त्या पाच बाय दहाच्या खोलीत –
एक लोखंडी कॉट रहाते,
अगदी त्याच खुराड्यात –
एक कपाट रहाते,
त्यामध्येच अंग चोरुन –
चिंचोळी मोरीही रहाते,
मोरीशेजारीच वस्तीला –
जुनाट टेबल रहाते.
राहिल्या जागी मोजक्या –
भांडी ट्रंका रहातात.
या जुनेऱ्यामध्ये चकचकीत –
टीव्ही पण वसतो.
फिरणारा पंखा गरमी –
खोलीभर फिरवतो.
डगडगणाऱ्या खुर्चीवर –
श्वास छातीतच कोंडतो.
दोघांमधली ती बोलते –
खूप खूप बोलते,
ऐकून ऐकून मनाला –
थकवा यायला लागतो.
भकास डोळ्यांचा तो –
मध्येच टाळी मागतो,
काहीबाही पुटपुटून –
पुन्हा आडवा होतो.
तिची टकळी पहिल्यासारखी –
पुन्हा सुरू होते.
तो पुन्हा उठतो –
तिला, चहा कर म्हणतो,
त्याचा हा विचार –
मलाही बरा वाटतो.
ती मात्र त्या बऱ्या विचाराकडे –
दुर्लक्ष करते,
सहजच माझी नजर –
टेबलावर भांड्यांवर फिरते.
दूध आणि साखरेची –
वानवा जाणवते.
चहाच्या तल्लफेला मारून –
बरं, म्हणून निघतो,
तिची टकळी थांबते –
तो उठून बसतो.
खोलीबाहेर येताच, कोंडलेला
श्वास मोकळा होतो,
चहापेक्षा बहुधा तोच –
फार फार गरजेचा असतो.
आता, पाच बाय दहाच्या –
खोलीचं दार बंद होतं,
कारण, त्या बंद काड्यापेटीत –
फक्त ती दोघच रहातात.
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply