माझं देशपांडेंकडे काही काम होतं. मी देशपांडेंना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. देशपांडेंनी फोन घेतला. मी माझं नाव सांगितलं व त्यांना बोलण्यासाठी वेळ आहे का ते विचारलं. “आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर” देशपांडे दबक्या आवाजात उद्गारले. मी फोन बंद केला. देशपांडे मिटिंग आटोपल्यावर फोन करतील या समजूतीवर मी देशपांडेंच्या फोनची प्रतीक्षा करु लागलो. देशपांडेंचा फोन आलाच नाही. देशपांडेंकडे माझं काम असल्याने त्यांचा फोन येतो की नाही याबाबत माझी चुळबूळ सुरुच हो…..ध्ये एकदोनदा मी मिस्ड कॉल मध्ये देशपांडेंचा फोन आला आहे का हे तपासून बघितलं. देशपांडेंचा फोन आला नव्हता. मी इनबॉक्समध्ये जाऊन त्यांच्याकडून काही मेसेज आला आहे का ते बघितलं. देशपांडेंकडून काहीही मेसेज आला नव्हता. देशपांडे आज कामात असतील, उद्या बघू असा विचार करुन मी देशपांडेंना पुन्हा फोन केला नाही.
दुसऱ्या दिवशी मात्र देशपांडेंच्या ऑफिसची वेळ होताच मी सकाळीच फोन केला. युवर कॉल इज बिअिंग ट्रान्सफर्ड मला फोनवर आवाज आला. फोन कुणा बाईनं घेतला. “मला देशपांडेंशी बोलायचंय’ मी त्या बाईला सांगितलं. “साहेब मिटिंगमध्ये आहेत. तुमचा फोननंबर देऊन ठेवा,” बाई किनऱ्या आवाजात उत्तरली. खरंतर माझा फोननंबर देशपांडेंकडे होता. परंतु मी विषय वाढवला नाही. शांतपणे मी बाईला माझा फोन नंबर सांगितला, माझं नाव सांगितलं. बाईने फोन नंबर पुन्हा रिपिट केला. मी फोन बद केला. देशपांडेंना आपल्या कामात स्वारस्य आहे की नाही? माझ्या मनात शंका उभी राहिली. काल त्यांनी नंतर फोन करतो म्हणून मला टाळलं होतं, आज तर ते स्वतः फोनवरदेखील आले नाहीत. आता यानंतर पुन्हा देशपांडेंचा फोन आल्याखेरीज त्यांना फोन करायचा नाही हे मी मनाशी ठरवून टाकलं.
देशपांडेंचा नंतर मला कधीच फोन आला नाही. त्या माणसाने आपला साधा फोनदेखील घेतला नाही याची रुखरुख मनाला लागून राहिली.
त्यानंतर बराच काळ लोटला. मी देशपांडेंचं फोन प्रकरण विसरुनही गेलो. एक दिवस अचानक माझा मोबाईल वाजला. कोणाचाही फोन वाजला की मी फोन कोणाचा आहे ते डिस्प्लेवर लगेचच बघतो. सर्व परिचितांची नावे मोबाईलमध्ये सेव्ह केलेली आहेत. अपरिचिताचा फोन असला की फोनवर नंबर येतो. परिचिताचा फोन असला की त्यांचं नाव फोनवर दिसतं. फोनवर देशपांडेंचं नाव होतं. काही महिन्यांपूर्वी घडलेला सारा प्रकार मला क्षणात आठवला. त्यावेळी माझं काम असताना देशपांडेंनी मला टाळलं होतं. आज त्यांचं काहीतरी काम निघालं असावं. ते काय काम आहे हे जाणून घेण्यातही मला स्वारस्य वाटत नव्हतं. मी फोन घेतला आणि दबक्या स्वरात उत्तरलो- “आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर.” त्यानंतर मी देशपांडेंना कधीच फोन केला नाही. फिटंफाट झाली.
मागे देशपांडेंनी मला टाळलं होतं. आज मी त्यांना कटवलं. त्यांचं माझ्याकडे काय काम आहे हे जाणून घेण्यातही मला स्वारस्य उरलं नव्हतं. जशास तसे उत्तर देता आलं याचं मल समाधान वाटलं. मी खुशीत येऊन मोबाईलमधला रेडिओ ऑन केला. हातानं ठेका धरत मी गाणी ऐकू लागलो.
