एक काळ असा होता की भिकारी मंडळी “पाच पैसा – दस पैसा दे दो बाबा” अशी आर्जवं करायची. महागाई वाढली तशी त्यांची अपेक्षाही सहाजिकच वाढली. ५ – १० पैशावरुन ते “चार आणे – आठ आण्या”वर आले. कालांतराने त्यातही वाढ होऊन “रुपया – दो रुपया” ची मागणी होऊ लागली.
भिक मागण्याच्या आयडियाही अनेक आहेत आणि प्रकारही अनेक. कोणी साधे भिकारी… कोणी गाणी म्हणून पैसे मागणारे तर कोणी सिग्नलवर उभे राहून… सगळ्यात कळस म्हणजे हातात लहानग्या पोराला घेऊन भीक मागणारेही जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा भीक मागणे ही त्यांची आर्थिक गरज आहे की धंदा असा प्रश्न बर्याचदा पडल्याशिवाय रहात नाही.
भिक मागणे हा आता एक मोठा व्यवसाय झालेला आहे. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था समांतररित्या या उद्योगातून उभी राहात आहे. भिकार्यांकडून सुटे पैसे घेउन त्यांना नोटा देणे हे तर आता काही हॉटेल व्यावसायिकांसाठी नेहमीचंच झालंय. त्यापुढे जाउन १०० रुपयांच्या नोटेच्या बदल्यात ९५ रुपयांची नाणी.. अशासारखे बार्टरही आता होऊ लागलंय.
मात्र या भिकाऱ्यांनी एखाद्या बँकेत खाते उघडून व्यवहार केल्याचं तुम्ही कधी बघितलंय? हसावंवं वाटतंय ना? भिकारी आणि बॅंकेत? कदाचित कल्पनाच केली नसेल कधी.
चित्र डोळ्यासमोर आणा बघू… ICICI, HDFC किंवा दुसर्या कोणत्यातरी बॅंकेच्या ATM समोर भिकारी ऊभा आहे. तुम्ही त्याच्या मागे ऊभे आहात. तो आत जातो. पैसे काढून आणतो… तुम्हाला हॅलो करुन बाजूने निघून जातोय….
विनोदाचा भाग सोडून द्या, पण आता अशी दृष्य बघण्याची वेळ फार लांब नाही. एकतर जन-धन योजनेच्या अंतर्गत जी खाती ऊघडली जाताहेत त्यामुळे हे शक्य होणार आहेच… पण एक सॉलिड बातमी आता बिहारमधून आलेय.
बिहारमधील गया शहरातील काही भिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका बँकेची स्थापना केली असून, ही बँक भिकाऱ्यांकडून केवळ भिकाऱ्यांसाठी चालवली जात आहे.
धक्का बसला वाचून ?
या भिकार्यांच्या बँकेचे नामकरण ‘मंगला बँक’ असे करण्यात आले आहे. गया येथील मंगळागौरी मंदिराच्या बाहेर हिंदू भाविकांकडून मिळणाऱ्या पैशांवर या भिकाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासून गुजराण सुरू होती. आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांच्यातल्या सुपिक डोक्यांनी विचार केला. त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि बँकेची स्थापना केली.
सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेच्या सभासदांची संख्या चाळीसच्या आसपास आहे. व्यवस्थापक, कॅशियर, सचिव, एजंट आणि सभासद यांच्या माध्यमातून बँकेचा कारभार चालतो. विशेष म्हणजे पदांवरील व्यक्तीही व्यवसायाने भिकारीच आहेत. राजकुमार मांझी हे सध्या बँकेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बँकेची कार्यपद्धती आणि दैनंदिन कारभार समजेल, इतपत शिक्षण आपण घेतल्याचेही मांझी यांनी सांगितले.
दर मंगळवारी प्रत्येक भिकारी वीस रुपये बँकेत जमा करतो. त्यामुळे दर आठवड्याला बँकेत आठशे रुपये जमा होतात. वनारिक पासवान हा भिकारी बँकेचा एजंट म्हणून काम करतो. सभासद भिकार्यांकडून पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.
‘आम्ही भिकारी असल्याने आम्हाला समाजात काडीचीही किंमत नाही. आमच्या गरजा भागविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बँकेची स्थापना केली आहे,’ असे या बॅंकेच्या सचिव मालतीदेवी यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर भिकाऱ्यांनी बँकेचे सभासदत्व घ्यावे, यासाठी त्या सध्या प्रयत्न करीत आहेत. ज्यांच्याकडे किमान आधार कार्डही नाही अथवा ज्यांचा दारिद्रयरेषेखालीही समावेश होऊ शकत नाही, त्यांनाही बँकेचे सभासद करून घेण्यात येते.
सभासदांना आवश्यकतेनुसार बँकेतर्फे आर्थिक मदत देण्यात येते. बँकेत पैसे भरणे किंवा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार होत नाहीत. कर्ज काढण्यासाठी जामिनही पाहिला जात नाही. या बँकेत पहिल्या महिन्यात व्याज आकारले जात नाही. पण घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सभासदावर दबाव रहावा यासाठी दुसर्या महिन्यापासून दोन टक्के व्याज आकारण्यात येते.
आगामी काळात या बँकेच्या देशभरातील अन्य भागातही शाखा उघडण्याची योजना आखण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांतही ही बॅंक लवकरच आपले कामकाज सुरु करेल आणि इथल्या भिकार्यांनाही आर्थिक व्यवस्थापनाचे धडे मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.
ninadji yancha sapark no v email ID milel ka