मराठी टंकलेखन यंत्रावर, अ हे अक्षर असतं, तसेच अिकार ( ि ), आीकार ( ी ), अुकार ( ु ), अूकार ( ू ), अेकार( े ) आणि अैकार ( ै ) ही असतात. संगणकावर मराठी अक्षरप्रकार (फॉन्टस् ) बसवून घेतले की ही अक्षरचिन्हे आपोआपच बसविली जातात. थोडक्यात म्हणजे ही अ ची बाराखडी मराठी टंकलेखन यंत्रावर किंवा संगणकावर आपोआपच आलेली असते. सामान्य माणसाला ती दिसत नाही पण, स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या प्रतिभावंताला, मराठी टंकलेखन यंत्रे येण्याच्याही आधी ती दिसली, जाणवली आणि त्यांनी ती स्वतः वापरली देखील. क ला इकार लावला तर कि होते, मग अ ला इकार ( ि ) लावला तर अ का होअू नये? म ला एकार ( े ) लावला तर मे होतो तर अ ला एकार लावला तर अे का होअू नये? ही तर्कशुध्द विधाने स्वीकारलीत तर अ ची बाराखडीही स्वीकाराविशी वाटते. आ, ओ औ हे स्वर आपण स्वीकारले आहेतच. अॅ आणि ऑ हे स्वर देखील, अंग्रजी अुच्चारांच्या सोयीसाठी आपण स्वीकारले आहेत. अॅक्शन, ऑगस्ट अशासारखे शब्द आता मराठीत वापरले जाताहेत. आणि ते आपण स्वीकारलेही आहेत. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, मराठी स्वरमालेत अॅ आणि ऑ या स्वरांची भर घालण्याची आवश्यकता भासली. कारण ब्रिटिश राजवटीत ऑगस्ट, ऑक्टोबर, कँप, कॅप, बँक, कॅप्टन, ऑनरेबल वगैरे शब्दांच्या अुच्चाराची सोय करणे अपरिहार्य होते. चंद्रचिन्ह वापरून हा अुच्चार लिहीण्याची कल्पना ज्या कोण्या व्यक्तीने रूढ केली तिच्या प्रतिभेचे खरोखर कौतुकच केले पाहिजे. नाही तर हे शब्द, आगस्ट, आक्टोबर, क्यांप, क्याप,&n bsp; ब्यांक, क्याप्टन, आनरेबल असे लिहावे लागले असते आणि पूर्वी ते लिहीलेही गेले आहेत. हिन्दीत कैम्प, कैप, बैंक, आगस्ट, अक्टूबर असे शब्द लिहीतात. पॉ चा
अुच्चार प्वा असा करतात म्हणजे पॉअंट हा शब्द प्वाअंट असा लिहीतात. गुजराथी बांधव हॉल या शब्दाचा अुच्चार होल असा करतात तर स्नॅक या शब्दाचा अुच्चार स्नेक असा करतात.क् ख् ग्
गैरे पाय मोडलेली व्यंजने आपण स्वीकारली आहेत आणि त्यांना स्वरांची जोड देअून, त्या त्या व्यंजनांची बाराखडी तयार केली आहे. तर मग लंगडा अ् स्वीकारून अ ची बाराखडी का स्वीकारू नये?व्यंजनाला स्वर जोडला की हवे ते अक्षर मिळते. क् अधिक अ म्हणजे क, क् अधिक अु म्हणजे कु होतो. अ ची बाराखडी तयार करतांना अेका स्वराला दुसरा स्वर जोडावा लागतो अितकेच. अुदा. अ् अधिक अैकार म्हणजे अै, अ् अधिक अुकार म्हणजे अु वगैरे…म्हणजे, अ ची बाराखडी स्वीकारून महान मराठी भाषेचं काहीही बिघडत नाही.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही ‘अ‘ ची बाराखडी फार पूर्वीच सुचविली आहे. त्याकाळी संगणक नव्हते. पण त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असे वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विपुल आणि चतुरस्त्र मराठी लिखाणात अ ची बाराखडीच वापरली आणि त्यावेळच्या मराठी मासिकांनी ती स्वीकारलीही.इ स. १९३० ते १९३७ या काळात श्री. सावरकरांचे ‘विज्ञाननिष्ठ निबंध‘ किर्लोस्कर मासिकात प्रसिध्द झालेत, त्यातही किर्लोस्कर मास काने अ ची बाराखडीच वापरली आहे. सह्याद्री मासिकात, फेब्रुवारी १९४८ च्या अंकात प्रसिध्द झालेल्या ‘विज्ञान आणि गुन्हेगार‘ या अहमदाबादच्या श्री. बाळ वासुदेव समुद्र यांनी लिहीलेल्या लेखातही अ च्या बारखडीचा वापर केला आहे. त्या काळच्या अितर अनेक लेखातही, विशेषतः पुण्याच्या मासिकांतून, ही बाराखडी वापरली आहे. नंतर केव्हातरी ही बाराखडी मागे का पडली हे समजायला मार्ग नाही.मी, माझ्या सर्व मराठी लिखाणात अ च्या बाराखडीचाच वापर करतो. २००१ साली प्रसिध्द झालेल्या ‘बाळ गोजिरे नाव साजिरे‘, २००४ साली प्रसिध्द झालेल्या ‘अिंडिया, भारत आणि हिंदुस्थान‘ व ‘वाचणारा लिहीतो‘ या माझ्या पुस्तकांतही अ च्या बारखडीचाच मी वापर केला आहे.गजानन वामनाचार्य, १८०/४९३१, पंत
गर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०००७५.०२२-२५०१२८९७, ९८१९३४१८४१,सोमवार २१ मार्च २०११.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply