च गुणरागी च सरला विरला जनाः II अगुणी म्हणजे अंगी गुण नसलेला माणूस गुणी माणसाला जाणत नाही आणि गुणी माणूस दुस-या गुणी माणसाचा मत्सर करतो. गुणी असणारे व दुस-याच्या गुणांची कदर करणारे सरळ, निष्कपट स्वभावाचे लोक हे कमीच असतात. ‘गुरूवंदना’ गृपच्या बैठकीत उपस्थित राहिल्यावर असे लोक अशा मोठ्या संख्येने एकत्र आलेले पाहून मन भरून पावतं.
▪
संगीत अनादीकालापासून अस्तित्वात आहे, हे जरी खरं असलं तरी त्याचं आजचं स्वरूप हे अनेकांच्या अथक परिश्रमांतून आलेलं आहे.विज्ञानाने एखादा नवा शोध लावला तर तो फक्त कार्यकारणभाव नियमांत बसवतो. ती क्रीया निसर्गात सातत्याने आधीपासून होतच असते. संगीताचही तसंच आहे. पण संगीताचा इतिहास एखाद्या अधिकारी व्यक्तीच सांगू शकेल. पण संगीत सुरेल व्हावं, सुमधुर व्हावं म्हणून अनेक नियम रचले गेले असले पाहिजेत, हे माझ्यासारख्या अनभिज्ञालाही कळतं. संगीतच नव्हे तर कुठलही शास्त्र नियमांशिवाय सिध्द होत नाही. पण या नियमांची मोठी मजा असते. कालांतराने नियम करणा-यांच्या मनांतले उद्देश दुय्यम ठरून नियमांचे मठ्ठ पालनच महत्त्वाचे ठरते. मग ते हास्यास्पद किंवा कंटाळवाणं होतं. एक उदाहरण सांगतो. एका झेन आश्रमांत एक वृध्द गुरूजी प्रवचन करत असत. त्या आश्रमांत आश्रय घेतलेले एक मांजर त्या गुरूजींच्या प्रवचनाच्या वेळी मध्ये मध्ये घोटाळू लागले. तेव्हां गुरूजी म्हणाले, “अरे, त्या मांजराला एका जागी ह्या खांबाशी बांधून ठेवा.” शिष्य धांवले. व त्यांनी मांजर खांबाला बांधले. त्यानंतर रोजच प्रवचनाच्या वेळी मांजराला जवळच खांबाला बांधण्यात येऊ लागले. कालांतराने वृध्द गुरूजी वारले. दुसरे गुरूजी आले. त्यांचे प्रवचन सुरू होण्यापूर्वीच मांजर खांबाला बांधले जाई. कांही वर्षानी ते मांजर वारले. कांही शिष्यांनी विचार केला की प्रवचनाच्या वेळी बांधायला मांजर तर हवेच. त्यांनी दुसरे मांजर आणले व प्रवचनाच्या वेळी त्याला बांधले. नव्या गुरूजींच्या ते दृष्टीस पडले पण शिष्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर तो नियम, ती प्रथा तिथे कायम झाली. अनेक गुरूजी बदलले, मांजरे बदलली पण प्रथा कायम राहिली. दोनशे वर्षांनंतर शिष्य त्या प्रथेचा अध्यात्माशी संबंध शोधू लागले. मांजर हे कशाचं प्रतीक आहे? ते बांधून ठेवणं म्हणजे काय ताब्यांत ठेवायला हवं वगैरे. त्या संशोधनाबद्दल त्यांना एम. फील., पी.एच.डी. सारख्या पदव्या मिळू लागल्या. मूळ कारण राहिलं बाजूला आणि हास्यास्पद प्रथा प्रस्थापित झाली. संगीतात असं होऊ नये याची दक्षता बाळगणा-या गायक- गायिकांची खूप नांवे आहेत.
▪
गुरूवंदना गृपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे की ते आपल्या किंवा संगीताच्या मूळ उद्देशापासून कधीही भटकत नाहीत. खरं तर सुरूवातीला “घरांतले जेष्ठ (म्हातारे) कुठे तरी जातायत, बरं झालं. जरा घरांत कटकट कमी” अशा भावनेने घरच्या मंडळींनी या उपक्रमाकडे पाहिलं. पण नंतर ते च छोट्या मोठ्या स्थानिक, घरगुती कार्यक्रमांमधे आत्मविश्वासाने गाऊ लागलेले पाहून त्यांना आनंद आणि अभिमान वाटला. एक सदस्याला घरच्या लोकांनी त्याच्या ‘डीप्रेशन’वर उपाय म्हणून त्यांना थोड्या जबरदस्तीनेच तिथे पाठवलं होतं. ते तर पुढे भजनांमध्ये इतके प्रवीण झाले की कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावले जातेच पण त्यांचा टी.व्ही.वरही खास कार्यक्रम झाला. आता या उपक्रमाने अकरा वर्षे पूर्ण केलीत. सर्वच जेष्ठांसाठी अतिशय अनुकरणीय असा उपक्रम निष्ठेने इतकी वर्षे चालवून आपण एक आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमांमुळे जेष्ठांच स्वास्थ्य सुधारतं आणि आपण कालबाह्य झालोत ही भावना त्यांच्यापासून दूर रहाते. तेव्हां तुमचा हा कार्यक्रम दर गुरूवारी असाच अव्याहत सुरू राहो आणि असेच गुरूवंदनासारखे गृप्स जागोजागी स्थापन होवोत अशा सदीच्छा मी माझ्यातर्फे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिकांतर्फे व्यक्त करतो आणि त्या बरोबरच माझा हा ‘अव्यापारेषु व्यापार’ म्हणजे “अनकमर्शियल ब्रेक” संपल्याचे जाहिर करतो. खूप खूप धन्यवाद.”
▪
कार्यक्रमाची समाप्ती त्यानंतर तासा-दीड तासाने माझ्या साडूंनी “बाजूबंद खुल खुल जा” ही भैरवी अतिशय परिणामकारक रित्या अर्धा तास सादर करून केली. माझे भाषण जरी गाण्यापासून हटके होतं तरी आवडल्याच अनेकांनी सांगितले. त्यांच्या सौजन्याचाही त्यांत भाग होताच. मला कल्पना आहे की एखाद्या संगीताच्या जाणकाराने प्रभावी भाषण करून कार्यक्रमाला छान पार्श्वभूमी तयार केली असती. पण त्यांच्या आग्रहाखातर मी माझ्या पध्दतने बोललो. तुम्हीही हे वाचल्यावर मला आवर्जून कळवा की भाषण उत्तम नाहीतरी समयोचित आणि ठीक झाले असे तुम्हांला वाटते कां?
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply