असेच एका सायंकाळी,
सहजी पाहिले आकाशी,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले देवाशी.
उलगडलो उघड्या जमिनीवरती,
अनं हाताची केली उशी,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले देवाशी.
आंथरलेला होता वरती,
मैलोगणती गालीचा ,
चमचमणारी नक्षी त्यावरी,
वापर केला ताऱ्यांचा.
रेलायाला बैठकीवरी,
मऊशार ढगांची केली उशी,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले देवाशी.
एकेरीवर आलो अनं मी,
साद घातली देवाला
पळभरती म्हटले टेक जरासा,
चार गोष्टी बोलायाला.
ये ना सामोरी असा तू ,
मैफिल जमवुया खाशी ,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
काय म्हणते वैकुंठाची म्हटले,
बरी आहे ना पाणी हवा ?,
दिवाळसणासाठी वहिनींना,
खरिदला का शालू नवा ?
सुनी गेली आषाढी कार्तिकी,
भेट न घडली भक्तांची ,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
बोलतो आता मुद्द्याचे देवा,
काय सांगू रे मी तुजला ,
विषाणू फोफावला इथे अन् ,
मारीत चालला आम्हाला.
माणूसघाणा झाला माणूस,
अन् दुरावला माणुसकीशी ,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
भाग्य आमुचे देवा घातले,
आम्हास मानव जन्माला ,
सृष्टीचा रे तूच करविता,
जन्म दिला या विश्वाला.
मर्यादा सोडून ईश्वरा, आमुच्या,
मांडला दावा तव सृष्टीशी
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
विषाणूचा व्यापार नांदतो,
निर्मित तव पृथ्वीवरती ,
सर्वांगसुंदर तुझी निर्मिती,
व्हावे तिने किती स्वार्थी ?.
तूच एक आधार आता,
वाचव यातून जगतासी ,
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
बोलू म्हटले तुजपाशी.
बोलू म्हटले तुजपाशी.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply