भारताच्या उज्वल परंपरेचा वारसा कितीतरी अ-भारतीय लोकांना भुरळ घालणारा ठरतो. आपले वैभव आपली संस्कृती आहे, इथल्या रूढी, परंपरा इतरांसाठी प्रेरक ठरतात. इतिहासाची पाने उलटून पाहता ह्याचे अनेक दाखले सापडतील. ह्याच भारतीय विचारांनी प्रेरित होऊन मार्गरेट नोबेल भारतात आल्या आणि भारतीय मातीत मिसळून गेल्या.
१८६७ साली एक ख्रिस्ती संत श्री सॅम्युएल नोबेल ह्यांच्या घरी मार्गरेट नोबेल ह्यांचा जन्म आयर्लंड येथे झाला. घरातले वातावरण धर्मिकच होते, त्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय मृदू बनला, सोशिक बनला. त्यांचे वडील आणि आजोबा आपल्या समाजबांधवांना वेळोवेळी मदत करत असत, त्यांच्या घरी भेट देत असत. मार्गरेट त्यांच्या बरोबर असत. त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण तोपर्यंत संस्काराचे बीज पेरले गेले होते. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या प्रभावाखाली त्या होत्या कारण त्यांनीच मार्गरेट ह्यांना त्याग आणि सेवा-सुश्रुषा ह्यांचे महत्व सांगितले, त्याच्या मनात बीज पेरले. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षकी पेशा स्वीकारला, आपल्या वेगळ्याच शिकविण्याच्या पद्धतीमुळे त्या फार अल्पावधीत सगळ्यांच्या आवडत्या शिक्षिका बनल्या. त्यांचे लेख विविध मासिके, वृत्तपत्र ह्यातून प्रकाशित होऊ लागले, लंडनच्या बुद्धिजीवी लोकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. त्यांच्या आयुष्यला कलाटणी मिळाली जेव्हा १८९५ साली त्यांची भेट विवेकानंदांशी झाली. मुळच्या धार्मिक वृत्तीच्या मार्गरेट विवेकानंदांच्या विचारांनी अजूनच प्रभावित झाल्या. त्यांनी अनेक शकांचे निरसन करून घेतले आणि विवेकानंदांचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले, त्या १९९८ साली भारतात आल्या आणि विविकांनंदानी त्याने नामकरण केले भगिनी निवेदिता.
त्या मुळाताच अतिशय समाजप्रिय व्यक्ती होत्या, त्यांच्या अतिशय प्रेमळ गुण प्रवृत्ती मुळे अल्पावधीतच त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. हे अगदी ही सोपं नक्कीच नव्हतं, आधी भारतीय नाही म्हणून भरपूर विरोध सहन करावाच लागला त्यांना, पण त्यांच्या स्वभावाची, गुणांची भुरळ जन-मानसावर उमटायला वेळ लागला नाही. गरिबी, अस्वच्छता, शिक्षण ह्या क्षेत्रात त्यांनी समाजात काम करायला सुरुवात केली. समाज सेवेचे व्रत आजीवन घेतले. जेव्हा त्या समाजात वावरत होत्या तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त एक गोष्ट जाणवली ती म्हणजे इथे राष्ट्रप्रेमाच्या भावनेची कमतरता. त्यासाठी त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला. भारताचे वैशिष्ट्य त्यांनी अचूक ओळखले ते म्हणजे ‘अनेकता मे एकता’ त्यांनी ह्याच विषय घेऊन भरपूर लिखाण केले. त्यांचे घर म्हणजे सगळ्या विचारवंतांनासाठी तसेच करांतीकरकांसाठी हक्काचे ठिकाण होते. रवींद्रनाथ जी, जगदीश चंद्र बोस, गोपाळ कृष्ण गोखलेजी तसेच अरबिंदो घोष ही त्यातली काही नावे. त्या वेग-वेगळ्या चर्चांमध्ये भाग घेत, मार्गदर्शन करत असत.
१८९९ साली कोलकात्त्यात प्लेग ची साथ आली. समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या भगिनी निवेदिता स्वतःची पर्वा नकरता रुग्णांची सेवा सुश्रुषा करण्यात अग्रेसर होत्या. ह्या सगळ्यात त्यांची तब्येत ढासळली. १३ ऑक्टोबर १९११ साली वयाच्या केवळ ४३ व्या वर्षी ह्या तेजस्वी शलाकेने शेवटचा श्वास घेतला. इतक्या अल्पायुष्यात त्या रवींद्रनाथांच्या ‘लोकमाता’ झाल्या, गुरू अरविंदोंच्या ‘अग्निशिखा’ झाल्या, तर संपूर्ण भारताच्या ‘भगिनी निवेदिता’ झाल्या. निवेदिता म्हणजे ‘समर्पित’ आपलं पूर्ण जीवनच ज्यांनी भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित केले त्यांना आम्हा भारतीयांकडून मनाचा मुजरा.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०१/०८/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.thebetterindia.com/
http://xn--f4b.inuth.com/
Wikipedia.org
http://xn--h4b.advaitaashrama.org/
Leave a Reply