“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक….. “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल…
“मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.
सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आजकाल मुंबई-महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्या बहुतांशी मराठी माणसांचाही मराठीत लिहिण्याचा (आणि बोलण्याचाही) सराव हद्दपार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.संजीव चौबळ यांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे इतका मोठा काळ अमेरिकेत घालवूनही त्यांची आपल्या मातृभाषेची नाळ तुटलेली नाही. पुस्तकाचं हस्तलिखित पाहिल्यावर प्रथमदर्शनीच त्याची साक्ष पटली. अत्यंत स्पष्ट आणि सुवाच्य अक्षर, खाडाखोड तर अजिबात नाही. भाषाही सुंदर आणि हवी तिथे अलंकारिकही.
या पुस्तकावर संपादकीय प्रक्रिया करताना काही बाबी ठरवून ठेवल्या होत्या. लेखक दशकभरापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात वास्तव्य करत नसतानाही त्याने केलेला प्रयत्न स्तुत्य आहेच. त्यामुळेच शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या चौकटीत संपूर्ण पुस्तक बसवताना या बाबींचा अतिरेकी आग्रह मुद्दामहून टाळला आहे. काही ठिकाणी बोली भाषा मुद्दामहून तशीच ठेवली आहे.
दोन-चार महिने परदेशातील मुलाबाळांकडे वास्तव्याला जाऊन आल्यावर मराठीत बोलताना फाडफाड इंग्रजी शब्दांची पेरणी करणार्या “फॉरेन रिटर्नड” पालकांकडे बघितलं तर अमेरिकेतील घरातही मराठीतच बोलणार्या चौबळांच्या कुटुंबाचंही कौतुक करावसं वाटतं. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता आणि म्हणूनच “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाची निर्मिती एक वेगळा आनंद देऊन गेली.
आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.
प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्या आणि लिहू इच्छिणार्याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!
निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
Leave a Reply