प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.
उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।
स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।
कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।
गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।
पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।
श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.
“गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.
।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा ” आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.
गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच “शव” होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.
हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।” हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.
पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.
पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.
“गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
ताही में मल मल न्हाऊ जी…”
याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.
पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी” या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.
याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.
भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त” शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल” दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो – दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती” या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.
क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.
भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.
हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.
–सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.
Leave a Reply