१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गायक होते पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर. या अप्रतिम गाण्याची रचना होती शाहीर होनाजी बाळा यांची. तर संगीत होते वसंत देसाई यांचे. घन:श्याम सुंदरा ही अमर भूपाळी लिहिणारा होनाजी हा गवळी समाजात जन्माला आला. पेशव्यांच्या वाडय़ावर सकाळी दुधाचा रतीब घालणे आणि सायंकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी त्यांचे तसेच इतरेजनांचेही मनोरंजन करणे हे दोन्ही उद्योग होनाजीने केले. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसाच शाहिरीचा व्यवसायही वंशपरंपरागतच. त्याचे आजोबा साताप्पा किंवा शांताप्पा हे आणि त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा कारंजकर या नावाचा शिंपी होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजवला आणि होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले.
घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताचिं उडाले चरावया पक्षी
प्र्भातकाळी उठुनि कावडी तीर्थ पंथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
—
Leave a Reply