स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात
आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात
नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती
तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती
कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना
नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना
अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा
सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा
आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा
अखंड असे हा होम पेटता, धगधगती अंतःप्रेरणा
रोरावणाऱ्या प्रपातास, कुठे कधी का उसंत आता
नशीबी त्यांच्या ती, तेवढी, एक शेवटची शांतता
बदकांच्या कुडीत कोणी कोंडिले हे राजहंस गोजिरे
अश्वत्थामाच्या जखमेला घेऊन कपाळीच्या देव्हारे
जनाकलनाच्या कक्षेपार भ्रमणारे हे भूस्तरीय तारे
ओसंडणाऱ्या गर्दीतही, एकाकी व्यथित बिचारे
हिंदोळून पारंब्यांना आशेच्या, लोंबकळती हुतात्मे
आसूसले प्रतीक्षेत मुक्तीच्या, केव्हाचे शापित आत्मे
– यतीन सामंत
Leave a Reply