नवीन लेखन...

गढवालमधील पंचप्रयाग

भारतात नद्यांविषयी पावित्र्याची व आदराची भावना आहे. नद्यांमुळे आपले जीवन समृद्ध होते व म्हणून आपण त्यांना आई मानतो, त्यांना देवस्थानी बसवतो. नद्यांच्या उगमस्थानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. उगमस्थानांच्या मार्गावर जात असताना दोन नद्यांचे मिलन पाहायला मिळते. हे सुंदर दृश्य पाहत असताना विचारांची झेप वेगावते व ईश्वराची आराधना करण्यासाठी हीच जागा योग्य आहे, असे विचार मनात येऊ लागतात. मग तिथे मंदिराची उभारणी होऊ लागते. यज्ञयाग होऊ लागतात. या स्थानांचे पावित्र्य सांगणाऱ्या कथा गुंफल्या जाऊ लागतात. अशी स्थाने संगम किंवा प्रयाग म्हणून ओळखली जाऊ लागतात. ती संस्कृती केंद्रे बनतात, भरभराटीला येतात. सन्मानित होतात. त्यांचे महत्त्व वाढते.

हिमालयातील नद्यांना प्राचीन काळापासून महत्त्व दिले आहे. निरनिराळ्या पुराणात त्यांचे वारंवार उल्लेख येतात. देव, ऋषी, महापुरुषांशी त्यांचा संबंध जोडला आहे. त्याच्या उपासनेला महत्त्व दिले आहे. अशा नद्यांचे संगम तर एक फार मोठे आकर्षण आहे.

ऋषीकेशहून बद्रीनाथला जाताना अशी अनेक संगमस्थळे पाहायला मिळतात. त्यातील पाच स्थळे जास्त महत्त्वाची मानली आहेत. गढवाल हिमालयातील ही स्थाने पंचप्रयाग म्हणून ओळखली जातात.

गंगोत्रीहून येणारी भागीरथी व बद्रीनाथहून येणारी अलकनंदा यांचे संगम स्थान म्हणजे ‘देवप्रयाग’. ऋषीकेशपासून देवप्रयाग हे अंतर साधारण ७० कि.मी. आहे. भागीरथी व अलकनंदा यांचा संयुक्त प्रवाह या पुढे ‘गंगा’ म्हणून ओळखला जातो. थोडक्यात म्हणजे देवप्रयाग हे गंगेचे आरंभस्थान आहे. सर्व प्रयागामध्ये देवप्रयाग हे सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. त्याचे माहात्म्य त्रिवेणी संगमाप्रमाणे समजले जाते. स्कंदपुराणाच्या केदारखंडात या स्थानाचे फार मोठे माहात्म्य वर्णिले आहे. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली व श्रीशंकराची मनोभावे आराधना केली. ते कायम या ठिकाणी वास्तव्य करतात असे केदारखंडात उल्लेख आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. त्यामुळे लागलेल्या ब्रह्महत्त्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती असेही काही ठिकाणी उल्लेख मिळतात तर वराहरूपी श्रीविष्णूंनी जलप्रलयातून पृथ्वी बाहेर काढली तेव्हा हे क्षेत्र सर्वप्रथम पाण्याच्या बाहेर आले व सृष्टीची रचना सर्वप्रथम या स्थानी केली गेली, असेही सांगितले जाते. या परिसराला सुदर्शन क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. जलप्रलयाच्यावेळी भगवान श्रीविष्णूंनी या परिसरात वास्तव्य केले होते, अशी श्रद्धा आहे.

असे सांगतात की प्राचीन काळी देवशर्मा नावाच्या एका तपस्वी ब्राह्मणाने श्रीविष्णूची तपश्चर्या करून त्यांनी या स्थानी कायम वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली. श्रीविष्णूंनी त्यांची प्रार्थना आनंदाने मान्य केली. त्रेता युगामध्ये देवशर्माचे वरदान पूर्ण झाले. देवशर्मा या नावावरून हे स्थान देवप्रयाग म्हणून ओळखले जाऊ लागले. हे क्षेत्र रामावर्त म्हणून सुद्धा ओळखले जात होते. असे मानतात की प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते व त्या काळात दशरथ राजा या ठिकाणी पुत्रदर्शनार्थ आले होते. या परिसरातील एक पर्वतशिखर ‘दशरथ पर्वत’ म्हणून आजही ओळखले जाते.

देवप्रयागचे मुख्य आकर्षण म्हणजे भागीरथी व अलकनंदा या दोन पवित्र नद्यांचा संगम व संगमस्थानावर असलेले प्रभू रामचंद्रांचे मंदिर. हिमालयात जास्तीत जास्त शिवमंदिरे आहेत. माझ्या पाहण्यात या भागात राममंदिरे फक्त देवप्रयाग व घुत्तु या दोनच ठिकाणी आली. देवप्रयागचे हे प्राचीन मंदीर ‘रघुनाथ किर्ती मंदिर’ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. हिमालयातील बहुतेक मंदिरे नागर शैलीतील आहेत पण हे मंदिर द्राविडी शैलीतील असून शिखराची ठेवण ही कत्युरी पद्धतीची आहे. मंदिराची उंची साधारण ८० फूट आहे. मंदिरामध्ये काळ्या शाळिग्राम शिळेपासून बनवलेली ६ फूट उंचीची प्रभू रामचंद्रांची अतिशय सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर कधी बांधले आहे याचे स्पष्ट उल्लेख मिळत नाहीत. काहींचे म्हणणे आहे की, हे मंदिर शंकराचार्यांनी बांधले, पण १८०३ ते १८१५ या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मंदिराच्या दरवाज्यावर असलेल्या ताटात इ.स. १६६४ सालातील राजघराण्यातील काही पुरुषांचा उल्लेख केलेला देसून येतो.

या मंदिराच्या पाठीमागे दोन गुंफा मंदिरे आहेत. त्या वामनगुंफा व गोपालगुंफा म्हणून ओळखल्या जातात. त्या ठिकाणी अस्पष्ट दिसणारा एक शिलालेख आहे. जवळच आणखी एक गुंफा असून ती शंकराचार्य गुंफा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी आदीशंकराचार्यांनी वास्तव्य केले होते, असे सांगतात.

देवप्रयागला भरताचे एक मंदिर आहे. औरंगजेबाने जेव्हा ऋषिकेश भ्रष्ट करण्याचे ठरवले तेव्हा ऋषिकेशच्या भरत मंदिरातील मूर्ती या ठिकाणी आणली होती. नंतर ती परत ऋषिकेशला नेली गेली पण भरत मंदिर मात्र अजूनही उभे आहे.

असेही सांगितले जाते की या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. लोकापवादामुळे प्रभू रामचंद्राने सीतामातेचा त्याग केला. लक्ष्मणाने तिला ऋषिकेश या ठिकाणी आणून सोडले. दु:खी, कष्टी, निराश झालेल्या सीतामातेने हिमालयातील निबिड अरण्यातून आपली वाटचाल सुरू केली. कुठे जायचे हे तिला काहीच समजत नव्हते व एके दिवशी ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पोहचली. वाल्मिकी ऋषींनी तिचे स्वागत केले. सीतामातेने त्या आश्रमातच आपले वास्तव्य केले. वाल्मिकी ऋषी सीतामातेला आपल्या मुलीप्रमाणे जपत होते.

आणि एका शुभदिनी सीतामातेने आश्रमात लव-कुशाला जन्म दिला. दिवस जात होते. लव-कुश मोठे होत होते. वाल्मिकी ऋषी त्यांच्यावर संस्कार घडवत होते. त्यांना ज्ञान देत होते. शस्रविद्या, युद्धकलेत लव-कुश प्रवीण होत होते. इकडे अयोध्येत प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. रितीप्रमाणे अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला गेला. हा घोडा फिरत फिरत एके दिवशी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आला व तो घोडा लव-कुशांनी कुतूहल म्हणून अडवून ठेवला. हा घोडा सोडवण्यासाठी श्रीरामाचे सैन्य आश्रमात आले. लव-कुशांनी घोडा देण्यास नकार दिला व त्याचा परिणाम युद्धात झाला. लव-कुशांनी आपल्या पराक्रमाने सैन्याला पराजित केले. या मुलांच्या शौर्याच्या कथा ऐकून प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले तेव्हा वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामचंद्राला ही तुझीच मुले असून सीता निष्कलंक आहे असे सांगितले. प्रभू रामचंद्राला आनंद झाला. ते सीता व लव-कुशांना घेऊन अयोध्येला निघाले. आश्रमाच्या परिसरात अनेक गावे होती. त्या गावातील लोक सीतेला आपल्या मुलीप्रमाणे समजत. प्रभू रामचंद्र सीतामातेला व लव-कुशांना घेऊन अयोध्येला जात आहेत, हे जेव्हा त्या लोकांना कळले तेव्हा ते भोळेभाबडे लोक शोकाकूल झाले व रामाबरोबर सीतेची व लव-कुशाची पाठवणी करण्याची तयारी ते दुःखित अंतःकरणाने करू लागले. अखेरी प्रस्थानाचा दिवस उजाडला. सर्वजण शोकाकूल होऊन चालू लागले. सीतामाता एकाएकी मध्येच थांबली. तिने हात जोडले व भूमातेची प्रार्थना केली व भूमातेला म्हणाली, ‘हे धरतीमाते, मी खरोखरच पवित्र असेन तर मला तुझ्या उदरी सामावून घे.’ चमत्कार झाला. धरणी दुभंगली. सीता भूमातेच्या उदरात पहाता पहाता नाहीशी झाली. प्रभू रामचंद्र पहातच राहिले. त्यांनी सीतेला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती सीतेचा फक्त केशसंभार राहिला. सीतामातेने भूमातेच्या पोटी आसरा घेतला होता. हा प्रसंग देवप्रयाग जवळ असलेल्या मनसार या ठिकाणी घडला असे समजले जाते. मनसार परिसरात सोनेरी रंगाचे गवत उगवते. स्थानिक लोक त्याला ‘बावला’ असे म्हणतात. दरवर्षी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तेव्हा मुलीला सासरी पाठवण्याच्या रिवाजानुसार लोक मिठाई, वस्त्रे इ. घेऊन येतात. मोठा उत्सव होतो. सीतेच्या मस्तकावरील केस म्हणून लोक हे सोनेरी गवत घरी घेऊन जातात व त्याची पूजा करतात. देवप्रयागपासून २-३ कि.मी. अंतरावर सीताकुटी मंदिर बांधण्यात आले आहे.

महाभारतातील खूप घटना हिमालयाशी निगडित आहेत. पण रामायणातील फारच थोड्या घटना हिमालयाशी निगडित आहेत. देवप्रयाग हे असेच रामायणाशी निगडित असलेले स्थान आहे.

देवप्रयागमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चार दिशांना धनेश्वर, बिल्वेश्वर, तुंडीश्वर, ताटकेश्वर ही चार शिवमंदिरे आहेत तर विश्वेश्वर मंदिर हे सुद्धा देवप्रयागमधील एक मुख्य मंदिर आहे. या मंदिराजवळ सतीची वृंदावने आहेत. सतराव्या शतकातला श्रीनगरचा त्रेपन्नावा राजा जयकृत शाह याचे देहावसान झाल्यावर त्याच्या सर्व राण्या सती गेल्या. त्या राण्यांची ही वृंदावने आहेत.

देवप्रयागचे आणखी एक आकर्षण म्हणजे स्वर्गीय चक्रधर जोशी या ज्योतिष पंडिताने स्थापन केलेली नक्षत्र वेधशाळा. ही वेधशाळा म्हणजे भारतीय ज्योतिष विद्येचे मोठे केंद्र आहे. या ठिकाणी एक मोठे ग्रंथालय पण असून त्यात जवळजवळ पंधरा हजार ग्रंथ आहेत. तसेच या ठिकाणी पांडुलिपीतील संस्कृतमधील अनेक हस्तलिखिते जतन करून ठेवली आहेत.

देवप्रयागच्या परिसरात अनेक तीर्थे आहेत व त्यांच्याशी अनेक पौराणिक कथांची जोडणी केली आहे. देवप्रयागविषयी तेथील लोक आवर्जून एक गोष्ट सांगतात ती म्हणजे या परिसरात कोठेही कावळे दिसत नाहीत आणि काही वेळा ते खरं पण वाटते. मग कारण काहीही असो.

केदारनाथहून येणारी, निळ्या रंगामुळे खुलणारी, शांत वाहणारी मंदाकिनी तर बद्रीनाथहून आदळत, आपटत खळाळत धावणारी अलकनंदा यांचे संगमस्थान म्हणजे ‘रूद्रप्रयाग’. या स्थानाचे उल्लेख स्कंदपुराण तसेच महाभारतात आले आहेत. श्रीशंकर पार्वतीमातेला सांगतात, “हे देवी, माझे तिसरे निवासस्थान रूद्रालय या नावाने प्रसिद्ध आहे. ते सर्व तीर्थांत उत्तम तीर्थ आहे. या स्थानाच्या स्मरणानेसुद्धा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते. हे स्थान अनेक तीर्थांनी विभूषित आहे. ज्याप्रमाणे शरीर आत्म्याला सोडत नाही त्याप्रमाणे देवांनासुद्धा दुर्गम असलेले हे स्थान मी कधीही सोडत नाही. या स्थानाचे एकदा जरी दर्शन घेतले तरी जीवन धन्य होते,” अशी महती या स्थानाबद्दल केदारखंडात सांगितली आहे. रूद्रप्रयाग देवप्रयागपासून ६९ कि.मी. दूर आहे. मंदाकिनीचे प्राचीन नाव कालीगंगा. या पवित्र स्थळी नारदाने एका पायावर उभे राहून भगवान शंकराची तपश्चर्या केली व शंकराकडून संगिताचे व सर्व रागांचे ज्ञान मिळविले. पार्वतीने याच ठिकाणी तपश्चर्या करून शिवाची प्राप्ती करून घेतली. पुरातन काळात हे स्थळ ‘रूद्रावर्त’ म्हणून ओळखले जात होते. संगमावर श्री रूद्रनाथाचे व जगदंबेचे मंदिर आहे. शंकराची पूजा या ठिकाणी रूद्रनाथ म्हणून केली जाते. जवळच रूद्राक्षाचे एक झाड आहे. रूद्रप्रयाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असून सर्व प्रवासी सोयी-सुविधा येथे उपलब्ध आहेत.

रूद्रप्रयाग म्हटले की आठवण येते ती जिम कॉर्बेटची! १९१८ ते १९२६ या काळात या परिसरात एका नरभक्षक चित्त्याने प्रचंड दहशत निर्माण केली होती. जवळजवळ १२५ लोक त्याने मारले. त्याला मारण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतातील सर्व शिकाऱ्यांना आवाहन केले होते. शेवटी रूद्रप्रयागजवळ असलेल्या गुलाबराय या ठिकाणी जिम कॉर्बेटने या चित्त्याला यमसदनाला पाठविले. या अनुभवावर आधारित जिम कॉर्बेटने “Man Eater Leopard of Rudraprayag” हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. या प्रसंगाची स्मृती जागवणारे एक छोटे स्मारक गुलाबराय या ठिकाणी उभे करण्यात आले आहे तर या प्रसंगाची साक्ष देणारा एक आंब्याचा वृक्ष अजूनही तिथे उभा आहे.

रूद्रप्रयागहून ३ कि.मी. अंतरावर कोटेश्वर महादेवाची नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत शिवलिंग व पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. तेथून पुढे १ कि.मी. अंतरावर नारायणाचे मंदिर आहे.