अलेक्झांडर ग्रॅहम बेलने फोनचा शोध लावला तो माणसामाणसातला सुसंवाद वाढविण्यासाठी. त्याचा तो हेतू शंभर टक्के साध्य झाला आहे. फोनच्या सुविधेमुळे जगाच्या पाठीवर आज कुणीही कुणाशीही थेट संपर्कात राहू शकतो. परस्परांची हालहवाल पुसणं, परस्परांना महत्त्वाचे निरोप देणं, प्रसंगी संभाव्य धोक्याची सूचना देणं अशा अनेक बाबतीत फोनची सुविधा उपयुक्त ठरते. परदेशी राहणाऱ्या पाल्यांच्या पालकांना फोन हा मोठाच आधार भासतो. प्रत्यक्ष भेट होत नसली तरी रोजच्या रोज फोनवर खुशाली जाणून घेता येते. रिलायन्स कंपनीने मागे आपल्या फोनची जाहिरात करताना ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ अशी स्लोगन वापरली होती. मोबाईल फोनचं अचूक वर्णन करणारी स्लोगन असं या जाहिरातीचं कौतुक झालं होतं. मोबाईल फोनमुळे खरोखरच सर्व दुनिया एका हाताच्या मुठीत सामावली गेली.
मात्र असं असूनही फोनमुळे अनेक संबंध ताणले जातात व कधीकधी संपुष्टातही येतात हे देखील तितकंच खरं. वर उल्लेखिलेला देशपांडेचा किस्सा याच सदरात मोडणारा. तो मला फोन करत नाही, मी कशाला त्याला फोन करु हा संवाद आपण अनेकदा ऐकतो. अशावेळी फोनमुळे परस्परांतील संबंध सुदृढ राहतात की बिघडतात असा प्रश्न पडतो. शुभेच्छांच्या बाबतीही फोनमुळे नाराजी ओढविण्याचेच प्रकार बरेचदा घडतात. त्याने मला फोन न करता नुसतं एसएमएस वर कटवलं ही नाराजी मनात घर करुन राहते. तर कुणी साधा एसएमएसही पाठवला नाही याचं शल्य जिव्हारी लागतं. याबाबतीत स्वतः पुढाकार घेताना अहंकार आडवा येतो. थोडक्यात फोनला सुसंवाद साधणारं साधन म्हणायचं की अहंकाराला खतपाणी घालणारं साधन या प्रश्नाचं उत्तर देणं आता कठीण आहे.
भारतामध्ये गेल्या दोनतीन दशकात टेलिकम्युनिकेशन सेक्टरने अक्षरश: गरुडझेप घेतली. स्व. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना श्री. सॅम पित्रोडा यांच्या मार्गदर्शनाखाली टेलिकम्युनिकेशनचं म्हणजेच दूरसंचार सेवेचं जाळं सर्वदूर पसरलं. अगदी खेडयापाडयातही टेलिफोनचे बूथ पोहोचले व अक्षरांची साधी तोंडओळख नसलेली माणसंही फोनवरचे इंग्रजी आकडे आत्मविश्वासाने फिरवू लागली. त्यानंतर काही वर्षांतच मोबाईलचं युग अवतरलं. सुरुवातीला मोबाईल म्हणजे अतिश्रीमंतांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन घडविण्यास सहाय्य करणारं साधन असाच लौकिक सर्वत्र पसरला. याला कारणंही अनेक होती. मोबाईल सेटची किंमत तेव्हा पन्नास हजार रुपयांच्या घरात होती व प्रतिकॉल चार्ज असे रुपये सतरा ! नंतर मात्र मोबाईलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपण केवढी मोठी घोडचूक करतो आहोत हे ध्यानात आलं. भारतासारख्या कोटीकोटींच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या देशात केवळ मोजक्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणं म्हणजे मोठया मार्केटिंग अपॉर्म्युनिटिज पासून वंचित राहणं हे शहाणपण या कंपन्यांना उमगलं आणि त्यानंतर मोबाईलचे भाव धडाधड कोसळले. अगदी हजार दोन हजारांना मोबाईल उपलब्ध होऊ लागले व प्रतिकॉल दर आला फक्त पन्नास पैशांवर! या सनसनाटी बदलानंतर भारतात प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसू लागला. रस्त्यातून चालताना, गाडीतून प्रवास करताना माणसं सर्रास मोबाईल वापरु लागली. हातातलं पेन, खिशातला कंगवा यासारखाच मोबाईल हा सर्वांच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक बनला.
अहंकाराला खतपाणी घालणारं साधन याच्या जोडीलाच मग डोकेदुखी वाढविणारं साधन असाही मोबाईलला ठपका लागला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठयाने फोनवर बोलणं, मोठ्या आवाजात मोबाईलवरची गाणी ऐकणं या प्रकारांमुळे मोबाईलची लोकप्रियता कलंकित झाली. अर्थात याला आपणच जबाबदार आहोत. हाती आलेल्या वस्तूचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. हे ठरविण्याची पात्रता अंगी नसली की दुरुपयोगांचं पारडं जड होतं. कुठलीही वस्तू चांगलीही असते आणि वाईटही. ती आपण कशाप्रकारे हाताळतो यावर सारं अवलंबून असतं. फोनमुळे जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी एकटंच जीवन जगणाऱ्याला आम्ही तुझ्या सोबतच आहोत हा मोलाचा संदेशही देता येतो आणि कधी कुणाला ‘आय एम इन अ मिटिंग’ म्हणून कटवताही येतं. यातला कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं!
-सुनील रेगे
Leave a Reply