MENU
नवीन लेखन...

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ३ मराठी अर्थासह

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ३ मराठी अर्थासह

श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिताभस्मालेपः स्रगपि नृ-करोटीपरिकरः ।
अमाङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्
तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि ।।२४।।

मराठी- हे मदनाचा नाश करणार्‍या शंकरा, स्मशान हे तुझे क्रीडांगण, भूतप्रेते हे तुझे खेळगडी, अंगी चितेतील राखेचा लेप, तसेच गळ्यात मानवी मुंडक्याची माळ असते. तुझे सर्व वर्तन ओंगळ असले तर असू दे, तथापी हे वर देणार्‍या शंकरा, जे लोक तुझी तुला आठवण काढतात, त्यांच्यासाठी तू मंगलच आहेस.

चिता भस्मा अंगी, मसणवट क्रीडांगण तुला
भुते प्रेते साथी, मनुज कवटी माळहि गळा ।
असो भीतीदायी, मन न मम चिंता करितसे
भले त्याचे होई वरद हृदयी आठवतसे ॥ २४ ॥


मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः
प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदशः।
यदालोक्यालादं हद इव निमज्ज्यामृतमये
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत्किल भवान् ।। २५।।

मराठी- ज्यांनी प्राणायाम करून आपली इन्द्रिये काबूत ठेवली आहेत, यमनियमांचा अवलंब करून मन अंतर्मुख केले आहे, आनंदाने ज्यांच्या अंगावर रोमांच उठले आहेत आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, अमृतमय डोहात डुंबतानाचा प्रसन्न आनंद उपभोगतात अशी त्या योगीजनांची स्थिती ज्याला पाहून होते ते तत्त्व साक्षात् तूच आहेस.

बरे प्राणायामे श्वसन, वळवी चित विधिने
नियंता गात्रांचा, पुलकित तनू, नीर नयने ।
डुबे प्रीती डोही, प्रमुदित स्थिती ज्यास बघता
यतीची, ते साक्षात परम अससी सत्य जगता ॥ २५ ॥


त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः
त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च ।
परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं
न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वं न भवसि ।। २६।।

मराठी- तू सूर्य आहेस, चंद्र आहेस, वारा आहेस, अग्नी आहेस, पाणी आहेस, आकाश आहेस,पृथ्वी आहेस, आत्मा आहेस, असे मर्यादित शब्द प्रगल्भ लोक तुझ्याबद्दल वापरू देत, पण आम्हाला अशी एकही गोष्ट ठाऊक नाही ज्यात तू नाहीस.

शशी वन्ही वारा दिनकर तसा तूच अससी
धरित्री तू आत्मा जल नि नभही तूच अससी ।
अशा व्याख्या मर्यादित सुबुध देती तुजप्रती
जिथे तू ना होसी अणुहि नच जाणे मम मती ॥ २६ ॥


त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा
नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृतिः ।
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः
समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमितिपदम् ।।२७।।

मराठी- हे (भक्तांना) आश्रय देणार्‍या शंभो, तीन वेद (ऋग्वेद, यजु, साम), तीन अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती), तीन भुवने (भूः, भुवः, स्वः किंवा स्वर्ग, मृत्यु, पाताळ), आणि तीन देव (ब्रह्मा, विष्णु, महेश) यांचा (अ-उ-म् या) तीन वर्णांनी बोध करणारे, सर्व विपर्यासांवर मात करणारे व मंद ध्वनीसह चौथी अवस्था (तुरीय) दाखविणारे तुझे भवन असलेले ॐ हे पद मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील तुझी स्तुती करते.

तिन्ही वेदां, देवां, भुवन, स्थिति, वा बोध करते
तिन्हीं वर्णाद्वारे, सुगम बनती, मंद ध्वनि ते
स्थिती चौथी तुर्या, भवन तव कार पद ते
नुरे शंका, व्यक्ती समुह स्वरुपा व्यक्त करते २७


भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महां
स्तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम् ।
अमुष्मिन्प्रत्येकं प्रविचरति देव ! श्रुतिरपि
प्रियायास्मै धाम्ने प्रणिहितनमस्योऽस्मि भवते  ।।२८।।

मराठी- हे ईश्वरा, भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महादेव, भीम तसेच ईशान हे तुझ्या नावांचे जे अष्टक, त्यातील प्रत्येकात वेदांचा सुद्धा संचार आहे. त्यामुळे या माझ्या आवडत्या तेजाला (परमात्मस्वरूप असलेल्या तुला) लीन होऊन साष्टांग नमन करतो.

महादेवा रुद्रा पशुपति भवा उग्र हि तसे
तुला शर्वा भीमा म्हणति जन ईशानहि असे ।
तुझ्या नावांमध्ये सकल श्रुति संचार करिती
धराशायी अंगें नमन प्रिय तेजा पशुपती ॥ २८ ॥

टीप- या अष्टकातील प्रत्येक नावासाठी वेगळी मूर्ती कल्पिलेली असून त्या शर्व-क्षितिमूर्ति, भव-जलमूर्ति, रूद्र-अग्निमूर्ति, उग्र-वायुमूर्ति, भीम-आकाशमूर्ति, पशुपति-यजमानमूर्ति, महादेव-चन्द्रमूर्ति, ईशान-सूर्यमूर्ति अशा आहेत. त्यांची मानवी शरीरातील स्थानेही वेगवेगळी आहेत.


नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः ।
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमो
नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः ।।२९।।

मराठी- ज्याला राने-वने आवडतात, जो अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, त्या (शंकरा) ला नमस्कार. हे मदनाचा नाश करणार्‍या शंभो, अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विस्तीर्ण असणार्‍या (तुला) नमस्कार. हे त्र्यंबका, अत्यंत प्राचीन आणि अत्यंत अर्वाचीन असणार्‍या (तुला) नमस्कार. ही सर्व रूपे ज्याची आहेत अशा तुला नमस्कार. सर्व जगताचा नाश करणार्‍या शंकरास नमस्कार.

वनांची ज्या गोडी, बहु जवळ, जो, दूर असतो
अणूपेक्षा छोटा, सकल जग व्यापून उरतो |
जुना सर्वापेक्षा, नविनतम तो नित्य ठरतो
अशी सारी रूपे, नमन लय-कर्त्यास करतो ॥ २९ ॥

टीप- या श्लोकात चवथ्या चरणात ‘सर्वाय च नमः’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘हे सर्व जाणून तुला नमस्कार’ असा अर्थ होईल.


बहुलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः
प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः ।
जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः  ।।३०।।

मराठी- विश्वाच्या निर्मितीच्या वेळी ज्याचे ठायी रजो गुणाचे प्राबल्य असते त्या भवाला नमस्कार. विश्वाच्या संहाराचे समयी ज्याचे ठायी तमो गुणाचे प्राबल्य असते त्या हराला नमस्कार. सर्व लोकांच्या सुखासाठी ज्याचे ठायी सत्त्व गुणाचा उद्रेक होतो त्या मृडाला नमस्कार. त्रिगुणांपलिकडे असणार्‍या आणि अत्यंत तेजस्वी पद धारण करणार्‍या शिवाला नमस्कार.

रज गुण वृद्धी विश्वा निर्मी, भवा नमना करू
तम गुण वृद्धी विश्वा नाशी, हरा नमना करू ।
जन सुख वृद्धी सत्त्व गुणे, मृडा नमना करू
त्रिगुणरहिता तेजःपुंजा शिवा नमना करू  ॥ ३० ॥


कृशपरिणति चेतः क्लेशवश्यं क्व चेदं
क्व च तव गुणसीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः।
इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधात्
वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम्  ।।३१।।

मराठी- हे वरदात्या शंभो, अपूर्ण वाढ झालेले आणि क्लेशांना बळी पडलेले माझे मन कोठे, तर गुणांच्या सर्व सीमा ओलांडून जाणारे तुझे चिरंतन वैभव कोठे ? या विचाराने आश्चर्यचकित झालेल्या माझ्या भक्तीने मला ताकद देऊन तुझ्या चरणांवर शब्दरूपी पुष्पमालेची भेट चढवायला भाग पाडले.

हतबल मन कोठे, त्रस्त नी पिंजलेले
विभव सकल स्थायी गूण मागे गळाले ।
बघुनि तव, थरारे चित्त हे, भक्ति भावे
सबल तव पदी या शब्द हारां वहावे ॥ ३१ ॥


असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे
सुरतरु-वर-शाखा लेखनी पत्रमुर्वी ।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानामीश पारं न याति  ।।३२।।

मराठी- हे प्रभो, शारदा जरी समुद्राएवढ्या दौतीमध्ये काळ्या डोंगराएवढे काजळ (कालवून), कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी, पृथ्वीचा कागद (करून), सतत लिहीत राहिली, तरीसुद्धा तुझ्या गुणांच्या (वर्णना) पलिकडे जाणार नाही.

जलधि दउत, शाई काजळी डोंगराची
कलम सुर-तरूचे, पत्रिका धारिणीची ।       (कलम- लेखणी, धारिणी – पृथ्वी)
सतत लिहित ब्राह्मी राहिली, खंड नाही              (ब्राह्मी-शारदा)
तव गुण लिहिताना सोडुनी ते न जाई ॥ ३२ ॥


असुरसुरमुनीद्रैरर्चितस्येन्दुमौले-
र्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।
सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो
रुचिरमलघुवृतैः स्तोत्रमेतच्चकार ।।33

मराठी- देव, दानव, श्रेष्ठ मुनी यांनी पूजिलेल्या निर्गुण ईश्वराच्या – चंद्रशेखराच्या – गुणांचे माहात्म्य वर्णन करणार्‍या या रसाळ स्तोत्राची रचना सर्व गणांत प्रमुख असणार्‍या पुष्पदंत नावाच्या (गंधर्वा) ने मोठ्या वृत्तात केली.

ऋषि-सुर-दनुजांनी पूजिले निर्गुणाला
महति शशिशिराची वर्णिली ते रसाळा ।   (शशिशिर- शंकर)
शिव-गण प्रमुखाने काव्य हे पुष्पदंते
स्तुतिपर रचलेसे भक्तिचे दीर्घ वृत्ते ॥ ३३ ॥

टीप- हे शेवटचे काही श्लोक मालिनी व इतर वृत्तात असले तरी येथे उल्लेखिलेले दीर्घ वृत्त पहिल्या २९ श्लोकांचे ‘ शिखरिणी ’ वृत्त आहे.


अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्
पठति परमभक्त्या शुद्धचित्तः पुमान्यः ।
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र
प्रचुरतरधनायुः पुत्रवान्कीर्तिमांश्च ।।३४।।

मराठी- जो मनुष्य शुद्ध मनाने व अत्यंत भक्तिभावाने हे शंकराचे निर्दोष स्तोत्र रोज पठण करील तो शिवलोकात शिवतुल्य होईल आणि इथे (ह्या इहलोकी) त्याला भरपूर धनसंपत्ती, आयुष्य, मुले आणि कीर्ती प्राप्त होईल.

प्रतिदिन म्हणताहे स्तोत्र हे शंकराचे
पुनित, मनुज चित्ते भक्तिने पूर्ण साचे 
शिवसम शिवलोकी होतसे, येथ प्राप्ती
बहुत धन मिळे त्या पुत्र आयुष्य कीर्ती ॥ ३४ ॥

*************************

— धनंजय बोरकर.

(९८३३०७७०९१)

 

 

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..