रूद्रप्रयागहून एक रस्ता केदारनाथकडे तर दुसरा बद्रीनाथकडे जातो. बद्रीनाथच्या रस्त्यावर रूद्रप्रयागहून ३१ कि.मी. अंतरावर आहे ‘कर्णप्रयाग’. अलकनंदा व पिंडारी या नद्यांच्या भेटीचे हे स्थान! हे स्थान तिसरे प्रयाग म्हणून ओळखले जाते. कर्णाची ही तपोभूमी! कर्णाने सूर्याची या ठिकाणी तपश्चर्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले, अशी आख्यायिका आहे. कत्युरी काळात या ठिकाणी एक सूर्य मंदिर होते. १८०३ साली कॅप्टन रीपर या ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी कर्णाचे मंदिर पाहिले होते, अशा नोंदी आहेत. १८९४ साली आलेल्या विरहीगंगेच्या महापुराने ही मंदिरे नष्ट झाली. त्यानंतर या ठिकाणी केर्णेश्वर महादेवाचे व उमादेवीचे मंदिर उभारण्यात आले.

हिमालयाच्या सौंदर्याला उपमा नाही. महाकवी कालिदासासारखा कवीसुद्धा हिमालयाच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आपल्या कुमारसंभव या महाकाव्यासाठी त्याने हिमालयाचा रंगमंच वापरला आहे तर शाकुंतल काव्यात कर्णप्रयागचा परिसर दुष्यंत व शकुंतलेच्या भेटीसाठी निश्चित केला आहे. राजा दुष्यंत व शकुंतला एकमेकांस या परिसरात भेटत व एकमेकांत हरवून जात. कर्णप्रयाग हे तसे मध्यवर्ती ठिकाण आहे. गढवाल कुमाँऊच्या बऱ्याच भागात जाण्यासाठी या ठिकाणाहून रस्ते उपलब्ध आहेत. रूपकुंड, बेदनी बुग्याल या परिसरात कर्णप्रयागहून जाता येते.

कर्णप्रयागहून २२ कि.मी. अंतरावर आहे ‘नंदप्रयाग’. हे चौथे प्रयाग आहे. नंदादेवी पर्वतराजीतून वाहत येणारी निळ्या रंगाची नंदाकिनी या ठिकाणी अलकनंदेला भेटते व स्वत:ला हरवून जाते. या ठिकाणी कण्व मुनींचा आश्रम होता. तसेच नंदराजाची ही यज्ञभूमी होती, असे उल्लेख मिळतात. हा संपूर्ण परिसर अत्यंत पवित्र मानला जातो. रावणाची ही तपोभूमी! या ठिकाणी रावणाने आपली दहा शिरे शंकराला वाहून शंकराची आराधना केली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. संगमावर शिव व गोपालजीचे (कृष्णाचे) सुंदर मंदिर आहे. ते खूप प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी या परिसरात वैष्णव लोकांची वस्ती होती.

नंदादेवी परिसरात जाण्यासाठी नंदप्रयागहून सुरुवात करावी लागते. पण त्या मानाने हे स्थळ खूप लहान आहे. प्रवासी सोयी-सुविधा या ठिकाणी फारशा उपलब्ध नाहीत.

पतीचा अपमान सहन न झाल्याने संतापलेल्या सतीने दक्षाच्या यज्ञात आत्मसमर्पण केले. हे समजल्यावर क्रोधित झालेल्या शिवाने दक्षाचा वध केला. सतीच्या विरहाने शिव शोकाकूल झाला. आक्रोश करत तो भटकू लागला. एक छोटीशी नदी शिवाची ही अवस्था पाहून व्यथित झाली. सर्वजण या नदीला विरहीगंगा म्हणू लागले. नंदप्रयागपासून १८ कि.मी. अंतरावर विरही म्हणून एक छोटीशी वस्ती आहे. या ठिकाणी विरहीगंगा अलकनंदेला मिळते. चमोलीपासून ४० कि.मी. अंतरावर त्रिशूल नावाचे २५,६६० फूट उंचीचे पर्वतशिखर आहे. हे एक पवित्र शिखर म्हणून समजले जाते. या त्रिशूल पर्वतराजीतून विरहीगंगेचा उगम होतो. हिमालय ठिसूळ आहे. या भागात भूस्खलन नेहमीच होत असते. पण काही वेळा असे भूस्खलन मोठे उत्पात घडवून आणते. एके दिवशी विरहीगंगेच्या पात्रात ठिसूळ हिमालयाचा एक प्रचंड कडा कोसळला व त्यामुळे ३.३ कि.मी. लांबीचा नैसर्गिक बांध विरहीगंगेच्या पात्रात निर्माण झाला. तळाकडे या बंधाऱ्याची रुंदी होती साधारण ३००० मीटर तर माथ्याकडे साधारण ६०० मीटर्स! बंधाऱ्यामुळे एक प्रचंड जलाशय निर्माण झाला. ही घटना १८९३ मधील! विरहीगंगेचे पाणी वाढू लागले आणि एके दिवशी पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. १८९४ साली पाण्याचा दाब सहन न झाल्याने हा बंधारा खचला. पाण्याचा प्रचंड लोंढा बाहेर पडला. ६ तासांच्या काळात साधारण दहा अब्ज घनफूट पाणी बाहेर पडले. चमोली, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर, देवप्रयाग इत्यादी गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. मंदिरे वाहून गेली. सर्व परिसर उद्ध्वस्त झाला. होत्याचे नव्हते झाले. सारे काही खरोखरच गंगेला मिळाले.

पंचप्रयागमधील शेवटचे प्रयाग म्हणजे ‘विष्णुप्रयाग’. ही जागा म्हणजे एक अरुंद खिंडच आहे. या ठिकाणी सतोपंथ ग्लेसिअरमधून उगम पावणारी, बद्रीनाथचे चरणस्पर्श करणारी विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा संगम होतो व यापुढील एकत्रित प्रवाहाला अलकनंदा म्हणून संबोधले जाते. हे स्थान जोशीमठपासून १० कि.मी. दूर आहे. हा परिसर गंधमादन पर्वत म्हणून ओळखला जातो. पुराणात या पर्वताचा खूप ठिकाणी उल्लेख आला आहे. देवदेवतांचे, यक्ष किन्नरांचे, अप्सरांचे हे क्रिडास्थान, वसतिस्थान समजले जाते. या परिसरात सुंदर स्थळे व सरोवरे आहेत, असे महाभारतात उल्लेख आहेत. या ठिकाणी नारदाने विष्णूची तपश्चर्या करून विष्णूला प्रसन्न करून घेतले, अशी आख्यायिका आहे.

विष्णुप्रयाग म्हणजे निसर्गाच्या रौद्र सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सभोवताली उंच पहाड, वेगाने वाहणारे, एकमेकांवर आपटणारे जलप्रवाह व त्यांचा घुमणारा आवाज मनावर विलक्षण दडपण निर्माण करतो. या ठिकाणी विष्णूचे एक सुंदर मंदिर आहे. हे स्थळसुद्धा खूप पवित्र मानले जाते.

हिमालयाच्या या कन्या नाचत, बागडत, उड्या मारत एकमेकींच्या हातात हात घालून, खळाळत असतात. नाजूक फुले, गर्द वनराई, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सुंदर प्रपात त्यांना खुणावत असतात. पण या कुणाकडेच त्यांचे लक्ष नसते. परोपकार, समृद्धी व शेवटी आपले जीवन सागराला समर्पित करणे, हेच त्यांचे जीवन ध्येय आहे आणि या ध्येयाचा ध्यास घेऊनच त्या आपल्या पित्याचे घर सोडतात. नगाधिराज हिमालय त्यांच्याकडे कौतुकाने पहात, कृतार्थ होऊन तृप्त मनाने त्यांना आशीर्वाद देत असतो. कारण त्याला आपल्या लेकींचे ध्येय व उद्दिष्ट माहित आहे.

– प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..