विदेशी कपड्यांची पुण्यात होळी दसऱ्याच्या मुहूर्तावर साजरी केली. १९०५ मध्ये १ ओक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची सभा झाली. अध्यक्ष होते, श्री.न.चि केळकर, सावरकर तेव्हा फर्गसन कॉलेजात शिकत होते. ते म्हणाले “विदेशी मालावर बहिष्कार घालायचा तर त्यावर एकमेव उपाय म्हणजे विदेशी कपड्यांची होळी करणे “ सभा झाली तेव्हा लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. टिळक पुण्यात आल्यावर सावरकर इतर विद्यार्थ्यांना घेऊन लोकमान्यांना भेटले. त्यांना याच्या परिणामाची कल्पना होती. पण विद्यार्थांचा उत्साह, तळमळ बघून ते म्हणाले “मी नक्की येईन पण माझी अट आहे,होळी पोरकट दिसता कामा नये. गाडीभर कपडे गोळा कराल तर मी येईन.” सारे खुश झाले.
दरम्यान न.चि केळकरांनी एक घोटाळा केला. लोकमान्य पुण्याबाहेर होते. केळकरांनी केसरीत परस्पर छापले कि “ गोळा झालेल्या कपड्यातील काही कपडे गोरगरीबांना वाटले जातील.” याने लोकांचा बुद्धिभेद होईल हे सावरकरांनी ताडले. त्यांनी लगेचच पत्रक काढायचे ठरवले. ते कोणी छापण्यास तयार नव्हते. शेवटी “काळ” कर्ते परांजपे पुढे सरसावले, त्यांनी ते छापले आणि पुण्यात वाटले. होळीच्या दिवशी मिरवणूक लोकमान्याच्या वाड्यापर्यंत आली. सावरकरांनी लोकमान्यांना विचारले”आपण येणार ना ?” टिळक म्हणाले “येणार तर तेवढ्यासाठी तर मुंबईहून तातडीने आलो” टिळक म्हणाले “ होळीच्या ठिकाणी भाषणे करू नयेत. ती मंडई येथे करावी.” सावरकर लोकमान्यांना म्हणाले “ पेटत्या होळीसमोर आपण भाषण केले तर विदेशी वस्तुबद्दल द्वेष लोकांच्या मनात ठाम होईल” लोकमान्यांना ते पटले. लाकडी पुलापलीकडे गेल्यावर विदेशी कपड्यांचा ढीग रचला गेला, व पेटवला गेला.
विदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला. फर्गसनच्या प्राचार्यांनी सावरकरांना शिक्षा करावी हे लोकमान्यांना अजिबात रुचले नाही. त्यांनी १७-१०-१९०५ मधील केसरीत इतिहास प्रसिद्ध ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ हा लेख लिहिला.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply