अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये डॉ. प्रकाश सपकाळे यांनी लिहिलेला हा लेख
संतत्त्वाची परिभाषा मराठी वाङ्मयात सर्वात आधी मुक्ताबाईने केली आहे. संतत्व गुणवत्ता आहे. गुणवत्तेचा अर्क आहे. संस्कृतात ‘संत’ शब्द आहे, तो साधुसंत, सज्जन, सदाचारी अशा अर्थाने. हिंदीत ‘संत’ शब्द ढिसाळपणाने वापरला जातो. सज्जन माणूस या अर्थाने, मराठीत वारकरी संतांच्या संदर्भात हा शब्द योजला जातो. महानुभाव संप्रदायात ‘महंत’ आहेत. ‘आचार्य’ आहेत. ‘संत’ नाहीत. दत्त संप्रदायात ‘गुरू’ आहेत. ‘संत’ नाहीत. समर्थ संप्रदायात महंत, समर्थ, रामदासी आहेत. खिश्चनांमध्ये saint आहेत, ‘संत’ नाहीत. खिश्चन धर्मात ‘सेंट’- saint ठरवण्यासाठी ठराविक पद्धतीने-चाकोरीने, कागदोपत्री पुरावे जमा करून, चमत्कार नोंदवून तांत्रिक पद्धतीने दिली जाते ती उपाधी म्हणजे saint. ती संबंधिताच्या मृत्यूनंतर दिली जाते. गुणवत्तेशी तिचा संबंध नाही. तांत्रिकतेशी आहे. चर्च ठरवते कोणाला saint म्हणायचे ते! अशी ती औपचारिक व तांत्रिक उपाधी आहे. आपल्याकडे संतत्व ठरते ते त्या व्यक्तीच्या हयातीतच आणि परंपरेने ते ठरते. त्या व्यक्तीच्या चारित्र्याने, गुणवत्तेने, आचार-विचारांनी, कार्यकर्तृत्वाने समाजच ते ठरवत असतो. संतत्वाचे निकष संतांच्या चरित्र-चारित्र्यातूनच ठरत असतात. अंगभूत गुणांचा आदर्श आपल्या आचरणातून संतांनी आविष्कृत केला आहे.
संत जेणे व्हावे । जन बोलणे सोसावे ।…
विश्व जाहलेया वन्ही । संतमुखे व्हावे पावी ।
तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
असा संतत्त्वाचा उद्गार प्रथम मुक्ताबाईने केला.
ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या समकालीन संतांनी-विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा, सोयराबाई इत्यादिकांनी संतत्वाची प्रमाणे आपल्या आचार-विचारातून आविष्कृत केली. एकनाथांनी तेच केले. सर्व बाबतीत कळस ठरलेले तुकाराम यांनी संतांचाच आदर्श समोर ठेवून जीवनक्रम आरंभिला.
झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग ।
करू संती केले ते ।
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।
अशी त्यांची भूमिका आहे. आपण एका क्रांतिकारक कुळाचे जबाबदार वारस आहोत याचे त्यांना भान होते. आपल्या कुवतीचे, आपल्या कर्तव्याचे त्यांना भान होते. संतांच्याच मार्गाने चालायचे आहे. अवतार, ऋषी, संत यांचे कार्य एकच. साधूंचे रक्षण, दुष्टांच्या दुष्कृत्यांचा विनाश, धर्मसंस्थापना, ऋषींनी सांगितलेले साच भावे वर्तावया, आडरानाने भरलेले जग आचरणाने स्वच्छ करायला आपण आलो आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. शब्दज्ञानाने अर्थाचा नाश केला आहे. भक्तीचा डांगोरा पिटून जगात आनंदी आनंद निर्माण करू. धर्माचे रक्षण करू. तथाकथित धर्माधिकारी अध्यात्माचा खरा मार्ग न दाखवता स्वार्थ बुद्धीने शब्दज्ञान सांगून देवाला, धर्माला, धर्मग्रंथांना साधन मानून लोकांना फसवतात. त्यांना स्वतःला अनुभूती नसतेच. ईशस्पर्श नसतो. संत मात्र ईशस्पर्शाने परीसस्पर्शाने सोने व्हावे, गंगेस मिळाल्याने सरितांचे, ओघळांचे स्वरूप पालटावे, तसे संतपदाने संतमय झालेले असतात. आपपरभाव त्यांच्या ठायी नसतो. रंजल्या गांजलेल्यांना संत आपले म्हणतात. अंतर्बाह्य नवनीतासारखे त्यांचे चित्त असते. निरपराधांना ते आधार असतात. सर्वांवर मुलाप्रमाणे ते प्रेम करतात. संत साक्षात भगवंताच्या मूर्तीच असतात.
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवतांची मूर्ती ।।
शिक्षक ज्याप्रमाणे लहानग्यांना शिकवतात, तसे संत क्रिया करून जगाला दाखवतात. आचरणाने शिकवतात. ‘आधी केले मग सांगितले’ असे त्यांचे आचरणातून शिकवणे असते. आई ज्याप्रमाणे बालकाची गती पाहून पाऊल टाकते, तसे संत वागतात. संत लोकांसाठी पाण्यातल्या नावेसारखे असतात. स्वतः तरतात, इतरांना तारतात.
अर्भकाचे सारी । पंते हाती धरली पाटी ।।
तैसे संत जगी । क्रिया करूनी दाविती अंगी ।।
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ।।
सूर्य, दीप, हिरा हे दृश्य वास्तवतेचे दर्शन घडवतात. संत अदृश्याचे परमेश्वराचे, विठ्ठलाचे दर्शन घडवतात.
रवि, दीप, हिरा दाविती देखणे ।
अदृश्य दर्शनें संतांचे ती ।।१।।
तापली चंदन निववितो कुडी ।
त्रिगुण तो काठी संतसंग ||२
चंदन ताप दूर करते तर संत त्रिविध तापाची बाधा दूर करतात. आईबाप शरीराचे पोषण करतात, संत जन्म मरण यातून सुटका करतात.
संतांच्या अंगभूत गुणांचे गुणवत्तेचे निकषच तुकोबांनी दिलेले आहेत. संत कल्पतरू आहेत. इच्छा पुरवतात. संत कामधेनू आहेत. हितोपदेश करणारे शिक्षक आहेत. माता पिता आहेत. तृषार्तासी उदक, भुकेल्यास मिष्ठान्न आहेत. सज्जन सांगाती सोयरे आहेत. तीर्थांचे आश्रयस्थान, यमदूताचे काळ आहेत.
संत पाऊले साजरी । गंगा आली आम्हावरी ।
स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।।१।।
संत अग्नी, परीस, गंगा, चंदनासारखे आहेत. आपणासारखे तात्काळ करणारे आहेत. सहनशील, व्यापक, विशाल मनोवृत्तीचे आहेत.
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात।
तुका म्हणे संतपण याचि नावे ।
जरी होय जीव सकळांचा ।।
संत अजातशत्रू असतात. त्यांची देवावर माया असते.
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ।।
संत भेदभाव करीत नाहीत. पाप-पुण्य, सुख- दुःख, हानी-लाभ असा भेद त्याच्या ठिकाणी संपलेला असतो. अधिकार, जात, वर्ण, धर्म, सत्य-असत्य, जन-वन यात अभिन्नता मानतात. आपपरभाव त्यांचा संपलेला असतो.
नाही दुजेपण ठावे त्यासी ।
प्रारब्ध-क्रियामाण- संचित असा काही भेद त्यांना नसतो. सत्त्व-रज-तम यांची बाधा नसते. देवभक्तपण हेही भिन्नत्व नसतो. संत उदार असतात.
संत उदार उदार । भरले अनंत भांडार ।
त्यांचे अंगी नम्रता असते. भाषा प्रेमळ असते.
प्रेमे अमृते रसना ओलावली ।
सकळ इंद्रिये जाली ब्रह्मरूप ।।
संत समदृष्टी असतात.
अवघे सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे।
संत अंतर्बाह्य सद्गुणी असतात.
चंदनाचे हात पायही चंदन ।
परिसा नाही हीन कोणी अंग ।
दीपा नाही पाठी पाठीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ।
तुका म्हणे तैसा सज्जनापासून
पाहता अवगुण मिळेचि ना ।।
संत प्रेमळ असतात, परोपकारी असतात.
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ ।
संतांचिये गावी वरो भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ।
प्रेमसुख सारी घेती देती ।।
संत दुसऱ्याला आपल्या (जिवा) सारखे मानतात.
जीव ऐसे देखे आणिका जीवांसी ।
निखळ चि रासि गुणांचीच ।।
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
संत परिपूर्ण असतात.
तुका म्हणे तैसे जाणा संतजन ।
सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ।।
संत प्रेमळ असले तरी लढाऊ वृत्तीचे असतात.
अभंग हे बाण त्यांचे हाती असतात.
हाती बाण हरिनामाचे ।
वीर गर्जती विठ्ठलाचे ।
जुंजार ते विष्णुदास ।।
क्षमा, दया, शांती ।
बाण अभंग हे हाती ।।
संत धैर्यवंत असतात. ‘अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।
संत षडरिपु जिंकलेले असतात.
संसाराचे नवी साधिले निधान ।
मारिले दुर्जन षड्वर्ग ।।
संत मोक्षालाही तुच्छ मानतात. भूतीं भगवंत अनुभवतात.
तये गावी नाही दुःखाची वसती ।
अवघाचि भूतीं नारायण ||
संत विदेही असतात. देही उदास, आशापाश
निवारण केलेले असतात. त्यांचा विषय नारायण हाच झालेला असतो.
तुका म्हणे देही । संत झाले विदेही ।।
संतांचे लक्षण ओळखाया खूण |
दिसती उदासीन देहभावा ।।
विदेही असल्याने, आशापाश निवारलेले असल्याने शुभाशुभ, हर्षामर्ष अंगी नसतो. द्रव्य दारा चित्ती नसतात. जगच जनार्दन असल्याने जगाच्या सुखासाठी जगत असतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती उपकारे ।।
भूतांची दया हे भांडवल संतां ।
आपुली ममता नाही देही ।।
तुका म्हणे सुख पराविया सुखे ।
अमृत हे मुखे स्रवतसे ।।
त्यामुळे ‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ’ असतो. अशा संतांचे उपकार काय सांगावे? संत निरंतर जागवतात. गाईने वासराला सांभाळावे तसे ते आपल्याला सांभाळतात.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
तृषार्ताला उदक, भुकेल्याला मिष्ठान्न लाभावे, बालकाला आई भेटावी, तसा जीवलग संतांचा संग लाभतो. अवघी पुण्ये सानुकूल व्हावी, तेव्हा संतसंग लाभतो. कृतकृत्य व्हावे, असे सोयरे, हरिजन प्राणसखे संत. संत म्हणजे जीवाचे जीवन. संतसंग तोच स्वर्गवास.
संतांचा संग तोचि स्वर्गवास ।।
संत घरा आले तोच खरा दिवाळी दसरा ।
दसरा दिवाळी तोचि आम्हा सण
सखे संतजन भेटतील !
धन्य दिवस आजि जाला सोनियाचा ।।
संतदर्शन घडणे म्हणजे साक्षात् भगवंताचे दर्शन घडणे.
संतदर्शन हा लाभ । पद्मनाभ जोडला ।
संतांच्या चरणस्पर्शाने वासनेचे बीज जळून जात.
सुख वाढते. विश्रांती प्राप्त होते. संतकृपेने काया डवरते.
अलिगणे संतांचिया । दिव्य झाली माझी काया ।
मस्तक ह पायावरी । त्यांच्या ठेविता ।।
संत पाउले साजिरी । गंगा आली आम्हांवरी ।
स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।
तुका म्हणे धन्य झालो । संतसागरी मिळालो ।।
संतांच्या संगतीने आपणही संतांसारखे होऊन
जातो.
अग्निमाजी गेले । अग्नि होऊन ठेले ।।
चंदनाच्या वासे । तरू चंदन झाले स्पर्शे ।।
अग्नीत गेले ते अग्नीरूप झाले. चंदनाच्या वासाने इतर झाडेही सुगंधित होतात. संतांचे आलिंगन मोक्ष, सायुज्जना घडवणारे असते.
अलिंगने घडे । मोक्ष सायुज्जना जोडे ।।
ऐसा संतांचा महिमा |
संतांचा महिमा सांगताना संतत्वाचे अनेक निकष तुकोबा सांगून जातात. संत सज्जन, सोयरे, शिक्षक, मायबाप, प्रेमळ, परोपकारी, सहनशील, विशाल मनोवृत्तीचे, क्षमाशील, आपपरभावरहित, अंतर्बाह्य सदगुणी, प्राणसखे, जीवाचे जीवन, मोक्षालाही तुच्छ मानणारे, मधुर भाषी पण प्रसंगी पाखंड खंडण करताना लढाऊ, झुंजार वृत्तीचे
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
असे विदेही, षड्रिपु जिंकलेले असे असतात.
मुलाम्याचे नाणे – संतांची सोंगे
संतांविषयी समाजात अतिशय आदर वाटत असतो. लोकांच्या मनात देवासारखी भावना संतांविषयी असते.
संधिसाधू, ढोंगी, दांभिक लोकांच्या हे लक्षात येते की देवाच्या, धर्माच्या आश्रयाने पुष्कळ प्रकारचे भौतिक लाभ होऊ शकतात, तेव्हा असे लोक संतांची बाह्य लक्षणे दाखवून समाजात मिरवू लागतात. भौहे भाबडे लोक त्यांना भुलतात. त्यांनाही संत समजू लागतात.
प्रत्येक काळात असे लोक आढळून येतात. तुकोबा त्यांच्याविषयी स्पष्टपणाने बोलून लोकांना सावध करतात. तुकोबा भावात्मक जितके बोलतात, तितकेच अभावात्मक स्पष्टपणे सांगतात. संत कसे असतात तसेच संत कसे नसतात तेही सांगतात.
‘नव्हतो सावचित्त । तेणे अंतरले हित ।। असे होऊ नये म्हणून संतांनाही, संत म्हणून मिरवणाऱ्यानाही कस लावून तपासून पाहावे, असे स्पष्टपणे सांगतात.
शुद्ध कसूनि पाहावे । वरील रंगा न भुलावे ।।
तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले ।
जरी हिंडविते देशोदेशी ।।
हिरीयासारिखा दिसे शिरगोळा ।
पारखी तो डोळा न पाहती ।।
देऊनिया भिंग कानाविले मोती ।
पारखिया हाती न पाहाती ।।
सोन्याचा मुलामा दिलेले नाणे सोन्याच्या मोलाने चालत नाही. शिरगोळ्याला हिऱ्याचे मोल मिळत नाही. रत्नपारखी पारख करतो, तसे संतांना पारखावे.
संतांची सोंगे संतांसारखीच वाटतात. पण दोन्ही दिती सारखी। वर्म जाणे तो पारखी ।। मनाने तटस्थ असणारा आणि आळशी, ध्यानस्थ बसलेला आणि झोप घेणारा, सर्वस्वाचा त्याग केलेला आणि पोटासाठी जोग घेणारा, देवासाठी आर्त असणारा आणि पोटासाठी भक्ती करण्याचे सोंग करणारा असे दोन्ही सारखेच दिसतात. म्हणून वर्म जाणावे.
संतांची सोंगे स्वतःविषयी बढाया मारतात.
डबक्यातल्या बेडकाने सागराचा धिक्कार करावा, कावळ्याने मी राजहंस आहे, असे म्हणावे, गाढवाने मी गजाहून थोर आहे, असं म्हणावे तसे ढोंगी संत मिरवतात.
फुगते काउळे म्हणे मी राजहंस आगळे
मुलाम्माचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ।।
कोल्ह्याच्या गर्जना कुठपर्यंत? सिंह पाहिला नाही तोपर्यंतच. गारा तोपर्यंतच शोभतात, जोपर्यंत हिरा प्रकाशला नाही. ढोंगी संत स्वतःच्या संतपणाच्या गोष्टी कुठपर्यंत करतात? जोपर्यंत तुकारामांसारखा संत भेटला नाही.
तोवरी तोवरी संतांचिया गोष्टी ।
जव नादी भेटी तुक्यासवे ।।
संतांच्या सोंगांची ही संतपणाची लक्षणे दाखवणे म्हणजे वांझेने गरवार लक्षण दाखवणे आहे.
वांझेने दाविले गऱ्हावार लक्षण ।
चिरगुटे घालून वायथाला ।।
गन्हवारे हा विधी । पोट वाढविले चिंधी ।
लावू जाणे विन्हे । तुका साच आणिक कल्हे ।।
अशा ढोंगी संतांच्या नादी लागलो तर परमार्थ साधना दूर, देव भेटणे दूरच. सर्व प्रकारचे शोषण मात्र हमखास होते. चोराच्या संगतीने चोरीची इच्छा व्हावी, व्यभिचाऱ्याच्या संगतीने व्यभिचाराची इच्छा व्हावी, तसे हो. सर्व वाया जाते. समाजात अपकीर्ती होते. अशा ढोंगी संतांकडून, संतांच्या सोंगांकडून उद्धार होऊ शकत नाही.
दगडाची नाव आधीच ते जड
काय ते दगड तारू जाणे ।।
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी
सोंग संपादणी करती परि ।।
गाढवाने कितीही शृंगार केला तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही.
गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ।।
संतपणाची कितीही बाह्य लक्षणे दाखविली तरी अशा संधिसाधूंचा मूळ धर्म सुटत नाही.
अशी संतांची सोंगे कशी ओळखावीत? याविषयीही निःसंदिग्धपणे तुकोबा मार्गदर्शन करतात.
तरी ते संपादिले सांग कारणावाचुनी व्यंग ।।
भोंदावया मीस घेऊनी संतांचे ।
करी कुटुंबाचे दास्य सदा ।।
पोपटासारखे बोलणारे, लोकरंजन करणारे, द्रव्यासाठी शिकवले तसे बोलणारे, पाठांतर करून ज्ञानी म्हणून मिरवणारे, संतचिन्हे मिरवणारे खरे संत नसतातच.
संताचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरवती जगी ।।
कामक्रोधलोभ चित्ती । वरिवरि दाविती विरक्ती ।।
असे अनेकजण संत म्हणून मिरवताना दिसतात. पण संत म्हणून मिरवणाऱ्यांना कस लावावा. परीक्षा घ्यावी. हिरा म्हणून मिरवणाऱ्या गारांना घणाने ठोकून पाहावे
हिऱ्या ऐशा गारा दिसती दुशेन ।
तुका म्हणे पण न भेटे तो ।।
संत आणि संतांची सोंगे सारखीच दिसतात.
दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे तो पारखी ।
म्हणून संत कोण नाही, याविषयी तुकोबा सांगतात.
अध्यात्मपर कविता करतात, संत आडनाव आहे,
कीर्तन करतात, पुराणे सांगतात, वेद पठण करतात, कर्मकांड करतात, तीर्थाटन करतात, वनात राहतात, अंगाला भस्म लावतात, माळा नुती परिधान करतात, असे सर्व संत नाहीत. ही सगळी बाह्य लक्षणे होत. हे सर्व संसारी लोक आहेत. देह निरसला नाही, ते सर्व संसारी होत. संत नव्हेत. बाह्य लक्षणांना महत्त्व नाही. भगवेपणा लक्षण मानले तर कुत्रा भगवाच असतो, जटा वाढवणे संतांचे लक्षण असते तर अस्वलही संत ठरेल. भूमीत गुहा खोदून राहणारा संत असता तर उंदीरही संतच ठरला असता की! कशासाठी अशी खटपट करावी?
लोकांनी भुलावे म्हणून ही सारी सोंगसंपादणी! कीर्तन करणे, भक्तिगीते गाणे, जडीबुटी देऊन चमत्कार करणे, शिष्यशाखा वाढवणे, आपण अयाचक असल्याची प्रसिद्धी करवणे, मठपती होणे, देवार्चन करणे, देवाचे दुकान मांडणे, वेताळ वगैरे प्रसन्न आहे, असे पसरवणे, पुराण सांगणे, अध्यात्मपर घटापटादींवर वाद घालत चर्चा करणे, पढीक पंडित असणे, आगम जाणणे, स्तंभन विद्या जाणणे, पुरस्कार मिळवून मोठेपणा बिंबवणे असे उपद्व्याप करणारे संत नव्हेत. हे कपटी लोक असतात.
केस वाढवणे, अंगात भुते आणणे, नरनारी जमवून शकून सांगणे ही संतांची लक्षणे नव्हेत. तरी ते नव्हती संत जन । तेथे नाही आत्मखुण ।। अध्यात्मिक, धार्मिक लक्षणे दाखवणारे संत नव्हेत. तंबाखू, भांग सेवन करणारे, गांजा ओढणारे संत नव्हेत. ही सारी संतांची सोंगे आहेत.
ऐसे संत झाले कवी । तोंडी तमाखूची नळी ।।
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू।।
दावुनी वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ।।
तुका म्हणे सांगे, किती । जळो तयांची संगती ।।
भोंदू संतांची लक्षणे म्हणजे कर्मकांड करणे, वैराग्याची लक्षणे दाखवत भोग घेत राहणे, अशा भोंदूची संगत धरू नये. असे पिंड पोषण करणारे संत नव्हेत. त्यांच्या लेखी जीव हाच देव. भोजन हीच भक्ती. मुक्ती म्हणजे मरण. असे भोंदू पापपुण्याचा विचार न करता आचरण करतात. स्वतः उंच जागी बसून मोठेपणा मिरवतात. टिळा-टोपी अशी सजावट करतात, ध्यान धारणा करण्याचे नाटक करतात.
बक ध्यान करी । सोंग करूनि मासे मारी ।।
असे ढोंगी संत नसतात. हरिकथा सांगणारे संत नव्हेत. अशी अनेक लक्षणे दाखवणारे दुकान मांडे असतात. संत नसतात.
असे मांडिले दुकान ।
कथेमध्ये हलवी ढोंग । संत नव्हे ते बेसंग ।
पाहुनी स्त्रियांचा मेळा । काढी सुस्वर तो गळा ।
तुका म्हणे नव्हे योग । पोटासाठी केले ढोंग ।।
भविष्य सांगणारेही संत नव्हेत.
जगरूढीसाठी घातले दुकान ।
जातो नारायण अंतरुनि ।।
ऋद्धीसिद्धचे साधक, वाचासिद्ध हे संत नव्हेत.
तीर्थस्नान करणारे, उपास करणारे संत नव्हेत.
अंतरीची बुद्धी खोटी । भरले पोटी वाईट ।।
मंदिरातील पुजारी, शब्दज्ञानी, पंडित, जातीचे ब्राह्मण, याज्ञिक, होम हवन करणारे, पूजा सांगणारे हे सारे संत नव्हेत. देवाच्या, धर्माच्या आधारे जगणारे ते पोटभरू होत. शोषक होत. पिंडपोषक होत. वित्त, धन, सभा, कीर्ती, जमीन अशा अनेक गोष्टी प्राप्त करणारे शोषक होत. पाखंडी होत.
पाखंडांचा, पाखंड्यांचा मेरुमणी म्हणजे स्वतःला परमपूज्य म्हणवणारे स्वयंघोषित देव. देव, धर्म यांमुळे सामान्य माणसालाही मान मिळतो. पाखंडी, संतांची सोंगे देवाच्या आश्रयाने समाजात वावरतात. देवाला मिळणारे, देवाच्या नावाने मिळणारे सर्व काही अशा संधिसाधूंना मिळू लागते. दसऱ्यामुळे आपटा, सवंदर अशा रानचाऱ्यालाही महत्त्व प्राप्त होते. पाण्यामुळे मातीच्या घागरीलाही डोक्यावर घेतले जाते. दाण्यामुळे मापाचीही देव घेव होते. तसं ‘देवामुळे मान । नाहीतरी पुसे कोण? ।।’ देवामुळे आणि संतपदाच्या महात्म्यामुळे मुलाम्याच्या नाण्यांनाही स्थान मिळते. पण हे ढोंगी गुरू, स्वामी, स्वयंघोषित परमपूज्य तर देवाचेच मारेकरी ठरतात. देवाला बाजूला सरकवून स्वतःलाच ते देव, देवाचे अवतार, अवताराचे अवतार इतकेच नाही काही तर अवतार घेणारी सुप्रीम पॉवर आपणच आहोत, असे घोषित करू लागतात. प्रक्षेपित करू लागतात. तुकोबांच्या काळीही असे लोक होतेच. ज्ञानेश्वरांच्याही काळात असे पंथ संस्थापक दिसतात. आपणच परमेश्वराचा शेवटचा अवतार! माझ्यानंतर अवतार नाहीच, असे म्हणणारे. तुकोबा ‘देही’, ‘देव’, ‘जली’ जनार्दन, ‘भूती’ भगवंत, ‘जगी’ जगदीश्वर, ‘विश्वी विश्वंभर’ असे परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूप स्वानुभवाने सांगतात. ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे।’ अशी गर्जना करतात. पण हे ढोंगी परमपूज्य केवळ आणि केवळ स्वतःलाच परमपूज्य, परमेश्वर मानतात. तुकोबा म्हणतात,
एक म्हणती आम्ही देवचि पै झालो ।
ऐसे नका बोलो । पडाल पतनी ।।
एक म्हणती आम्ही देवाचि पै रूपे ।
तुमचे नि बापे न चुके जन्म ||
स्वतःला देव घोषित करणे पाखंडीचा अतिरेक आहे.
अहं म्हणे ब्रह्म । नेणे भक्तीचे ते मर्म ।
तुका म्हणे क्षण । नको तयाचे दर्शन ।।
स्वतःला देव समजणाऱ्यांची भक्ती करणे म्हणे आपल्या आयुष्याचे मातेरे करणे होय.
सानुनिया नरा । कोण आयुष्याचा मातेरा ।।
अशांच्या नादी लागणे म्हणे
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले
तोंड काळ झाले जगामाजी ।।
अशी संतांची सोंगे विदेही नसतात. देहाचे चोचले पुरवणारे इंद्रियभोगी असतात. कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. परमेश्वर षड्गुण संपन्न असतो.
षडगुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंती जाण ।।
यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असे परमेश्वराचे सहा गुण. त्याचप्रमाणे परमेश्वराचे दुसरे सहा गुण म्हणजे सर्वज्ञता, तृप्ती, अनादिज्ञान, स्वातंत्र्य, शक्तिप्रकाशन आणि अनंतशक्तित्व असे गुण ज्या माणसात असतात, त्याच्या मनुष्यपणाचा चिरा पडतो. त्याचे मनुष्यपण संपते. पण हे ढोंगी, दांभिक, इंद्रियभोगी स्वघोषित परमपूज्य तर धन, द्रव्य, दारा, जमिनी, कीर्ती पुरस्कार, मान्यता, मान यांचे आयुष्यभर भुकेले असतात. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या आश्रयाने सर्व सुखोपभोग प्राप्त करतात. मठ, ट्रस्ट यांच्या आड सर्वकाही पचवतात. स्वतः अयाचित असल्याचे पसरवून शिष्यांद्वारा कलेक्शन करतात.
आमचेहि गोसावीयाची अयाचित वृत्ती
देती शिष्याहाती उपदेश ।।
भावपुष्प, भावसमर्पण, अशा गोंडस नावांनी भक्तांकडून नियमितपणे ‘देवाचा वाटा’ म्हणून धन उपटले जाते. त्यासाठी अध्यात्माची परिभाषा साधन म्हणून वापरली जाते. ‘देवाचा वारा देव नाही तो चोर आहे, असे गीतेत सांगितले आहे, असा पण देवाचा वाटा स्वतःच हडप करणारा कोण? महाचोर. असे महाचोर उदंड जाहले आहेत. देवकृषी, देवराई अशा गोंडस नावांनी खाजगी आणि शासकीयही जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यांच्या स्त्रीईषणा, धनईषणा, लोकेषणा, कीर्ती ईषणा, अपत्य ईषणा प्रचंड असतात. अध्यात्माच्या परिभाषेत त्या छान घोळलेल्या असतात. आपल्या स्थैर्याला, प्रतिभेला धक्का लावणाऱ्याच्या मागे ते सर्व प्रकारची झेंगटे लावतात. त्याची बदनामी करतात. पुरता काटा काढतात. आपले पितळ उघडे पाडणाऱ्याला, त्याचे स्वरूप उघडे करणाऱ्याला जगातून नाहीसेही करायला कमी करत नाहीत.
तुकोबा अशा स्वयंघोषित परमपूज्यांपासून, स्वयंघोषित देवांपासून सावध रहायला सांगतात.
देवा धर्माच्या आधारे चालणारे अन्यथा ज्ञान भावनिक शोषण करते. इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. पिंडपोषक पाखंडी, संतांची सोंगे म्हणजे मुलाम्याचे नाणे आर्थिक शोषण करतात. विपरीत ज्ञान पसरवून स्वतःचे महत्त्व वाढवतात, मार्गदर्शन करीत आहोत असे दाखवत आडमार्गाला घेऊन जातात. हे देवाच्या मार्गावरील वाटमारे होत. देवाकडे जाणारे वित्त-जमिनी इत्यादीच नव्हे तर श्रद्धा-भक्ती यांचीही हे वाटमारी करतात. खऱ्या ज्ञानापासून, खऱ्या देवापासून दूर नेतात.
संतांची भावात्मक लक्षणे सांगून तुकोबाअभावात्मक लक्षणेही सांगतात व संतांच्या सोंगांचं पितळ निर्भीडपणे उघडे पाडतात. रोखठोकपणे, स्पष्टपणे सांगतात,
तुका म्हणे सत्य सांगो । येवोत रागे येतील ते ।
सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ।।
अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचे समकालीन सालोमालो, मंबाजी, रामेश्वरभट्ट समाजाचे असे अनेक प्रकारचे शोषण करताना त्यांनी पाहिले असतील. आज तुकोबा असते तर अध्यात्माची दुकाने मांडून बसलेले बाबा, दादा, नाना, ताई आणि बापू अशा अनेक खिसेकापूंवर तुटून पडले असते. तुकोबांचे संतत्त्वाविषयीचे निकष सार्वकालीक असल्याचे प्रत्ययास येते संतांची सोंगे ओळखण्यासाठीही तुकोबांनी दृष्टी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या दृष्टीने पाहू या आणि सावध होऊ या.
— डॉ. प्रकाश सपकाळे,
जळगाव
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply