भारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात. हा सूर काहीसा सर्वसामान्य नागरिकांकडून तर असतोच, पण समाजातील काही प्रतिष्ठीत मान्यवर किंवा राजकीय पक्ष ज्यावेळी टिका करतात, त्यावेळी सहाजिकच मनाच्या समजल्या जाणार्या पुरस्कारांबाबत अनेकांच्या मनात साशंकता निर्माण होते, व हे पुरस्कार सुद्धा वादाच्या भोवर्यात सापडतात.
यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना जाहीर झाला, पण इतक्या उशीरानं हा सर्वोच्च पुरस्कार घोषित केल्याबद्दल आनंदा बरोबर टिकेचा सूर जनमानसातून उमटला गेला. कारण प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्राण साहेबांना या पुरस्काराच्या वितरण समारंभा प्रसंगी हजर राहता आले नाही; आणि त्याविषयी ना कोणास खेद, ना खंत होती. असो पण उशीरा का होईना प्राण साहेबांना पुरस्कार जाहीर झाला व त्यांच्या गुणांवर सर्वोच्च मोहोर उमटली, त्याबद्दल त्यांना ही समाधान लाभलं असेल. पण भारतीय सिनेसृष्टीत (म्हणजे बॉलीवुड व इतर भाषिक चित्रपट सृष्टीत) असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मान होणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या वयोमानाकडे आणि प्रकृती कडे पाहता या वयात किमान कौतुकाची थाप मिळाल्यास आपली कारकीर्द सार्थकी झाल्यासारखी वाटेल. पण यासाठी सरकारी पातळीवर आणि या पुरस्काराच्या निवड समितीवर बसलेल्या मान्यवरांनी एकमुखानं ही बाब मानण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कलाकारांचं ७५ वर्षं वय त्याची कारकीर्दीची वर्षे, आणि सिनियारिटी असे निकष ठरवल्यास किमान ८५-९० व्या वर्षांपर्यंत कलाकारांना आणि त्यांच्या चाहत्यांना वाट पहावी लागणार नाही, तसंच या पुरस्काराच्या रुपानं त्यांच्या कारकीर्दीच्या शिरेपेचात, मानाचा तुरा रोवला जाईल.
आणखीन एक मुद्दा मध्यंतरी समोर आला तो म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना भारत रत्न या सर्वोच्च नागरी किताबानं गौरवण्यात यावं. महाराष्ट्रातल्याच काही प्रमुख पक्षांनी ही मागणी केली होती, पण इतक्या वर्षांनी हे शहाणपण त्यांना का सुचलं असावं. दादासाहेब फाळकेंना जाऊन जवळपास ७० वर्षे लोटली आहेत. या आधी म्हणजे ६०-७० च्या दशकात असा मुद्दा का उपस्थित केला गेला नाही? “हरिश्चंद्राची फॅक्टरी” हा सिनेमा पाहिल्यावर बहुधा फाळकेंची थोरवी कळली असावी? किंवा आपल्या “मराठी मातीतल्या माणसांची नेत्रदिपक कामगिरीची जाणीव होईपर्यंत त्यांची आतरराष्ट्रीय पातळीवर कोण दखल घेतय का? याची वाट पहायची….. खरोखर! कलेच्या दृष्टीनं ही (मनात नैराश्य निर्माण करुन) कोणाला किती आदर भाव आहे याचं हे द्योतक आहे. खरंतर अशा मागणीमुळे “प्रादेशिक अभिमना” सारखे संकुचित आरोप होऊ शकतात व होतात पण याकडे भावनिक नजरेतून ही न पाहता ती व्यक्ती व त्याची कामगिरी सुद्धा लक्षात घ्यावयास हवी. आणि अनेक राज्यांमध्ये सुद्धा सुयोग्य व्यक्ती या किताबासाठी मानकरी ठरावी.
एक भारतीय म्हणून अपेक्षा एकच की अशा सर्वोच्च पुरस्कारांवर योग्यवेळी, योग्य त्या व्यक्तींची निवड करुन या नागरी किताबांचा सन्मान राखावा, तसंच भारतीय सिनेसृष्टीला १०० वर्षं पूर्ण झाली असताना या “सिने जनकाचा” सन्मान “भारत रत्न” ने करुन दादासाहेब फाळकें सोबत या पुरस्काराचा ही मान वाढावा अशी अपेक्षा केंद्र सरकार आणि निवड समितीकडून करायला काहीच हरकत नाही.
— सागर मालाडकर
Leave a Reply