MENU
नवीन लेखन...

ठाण्यातील नाटककार

दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयातून रंगमंचावर साकारले जाणारे नाटक सर्वात आधी उमटते ते नाटककाराच्या मनात. कधी एखादी सामाजिक समस्या कधी कुठली राजकीय बातमी, कधी चक्क पुराणकथा, कधी मनात उमटणारे भावनांचे संदर्भहीन तरंग, कशामुळे नाटककाराच्या मनात नाटकाची ठिणगी पडेल सांगता येत नाही. पण ही ठिणगीच नंतर प्रेक्षकांच्या मनात विचारांची ज्वाला पेटवते. नाटक हे जसं करमणुकीचं साधन आहे, तसंच ते समाजप्रबोधनाचं हत्यारही आहे, याची जाणीव मराठी नाटककारांना आरंभापासूनच होती आणि आजही आहे. मराठी नाटककारांच्या या परंपरेत ठाण्यातल्या नाटककारांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. हा काही परिपूर्ण आढावा नाही, याची जाण आहे. कित्येक लेखकांची माहिती मिळाली नाही, शोध कमी पडला, प्रयत्न कमी पडले हे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. पण तरीदेखील जास्तीत जास्त लेखकांची माहिती घेण्याचा ‘तोकडा’ का होईना, प्रयत्न केला आहे.

एकोणिसाव्या शतकात संगीत नाटकांची सुरुवात झाली. ठाण्यात आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी १८९० मध्ये ‘संगीत संभाजी’ हे संगीत-ऐतिहासिक नाटक लिहून सादर केल्याची नोंद सापडते. त्यानंतर १९०९ मध्ये ठाण्यातील गोपाळ गोविंद सोमण यांनी ‘बंधविमोचन’ हे नाटक लिहून सादर केल्याचा उल्लेख आहे.

नाट्यसंमेलनांचा विचार करता १९०५ मध्ये मुंबईत दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले नाट्यसंमेलन झाले. ठाणे जिह्यात प्रथम १९७२ साली ज्येष्ठ नाट्यकलाकार मामा पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथे ५३वे संमेलन, १९९१ मध्ये वाशी येथे नाट्य अभिनेता शरद तळवलकर यांच्या अध्यक्षतेखाली ७२वे, २००२ मध्ये वसई येथे नाट्यनिर्माता मोहन तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली ८२वे आणि त्यानंतर २००५ मध्ये डोंबिवलीच्या ८५ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष नाटककार सुरेश खरे होते. मात्र ठाणेनगरीत यंदा प्रथमच ९६ वे नाट्यसंमेलन ज्येष्ठ नाट्यकर्मी व लेखक गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानिमित्ताने ठाण्यातील नाटककारांविषयी थोडं लिहावंसं वाटतं.

ठाण्यातील दिग्गज पत्रकार म्हणजे स. पां. जोशी आणि नरेंद्र बल्लाळ. या दोघांनी नाट्यक्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे श्याम फडके यांच्यापासून ते प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे यांच्यापर्यंत आणि डॉ. आनंद नाडकर्णी, अशोक समेळ यांच्यापासून ते संतोष पवार, चिन्मय मांडलेकर यांच्यापर्यंत ठाण्यातील नाटककारांनी हे दालन समृद्ध केलं आहे.

सन्मित्रकार स. पां. जोशी यांचे ‘सिंहगर्जना’ हे नाटक अतिशय गाजले होते. त्यांनी १९५२ मध्ये लिहिलेल्या चार अंकी ‘संदेश’ या नाटकाने विशेष प्रसिद्धी मिळवली होती. त्याचप्रमाणे सपांचे ‘जीवनकला’ हे नाटक नंतर हिंदीतही अनुवादित झाले होते. ‘संगीत कलाकार’, ‘मायबाप महात्मा फुले’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत.

‘ठाणे वैभव’कार नरेंद्र बल्लाळ यांनी बालनाट्य चळवळीत विशेष योगदान दिले होते. ‘नवलभूमीचा यक्ष’, ‘मंगळावर स्वारी’, ‘राजाला फुटले पंख’, ‘चंद्र हवा चंद्र हवा’, ‘डॉ. आळशी आणि बोलणारा कुत्रा’, ‘एक होता जोकर’ अशी उत्तमोत्तम नाटके बल्लाळ यांनी लिहिली व बालनाट्यविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. बल्लाळ यांनी ‘नवलरंगभूमी’ स्थापन करून त्याद्वारे अनेक बालनाट्ये सादर केली.

ज्येष्ठ रंगकर्मी व ठाण्याच्या नाट्यचळवळीतील एक महनीय व्यक्तिमत्त्व असणाऱ्या भालचंद्र रणदिवे ऊर्फ चंदा रणदिवे यांनी ‘लग्न होऊन ब्रह्मचारी’, ‘माकडाच्या हाती कोलीत’, ‘दोघे एका खोलीत? बोंबला!’ ही तीन नाटके लिहिली होती.
प्रा. श्याम फडके हे तर ठाण्यातील नाटकक्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचे प्रेरणास्थानच. शिक्षण, नाटक आणि समाज सर्वत्र उत्साहानं, तळमळीनं कार्यरत असणाऱ्या फडकेसरांनी नाट्यक्षेत्रासाठी दिलेले योगदान कोणताच ठाणेकर रसिक विसरणार नाही. बालरंगभूमी, फार्सिकल नाटके, व्यावसायिक नाटके, एकांकिका अशा सर्व प्रांतांत फडके सरांनी हाडाच्या लेखकाची भूमिका वठवली आहे. त्यांनी ‘तीन चोक तेरा’, ‘काका किशाचा’, ‘खोटे बाई आता जा’, ‘बायको उडाली भुर्र’ अशी फार्सिकल ढंगांची नाटके लिहिली. ‘एक होतं भांडणपूर’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ अशी मुलांची नाटके सरांनी लिहिली. ‘फजिती रे फजिती’, ‘नीलमपरी’, ‘बंडुच्या मुंजीचा फोटो’ अशा एकांकिका लिहिल्या. ‘अर्ध्याच्या शोधात दोन’, ‘कां असंच का?’, ‘खरी माती खोटा कुंभार’ अशी नाटके फडकेसरांनी लिहिली. अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक संस्थांच्या उभारणीत सरांचा मोलाचा वाटा होता. फडकेसरांनी नाट्यकर्मींची एक पिढी घडवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शशिकांत कोनकर यांची ओळख नाही, असा ठाणेकर साहित्य रसिक विरळा. कोनकरसरांनी विपुल लेखन केले आहे. नाटककार, अर्थतज्ञ, बँकिंग व शिक्षणक्षेत्रातील जाणकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ठाणे गौरव, स. पां. जोशी नाटककार पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, ठाणे नगररत्न अशा पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. मुलांसाठी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. त्यांची बालकांसाठीची नाटके प्रसिद्ध आहेत. ‘नारदाची चुगली बग्याची बुगली’, ‘विनविनची गोष्ट’, ‘अर्धी थाप’ पासून ते ‘राजू तू खरं सांग’ ही नाटके त्यांच्या समृद्ध लेखनाची ग्वाही देतात. ‘राजू तू खरं सांग’ या नाटकावर आधारित दूरदर्शन मालिकाही सादर झाली होती. कोनकरसरांनी लिहिलेली ‘तीन घोडे अडीच घरात’, ‘हनिमून एक्प्रेस’, ‘लव्हगेम’, ‘कलिकवच’, ‘खुनी पळाला काळजी नसावी’, ‘पत्त्यात पत्ता’, ‘मृगजळावर एक सावली’, ‘अकोनाहट’, ‘बायकोचा खून कसा करावा?’, ही नाटके तसेच ‘ इकडे व्हिलन तिकडे मिलन’ हे विडंबननाट्य, ‘तुझ्या विना तुझ्या सवे’ अशी उत्तमोत्तम नाटके, ‘नारद चळला बाईवर भाळला’ हे धम्माल वगनाट्य गाजले. त्यांच्या नाटकात राजा गोसावी, मोहन कोठीवान, नयना आपटे, वि. र. गोडे, लता थत्ते, सविता मालपेकर, शंकर घाणेकर, सरला येवलेकर, आशा पोतदार, शरद पोंक्षे, विद्याधर जोशी अशा दिग्गजांनी काम केले होते. ज्येष्ठ नाट्यकर्मी दिवंगत शशी जोशी यांच्यासाठी त्यांनी ‘उचक्या’ हे एकपात्री नाटक लिहिले होते. त्याचे अनेक प्रयोग झाले. कोनकरसरांनी ‘ठिपक्यातील तरुणी’, ‘डिट्टो-डिट्टो’, ‘किती रंगला खेळ’, ‘मिटिंग’ अशा एकांकिकाही लिहिल्या आहेत. त्याशिवाय कोनकरसरांच्या कथांवर त्यांची मुलगी सौ. उमा चांदे यांनी ‘कथारंग’ या नावाने कथाकथनाचे तब्बल ५०० प्रयोग केले आहेत. सरांनी दूरदर्शनसाठी लिहिलेल्या ‘अहो ऐकलंत का?’, ‘गणपतीला दुर्वा प्रिय का?’, ‘बँक-बँक’ या मालिकाही सुपरहिट ठरल्या. मच्छिंद्र कांबळी यांनी त्यापैकी ‘बँक-बँक’ या मालिकेत अभिनयही केला होता. रवींद्र दिवेकर, सखाराम भावे, विजय मोंडकर, आत्माराम भेंडे अशा महान दिग्दर्शकांनी सरांची नाटके दिग्दर्शित केली आहेत.

‘नाट्याभिमानी’ शशी जोशी यांनी ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ हे धम्माल नाटक लिहिले होते. त्याचप्रमाणे ‘काफर फरिश्ता’ ही एकांकिका त्यांनी लिहिली. शशी जोशी यांनी ‘सुराविण तार सोनियाची’ या नाटकाचे लेखन केले आहे. हे सामाजिक आशयाचे नाटक असून १९७२ च्या सुमारास ते सादर झाले होते.

कवी म्हणून विख्यात असणारे ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेली नाटके राज्य नाट्यस्पर्धांमध्ये गाजली आहेत. त्यापैकी ‘असायलम’, ‘आमचे येथे श्रीकृपेकरून’, ‘सहस्र वर्षांचे साचले हे काळे’, ‘सर्ग निसर्गाचा’, ‘राधी’ ही ५ नाटकं तर प्रसिद्ध तर आहेतच, पण ती पारितोषिक विजेतीही ठरली आहेत. बागवेसरांनी ‘मृत्तिकाघट’, ‘अश्वत्थामा’, ‘माचिस’ अशा एकाहून एक सरस सुमारे दहा एकांकिकाही लिहिल्या आहेत. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, कविता राजधानी पुरस्कार, गदिमा पुरस्कार, झी अॅवॉर्ड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार अशा मान-सन्मानांचा समावेश आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष व ‘झिनझिनाट’ कवितेनं महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती असणाऱ्या कवी डॉ. महेश केळुसकर यांनी चक्क नाटकही लिहिले आहे. केळुसकरांचे साहित्य, सिने, आकाशवाणी, कोमसाप आदी क्षेत्रांतील कार्य साऱ्यांना माहीत आहे. पण त्यांनी त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘क्रमश पुढे चालू’ हे नाटक लिहिले आहे.
प्रा. श्रीहरी जोशी हे ठाण्यातील आणखी एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ओळख असणारं नाव. हरिभाऊंनी लिहिलेली नाटके अद्याप अनेकांना प्रेरणादायी आहेत. राज्य नाट्यस्पर्धा असो, एकांकिका स्पर्धा असो, प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक नाटक असो, हरिभाऊंनी आपली लेखणी त्यासाठी परजली होती. त्यांच्या ‘अवस्थांतर’, ‘थिएटर’, काजळडोह’, ‘अश्वत्थाची मुळे’, ‘अदृष्टाच्या वाटेवर’, ‘श्रीशिल्लक’ अशा नाट्यकृतींनी रंगभूमी गाजवली होती.

नंदकुमार नाईक यांनीदेखील ‘बास्टर्डस्’, ‘असंच एक गाव’ अशी नाटके लिहिली. ‘बास्टर्डस्’ या नाटकानं ऐंशीच्या दशकात राज्य नाट्यस्पर्धेत उज्ज्वल यश मिळवले होते. प्रा. सुभाष सावरकर हे अभियांत्रिकी आणि गणित विषयाचे अध्यापक. पण त्यांचे नाट्य क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, दूरचित्रवाणी कार्यक्रमांसाठी, तसेच जाहिरातपट, चित्रपट यासाठी कथा, पटकथा, संवादलेखन, गीतलेखन, निवेदन, संकलन अशा वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी वठवल्या आहेत. ‘कडा रुपेरी काळोखाची’, ‘खेळ चरित्राचा’, ‘अग्नी मागतोय् समिधा’ या त्यांच्या तीन स्वतंत्र सामाजिक विषयांवरील नाटकांचे हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरून प्रयोग झाले आहेत. ‘सळगे लीलुंडा वांसवन’ या नावाने गुजराती व्यावसायिक रंगभूमीवरून प्रयोग झाले आहेत. ‘कडा रुपेरी काळोखाची’ आणि ‘खेळ चरित्राचा’ या दोन्ही नाट्यकृतींवर मराठी दूरचित्रवाणी मालिकाही सादर झाल्या आहेत. ‘खेळ चरित्राचा’ या नाटकाचे ‘बोल राधा बोल’ या नावाने गुजराती रंगभूमीवरून प्रयोग झाले आहेत, तर ‘कडा रुपेरी काळोखाची’ हे नाटक पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहे. प्रा. सावरकरांनी ‘सौदा’, ‘कॉम्पेन्सेशन’, ‘इनाम रुपये पंचवीस हजार’, ‘अग्निपरीक्षा’, ‘निर्णय’, ‘स्पर्धेच्या नाटकाचे नाटक’, ‘मॅटिनी आयडॉल’, ‘अंधेरनगरीतील भारनियमन’ अशा आठ एकांकिका लिहिल्या असून बहुतेकांचे हौशी रंगमंच, स्पर्धा यातून प्रयोग झाले आहेत. काही एकांकिकांना पुरस्कारही मिळाला आहे. समीक्षा, आत्मचरित्राचे शब्दांकन, गीतसंग्रह, संपादन आणि संकलन अशा लेखनाची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डॉ. र. म. शेजवलकर यांनी एकाच प्रकारच्या लेखनात न अडकता वेगवेगळ्या प्रकारे साहित्यसेवा केली आहे. त्यांनी एकांकिका, तमाशानाट्य, बाहुलीनाट्य, कादंबरी, काव्य आणि व्यावसायिक नाटक असा चौफेर प्रवास केला आहे. मुळात त्यांची नाट्यलेखनाची सुरुवात ‘राजा जो जो रे’, ‘आली आली ही राधाबाई’, ‘ऐलतीर पैलतीर’ अशा नाटकांपासून झाली. मामा पेंडसे यांच्या आत्मचरित्राचे लेखनिक म्हणून डॉ. शेजवलकर यांनी काम केले होते. मामांनी दिलेली संधी आणि त्यांचा सहवास, त्यातून घडलेला स्नेह याची कृतज्ञता ते नेहमी व्यक्त करतात. डॉ. शेजवलकर यांनी एकांकिका, नाटक व संगीतिका असे प्रकार यशस्वीपणे हाताळले. तेव्हाच्या काळी त्यांना आव्हानात्मक वाटणारा पण नंतर त्यांच्या हातून सहज लिहून झालेला ‘पळता भुई थोडी’ हा फार्स आयएनटीतर्फे रंगभूमीवर सादरही झाला. दूरदर्शनवरील ‘गजरा’ मालिकेतील काही भाग, ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या मालिकेचे काही भाग त्यांनी लिहिले. तमाशा लेखन स्पर्धेसाठी त्यांनी लेखन केले व त्याबद्दल पुरस्कारही मिळवले. विनोदी लेखनाचे पैलू त्यांना त्या लेखनातून सापडले. रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांसाठी त्यांनी कमी वेळात विनोदी ढंगाची संहिता लिहिण्याचे तंत्र आत्मसात केले. मग पथनाट्य, बाहुलीनाट्य, लोकनाट्य अशा लेखनाकडे ते वळले. ‘रमंथ’ हा कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहे. शिवाय कादंबरी लेखक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे ‘वांझोळ’ या कादंबरीवर आधारित ‘स्वप्नात रंगले मी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर गाजले होते. ‘चल घेऊन टाक’ या नाटकाची तर व्हीसीडी निघाली. ठाणे महापालिकेने त्यांना ‘ठाणे गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

डॉ. मुरलीधर गोडे हे शिक्षणतज्ञ आणि चित्रपट गीतकार म्हणून सर्वांना परिचित असले तरी त्यांनी लिहिलेली वगनाट्ये, पथनाट्ये यांचे वर्णन अजूनही नाट्यरसिक करतात. ‘सस्त्यात लावली राजकन्या’, ‘गाडीला लागलाय घसरा’ अशी वगनाट्ये सामाजिक विषमतेवर फार्सिकल ढंगाने प्रहार करणारी होती. गोडेसरांचे ‘लगोरी पथनाट्यांची’ हे पुस्तकही पथनाट्य करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

कवी, गीतकार, कादंबरीकार, निरुपणकार, व्याख्याते आणि शिक्षणतज्ञ अशी ओळख असणाऱ्या प्रा. प्रवीण दवणे यांनी ‘आई परत येतेय’, ‘स्माइल प्लीज’, ‘प्रिय पप्पा’, ‘श्रीयुत सामान्य माणूस’ ही नाटके लिहिली आहेत. सरांचे ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’ हे नाटक कितीतरी वर्षं बालरंगभूमीवर गाजत होते.

प्रा. प्रदीप ढवळ यांच्या ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ या कादंबरीवर अशोक समेळ यांनी ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे विश्वविक्रमी नाटक लिहिले आहे. त्याचे ४० तासांत सलग ११ प्रयोग झाले; हा विश्वविक्रम ठरला. सरांनी ‘बँक ऑफ बालपण’ हे बालनाट्य लिहिले आहे. त्यांचे ‘शिवबा’ हे ८० कलाकारांच्या ताफ्यातील एक संस्मरणीय असे महानाट्य महाराष्ट्रात गाजत आहे. ‘द्वंद्व’ हे नाटकही त्यांनी लिहिले आहे. प्रा. प्रदीप ढवळ यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य ललामभूत आहे. त्यांना ठाणे भूषण, ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा साहित्यभूषण, आदर्श शिक्षक, धनंजय कीर स्मृती आदी सन्मान-पुरस्कार मिळाले आहेत. कोकण कला अकादमी, कोमसाप, युवाशक्ती, प्रेरणा सांस्कृतिक व्यासपीठ, शारदा शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील ज्येष्ठ महाविद्यालय, आर. जे. ठाकूर ज्येष्ठ महाविद्यालय, नालंदा भरतनाट्यम् नृत्यनिकेतन या संस्थांचे ढवळसर अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.
ठाण्यात राहणाऱ्या नाटककारांमध्ये सुभाष जोशी यांचा उल्लेख करायला हवाच. शालेय जीवनापासून नाटकाची आवड असलेल्या जोशींनी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. ‘रंगायन’ च्या चळवळीशी जोडले गेल्यानंतर, विजया मेहतांनी त्यांच्यावर एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद करण्याची जबाबदारी सोपविली आणि मराठी रंगभूमीवर अवतरलं ‘बाई खुळा बाई’. पुढे नोकरीच्या व्यापात रंगभूमीचा विरह सहन करावा लागला तरी पत्नी सुहास जोशी यांच्या अभिनय कारकीर्दीने सुभाष जोशींमधील रंगकर्मी सुखावला.

डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत. गेली २५ हून अधिक वर्षे ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ’ या संस्थेच्या माध्यमातून ते नानाविध उपक्रम राबवित असतात. पण नाटककार म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी लिहिलेल्या नाटकातून मानवी मन, नातेसंबंध, भावनांची गुंतागुंत हे विषय अतिशय नजाकतीने मांडले आहेत. इंडियन मर्चंट चेंबरचा प्लॅटिनम ज्युबली पुरस्कार, डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, शतायुषी पुरस्कार, आयएमए चा डॉक्टर ऑफ द इयर पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना लाभले आहेत. त्यांची ‘सोबतीने चालताना’ व ‘जन्मरहस्य’ ही दोन नाटके सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहेत. ‘झडलेला मोहोर’, ‘पार्टनर’, ‘युद्धस्य कथा’, ‘लोककथा ८५’, ‘कर्फ्यु’, ‘एका स्वामीची महायात्रा’, ‘द फोर्टी फर्स्ट’ या एकांकिकांनी अनेक पुरस्कार मिळवले होते. ‘मयसभा’ या नाटकाच्या लेखनाबद्दल हौशी नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिकही डॉ. नाडकर्णी यांना मिळाले होते. ‘रंग माझा वेगळा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘असेच आम्ही सारे’, ‘तुझ्या विना’, ‘गेट वेल सून’, ‘त्या तिघांची गोष्ट’ ही व्यावसायिक नाटके त्यांनी लिहिली आहेत. लवकरच ‘सार्थक’ व ‘युगधर्म’ अशी दोन नाटके रंगमंचावर येतील. ‘जन्मरहस्य’ व ‘त्या तिघांची गोष्ट’ साठी डॉ. नाडकर्णी यांना पुरस्कारही मिळाले आहेत. डॉ. नाडकर्णी यांनी ‘भरतशास्त्र’ या नाट्यमाध्यमाला वाहिलेल्या मासिकाचे सहसंपादक म्हणून काही काळ कार्य केले आहे.

अशोक समेळ यांची ओळख अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी चतुरस्र आहे. १८ व्यावसायिक नाटके, २३ गुजराती नाटके, ९ प्रायोगिक नाटके लिहिणारे समेळ यांनी मराठी दूरदर्शन मालिकांच्या २००० हून जास्त भागांचे लेखन केले आहे. थोडथोडके नव्हे तर तब्बल ३५ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात मामा वरेरकर पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार, ठाणे गौरव, ठाणे नगररत्न, कोमसाप पुरस्कारांचा समावेश आहे. समेळ यांची सगळीच नाटके गाजली आहेत. त्यात ‘संन्यस्त ज्वालामुखी’चा उल्लेख करावा लागेल. ‘कुसुम मनोहर लेले’, ‘केशव मनोहर लेले’, ‘पिंजरा’, ‘शपथ तुला जिवलगा’, ‘राजा रविवर्मा’ अशी उत्तमोत्तम नाटके लिहिणारे समेळ उत्तम एकांकिका लेखक, मालिका लेखक आहेत. ‘डोंगर म्हातारा झाला’, ‘अकरा कोटी गॅलन पाणी’ या कादंबऱ्यांचे नाट्यरूपांतर समेळांनी केले.

ठाणेकर नाटककारांच्या यादीतील एक वेगळं नाव म्हणजे उदय निरगुडकर. आपल्या महाविद्यालयीन जीवनात कलासरगम या संस्थेमधून नाट्यवर्तुळात वावरणाऱ्या उदय निरगुडकरांनी ‘श्रीमंत नारायणराव पेशवे अथवा कुणाचाही खून-संदर्भ भाऊबंदकी’, ‘कॅलिग्युला’, ‘ॲ‍मेड्युअस’, ‘विठ्ठला’ अशा नाटकांमधून लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. १९९२ साली उदय निरगुडकरांचे ‘महायात्रा’ हे नाटक नाट्यछंदीतर्फे राज्य नाट्यस्पर्धेत ठाणे केंद्रावर सादर झाले. या नाटकाने ठाणे केंद्रावर पहिला, तर अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावला. उदय निरगुडकरांना लेखनाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी ‘सी.इ.ओ.’ नावाचे अगदी वेगळ्या धर्तीचे नाटक लिहिले. शेवटच्या लोकलमध्ये एका डब्यात एका कंपनीचा हाय प्रोफाइल सी.इ.ओ. आणि मुंबईचा एक डबेवाला एकत्र प्रवास करत असतात. त्यांच्या संवादातून उलगडते ‘व्यवस्थापन जगण्याचे आणि व्यवसायाचे.’ मराठी आणि हिंदी भाषेतल्या या नाटकाचे प्रयोग अनेक कॉर्पोरेट हाऊसेसनी केले आहेत.
‘आनंद केदार’ या नावाने एकाहून एक सरस बालनाट्ये लिहून बालरंगभूमीच्या प्रवाहात स्वत:ची नाट्यमुद्रा उमटवणारा लेखक म्हणजे ठाण्याचे माधव चिरमुले. बालप्रेक्षकांची गरज ओळखून मराठी रंगभूमीवर बालनाट्याचा वेलू वाढवणाऱ्या सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटरतर्फे माधव चिरमुले यांचे पहिले बालनाट्य ‘फोनने वाजवला बेंडबाजा’ हे बालनाट्य रंगमंचावर आले ते ८० चे दशक सुरू होताना. त्यानंतर त्यांची ‘दे दणादण’, ‘मिळतील का मला आई बाबा’, ‘एप्रिल फुल, अक्कल गुल’ ही हसती-गाती बालनाट्ये लिटिल थिएटरच्या शैलीत रंगमंचावर आली आणि गाजली. यातल्या ‘मिळतील का मला आई बाबा’ या नाटकाला त्या वर्षीचा नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ठाण्याच्या कलासरगमतर्फे ‘भ भ भ भूताची भंबेरी भम्’, ‘आली रे आली इरसाल कार्टी’, ‘चिट्ठी चपाटी भलत्याच्या पाठी’ ही बालनाट्ये सादर झाली. यातील ‘भ भ भ भूताची भंबेरी भम्’ने ४५ दिवसांत २५ प्रयोग करण्याचा विक्रम केला. त्यानंतर सुधाकर मोहोड यांच्या कलारंजनतर्फे माधव चिरमुले यांचे ‘गुंड्यागडबड्या’ हे नाटक सादर झाले. राक्षस, परी, जादू अशा साचेबद्ध काल्पनिक वातावरणात न रमता मुलांचे प्रश्न, मुलांविषयीच्या समस्या, वास्तववादी व्यक्तिरेखा यातून रंजकपणे बालनाट्ये फुलवण्याचे कौशल्य चिरमुले यांना अवगत आहे. बाल रंगभूमीवरच्या या चमकदार कामगिरीनंतर त्यांची लेखणी प्रौढांच्या रंगभूमीकडे वळली. कै. उषा दातार यांच्या ‘काकस्पर्श’ या कथेवर आधारित ‘जन्मगाठ’ हे नाटक लिहून चिरमुले यांनी मराठी रंगभूमीच्या दालनात मोलाची भर घातली आहे. ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकृती असा या नाटकाचा गौरव केला होता. याखेरीज मिलान मुखर्जी या बंगाली नाटककाराच्या नाटकाचा ‘घोडा घोडा’ हा अनुवाद चिरमुले यांनी केला आहे. आशा बगे यांच्या ‘घोरपड’ कथेवर आधारित ‘दिवाकर विनायक रत्नपारखी’ या टेलिफिल्मची पटकथा, संवाद, ‘झेप’ या मालिकेचे काही भाग लिहिणाऱ्या चिरमुले यांनी सोनिया परचुरे दिग्दर्शित ‘कृष्ण’ या बॅलेसाठी हिंदी पद्यरचनाही केली आहे.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत स्वतची खास ओळख निर्माण केली आहे. ते यशस्वी निर्माता-दिग्दर्शक आहेतच, पण उत्तम नाटककार आहेत. त्यांनी १९८३ मध्ये लिहिलेले व सादर केलेले ‘टूरटूर’ हे नाटक अद्याप नाट्यरसिकांच्या स्मरणात आहे. बेर्डे यांनी १० नाटकांचे लेखन तर २० नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. ‘जाऊबाई जोरात’ हे त्यांचे नाटक खूप गाजले. या नाटकाला २७ पुरस्कार मिळाले आहेत. आजवर नऊ चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले असून, त्यापैकी ‘हमाल दे धमाल’ तर मराठी सिनेमाविश्वात मैलाचा दगड ठरणारा सिनेमा होता. बेर्डे यांच्या ‘भस्म’ आणि ‘तावीज’ या चित्रपटांनी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

शिरीष हिंगणे यांनी लिहिलेली ‘जान तेरे नाम’, ‘परिसस्पर्श’ ही नाटके राज्य नाट्यस्पर्धेत पुरस्कार मिळवून गाजली. त्यांची ‘दंगा’ ही एकांकिका तर आंतरविद्यापीठातही प्रथम आली होती. हिंगणे यांनी लिहिलेल्या ‘काय पाहिलंस माझ्यात?’, ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या दूरदर्शन मालिका सर्वपरिचित आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागातर्फे काही वर्षे ते नाट्यलेखन तंत्रावर व्याख्याने देण्याचे कार्य त्यांनी केले. वाहिन्यांसाठी व कार्टून चित्रपटांसाठीचे लेखन करणारे हिंगणे हे ‘पूजा’ या आध्यात्मिक मासिकाचे संपादकही आहेत.

शिरीष लाटकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका लेखनातून आपली नाट्य-कारकीर्द सुरू केली. म. टा. सन्मान, नाट्य सेवा गौरव, राष्ट्रीय रत्न पुरस्कार, शिक्षक मित्र, ठाणे गौरव आणि पी. सावळाराम पुरस्कारांनी सन्मानित लाटकर यांनी मालिका लेखनात विशेष यश मिळवले आहे. ‘इतिहाससाक्ष खरं सांगेन’, ‘बंध हे नात्यांचे’, ‘जो भी होगा देखा जायेगा’, ‘कधी पूर्णांक, कधी अपूर्णांक’, ‘एक कलावंत जाताना’, ‘केस नं. ९९’, ‘भीती’ अशा विविध विषयांवरच्या सुमारे ४० एकांकिकांचे लेखक असणाऱया लाटकर यांनी ‘अनधिकृत’, ‘कोण कुणासाठी?’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘नाते एका शब्दाचे’, ‘मिस्टर अँड मिसेस 36’ आदी नाटके लिहिली आहेत. ‘गोजिरी’, ‘अधांतरी’, ‘भीती’ आदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘संस्कार’ अशा आठ हिंदी व ‘उतावळे नवरे’, ‘त्यांच्या मागावर’, ‘श्री स्वामी समर्थ’, ‘या सुखांनो या’, ‘वहिनीसाहेब’, ‘कळत नकळत’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘ब्रह्मनायक’, ‘सप्तपदी’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘कन्यादान’, ‘फिरुनी नवी जन्मेन मी’, ‘सुवासिनी’, ‘देवयानी’, ‘ओळख’, ‘आंबट गोड’, अशा अनेक मराठी मालिकांसाठी शिरीषने आजपर्यंत १०००० एपिसोड लिहीले आहेत. त्यांनी ‘भीती एक सत्य’, ‘अधांतरी’, ‘जय अष्टभूजा सप्तश्रृंगी माता’, ‘गोजिरी’, ‘मिशन पॉसिबल’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘साटंलोटं’ अशा ९ मराठी चित्रपटांचे व ३ हिंदी चित्रपटांचे लेखन केले आहे.

नाट्य-मालिका-चित्रपटांची अभिनेत्री, नर्तिका, निवेदिका व लेखक असणाऱ्या संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी नाटककार म्हणूनही ख्याती मिळवली आहे. ‘सोबत संगत’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले होते.

सुभाष फडके यांनी चित्रपट दिग्दर्शनामध्ये स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवला असला तरी त्यांनी नाट्यलेखनही केलेले आहे. सुमारे २२ चित्रपटांचे लेखन, अनेक मालिकांचे दिग्दर्शन करणारे फडके यांनी ‘सेम टू सेम’ हे नाटक लिहिले आहे. त्याचे दिग्दर्शनही त्यांनी केलेले होते.

चिन्मय मांडलेकर यांना आपण चित्रपटाचा, मालिकांचा आणि नाटकांचा कलाकार म्हणून ओळखतो. पण चिन्मय मांडलेकर हे उत्तम लेखक असून त्यांनी लिहिलेली नाटकेही नाट्यरसिकांना भावताहेत. ‘वादळवाट’, ‘असंभव’ या मालिकांपासून सुरुवात करून आज मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये स्थिरावलेल्या मांडलेकर यांनी ‘सनई चौघडे’ या चित्रपटापासून ते ‘झेंडा’, ‘मोरया’ आदी चित्रपटांपर्यंत यश मिळवले. ठाणे महापालिकेच्या शाळांमधून ते स्पेशल एज्युकेशनचे वर्ग चालवतात. त्यांनी लिहिलेली नाटके नाट्यरसिकांना एका वेगळ्याच प्रयोगाची अनुभूती देतात. त्यात ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘समुद्र’ ही नाटके आगळीवेगळी ठरली.

साहित्यक्षेत्रात आणि ग्रंथालय चळवळीत चौफेर मुशाफिरी करणाऱ्या चांगदेव काळे यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यांनी ‘अंत आता पाहता’ हे नाटक लिहिले असून त्याचे एसटी महामंडळाच्या नाट्यस्पर्धेत सादरीकरणही झाले होते. या नाटकाचे केवळ लेखनच नव्हे तर नेपथ्यही काळे यांनी केले होते. गुणवंत कामगार म्हणून राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या काळे यांनी ‘जिप्सी’, ‘केल्याने होत आहे रे’ वगैरे काही एकांकिकाही लिहिल्या आहेत.

गेल्या २०-२५ वर्षांत ताजा दमाचे लेखक ठाण्यात निर्माण झाले. वेगवेगळे प्रयोग होऊ लागले. त्यात संतोष पवार या तरुणाने वगनाट्यांना आणि फार्सिकल नाट्यकृतींना व्यावसायिक नाटकांचा फॉर्म देऊन सामाजिक भाष्य करणारी नाटके सादर केली. ‘यदाकदाचित’ हे संतोषचे नाटक अजरामर ठरले. त्यानंतर ‘जाणूनबुजून’ पासून ‘यंदाकदाचित’ व ‘जरा हवा येऊ द्या’ पर्यंत कित्येक नाटके संतोषने लिहिली, दिग्दर्शित केली व नाट्यरसिकांना वेगळ्या आनंदाची अनुभूती दिली.
अॅड. संजय श्रीराम बोरकर यांनी लिहिलेल्या एकांकिका आणि नाटकांचे मित्रसहयोग या संस्थेद्वारे अनेक प्रयोग झाले. त्यांनी ‘काय हवं असतं आपल्याला’ असे उत्तम नाटक दिले. त्यांच्या ‘शर्यत’, ‘प्रदक्षिणा’, ‘इट वॉज टू लेट’, ‘इटस अ बिझनेस’, ‘हूज गेम?’, ‘मन वढाळ वढाळ’ या नाटकांना आणि एकांकिकांना विविध नाट्यस्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यात राज्यस्तरीय पुरस्कारांचाही समावेश आहे.

हर्षदा बोरकर यांनीही एकांकिका लेखन केले आहे. त्यांच्या ‘मुखवार्ता’, ‘तिन्हीसांजा’, ‘बेटर लेट दॅन नेव्हर’, ‘ती-तिची-तिला’, ‘प्रिय बनानाज्’, ‘बर्थ डे गिफ्ट’ या एकांकिकांना पुरस्कारही मिळाले आहेत. ‘टॅग’ संस्थेसाठी हर्षदा यांनी नाट्य-एकांकिका लेखन केले आहे. बाळकृष्ण शिंदे यांनीही मित्रसहयोगसाठी नाट्यलेखन केले होते. विक्रम भागवत यांची ‘घनदाट’, ‘एक शून्य रडते आहे’ आणि ‘एक दिवस अचानक’ (एकपात्री नाटक – सादरकर्ते अशोक साठे) ही नाटके गाजली.

दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दीपक दळवी आज पत्रकार म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी नाट्यलेखनही केले आहे. त्यात ‘ती आली तेव्हा’ या नाटकाचा समावेश आहे. या नाटकाचे स्पर्धेसाठी प्रयोग झाले होते. दळवी यांनी काही एकांकिकाही लिहिल्या आहेत. त्यात ‘येरे येरे राणी’, ‘मुक्काम पोस्ट रेल्वे ट्रक’, ‘दामाचे पोहे’ या एकांकिका सादर झाल्या तर दळवी यांचे ‘मनी म्यांव’ हे बालनाट्य गाजले होते. युवक बिरादरी या संस्थेच्या बॅले व नृत्य नाटिकांसाठी दळवी यांनी विविध प्रकारची कामे केली आहेत. लहानपणी ‘बजरबट्टू’, ‘गुंड्यागडबड्या’, ‘नारदाची शेंडी’ अशा बालनाट्यातून कामे केलेल्या दीपक दळवी यांनी पुढे अभिनय, नाट्यलेखन, पटकथा, लघुपटाची निर्मिती, जिंगल साँग्ज, जाहिरातपट, तांत्रिक क्षेत्र आदी विभागात खूप काम केले आहे.

ठाण्यातील युवा रंगकर्मी आणि लेखक विजय सुलताने याने बालनाट्य तसेच महाविद्यालयीन नाट्यचळवळीत खूप मोठे योगदान दिले आहे. त्याची ‘इतकं सोपं असतं का?’, ‘ती गेली तेव्हा’, ‘ऑर्फियस द गॉड ऑफ म्युझिक’, ‘ढगाआडचा पाऊस’, ‘पी.के. मास्टर’, ‘भाग कासव भाग’, ‘अल्लादिन’, ‘न्यूनगंड’ अशा एकांकिका विजयनं लिहिल्या आहेत. तर कितीतरी एकपात्री संहिता लिहिल्या आहेत. एकांकिका असो किंवा बालरंगकर्मींसाठी लिहिलेला ‘डराव-डराव’ हा दीर्घांक असो, वेगळ्या आशयाची पथनाट्ये असोत किंवा ‘ऑर्फियस’ नावाचे पूर्ण नाटक असो, विजय ठाण्यातील युवा लेखकांमधील एक धडपडणारा नाटककार म्हणून उदयास येत आहे.

राजेश राणे या तरुणानेही अनेक एकांकिका लिहिल्या, दिग्दर्शित केल्या. राजेशला त्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सातत्यानं नाट्यक्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या राजेशने शालेय मुलांना, महाविद्यालयीन युवकांना आणि प्रौढ हौशी कलाकारांना नाटकाचे व्यासपीठ दिले आहे. ‘वंदे मातरम्’, ‘मानसीचा’, ‘सारीपाट’, ‘काही असे काही तसे’, ‘अंतर्नाद’, ‘स्टॅच्यू’, ‘तगमग टोक’, ‘शॅली पेंडसे बिस्टो’, ‘एक वजा क्षण’, ‘चौकोनाचा एक कोन’, ‘ओएलएक्स.इन’ आदी एकांकिका राजेशने लिहिल्या आहेत.

ठाण्यातील लेखक प्रवीण शांताराम यांनी ‘आमच्या या घरात’, ‘येवा कोकण आपलाच आसा’ आणि सध्या रंगभूमीवर आलेले ‘टॉस’ अशी उत्तमोत्तम नाटक लिहिली आहेत.

पत्रकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रशांत डिंगणकरांनी ‘मुंगी साखरेचा रवा’, ‘एक जखम सुगंधी’ ही नाटके व एक वगनाट्यही लिहिले आहे. ‘मुंगी साखरेचा रवा’ ही मुळात मुलांसाठी असणारी एकांकिका नंतर दोन अंकी व्यावसायिक नाटकात रूपांतरीत झाली आणि ‘लहानांनी केलेले मोठ्यांसाठीचे नाटक’ म्हणून गाजली. सौ. प्रतिभा भिडे या कवयित्रीनं लिहिलेले ‘संगीत शिवलीला’ हे नाटक पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाले आहे. महेन्द्र कोंडे यांनी ‘दास्तान-ए-डायरी’ ही अफलातून एकांकिका लिहिली आहे. खारेगाव येथील विजय भालेकर यांनी ‘रुपाली’ नावाचे नाटक लिहिले आहे. त्याशिवाय प्रादेशिक भाषेतील ठाण्यातील नाटके हा विषयदेखील महत्त्वाचा आहे. आगरी भाषेतील ‘तू कनाला भांडतंस’, ‘देन बगराव पाय’ अशी नाटके लिहिली गेली, सादर केली गेली व गाजलीही.

कित्येक लेखकांनी नाटके, एकांकिका, वगनाट्ये, पथनाट्य लिहिली असली तरी ती पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालेली नाहीत. कित्येकांची नाटके संहितेतच अडकून पडली आहेत. कित्येकांना संधी मिळालेली नाही. त्यांचा शोध घेतला पाहिजे. असे असंख्य नाट्यलेखक ठाण्यात आहेत. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अशा नाट्यकर्मींना व्यासपीठ मिळाले पाहिजे. कितीतरी युवा, तरुण नाटककार वेगवेगळे प्रयोग करताना आढळतात. पण, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि संधी या प्रतीक्षेत काळ निघून जातो आणि मग त्यांना निराशा येते. तसे होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची, वेगवेगळे उपक्रम राबविण्याची, प्रकाशने करण्याची गरज आहे.

हा सारा आढावा केवळ वानगीदाखल होता असे म्हणता येईल. अनेक जणांची माहिती, साहित्यसंपदा, नाट्यसंहिता यांची दखल घेता आली नाही, याची जाणीव आहे. अनावधानानं ठाण्यातील कित्येक नाटककारांची नावे घेता आली नाहीत. त्याबद्दल दिलगिरी आहेच. पण, ठाण्यातील नाटककारांवर कायमस्वरूपी लेखनसूची असावी आणि सविस्तर संदर्भ असावेत, असं वाटतं. त्यादृष्टीनं प्रयत्न झाले पाहिजेत.

–विनोद पितळे

९८१९१०४६१२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..