विज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे.
हवा आणि पाण्यातले वाढते प्रदूषण आणि जगण्यातील अनियमितता, पोषण तत्त्वांचा अभाव असलेल्या ब्रेड-बिस्किटे इ. पदार्थांची ओढ, परिणामतः आधुनिक मानवाची ‘प्रतिकारक्षमता’ अत्यंत कमी होऊन मधुमेह, सोरायसिससारखे त्वचाविकार, रक्तदाब, कॅन्सर इत्यादी रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यावर उपचार नाही झाले तर पुढे या गंभीर समस्या होऊ शकतात. अशा वेळी ‘घर्षण’ उपचाराने रक्ताभिसरणाची प्रक्रिया संपूर्णपणे आरोग्यप्रत (नॉर्मल) अवस्थेमध्ये येऊन स्वाभाविकपणे शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्ववत बलवान होऊ शकेल. अर्थात याकरिता सोबत आहारविहारांचे नियम पाळणेही अत्यावश्यक आहे. आयुर्वेदाच्या विविध चिकित्सा पद्धती म्हणजे जणू छोटे-छोटे ‘अमृतकुंभच’ आहेत. आजपर्यंत झाकून ठेवलेल्या त्या अनेक ‘अमृतकुंभापैकी’ एक आहे ‘घर्षणशास्त्र!’ घर्षणशास्त्र ही आयुर्वेदातील चिकित्सा पद्धती आहे. घर्षण म्हणजे मर्दन.
आजोबा यांचे दुखणारे पाय नातवाकडून चेपून घेतात ते ‘घर्षण’ दिवाळीच्या दिवशी आपण पहाटे उठून सुगंधी तेल अंगाला चोळून व उटणे लावून स्नान करतो तेही घर्षण. प्रसाधन करताना आपण चेहऱ्याला स्नो लावतो तेही घर्षणच! अंगाला कंड सुटली, की आपण तो भाग खाजवितो, तेसुद्धा घर्षण आणि थंडीच्या दिवसात अंगाला ऊब मिळावी म्हणून आपण हाताला हात चोळतो तेव्हाही घर्षणाचाच वापर करतो. तसेच आपल्या पाठीवर, डोक्यावर कोणी तळहात ठेवला तर त्याच्या स्पर्शाने त्या अल्पशा दाबाने स्पर्शजन्य स्पंदन सुखसंवेदनाचे विजेसारखे सर्व शरीरभर पसरल्याचा अनुभव प्रत्येकाला येतो हेही घर्षणच. फक्त हात दर्शनाने ठेवणाऱ्याच्या त्यांच्याबद्दलचे व आदराच्या प्रेम भावनांच्या उत्कटतेप्रमाणे त्या सुखसंवेदनांच्या स्पंदनांना कमी-अधिक भरती येते. यालाच शास्त्रात ‘संवाहन’ असे म्हणतात. हा घर्षणाचाच एक प्रकार मानला आहे. त्यामुळे प्रीती हा मानसिक भाव बलवान होतो व वात हा दोष, तसेच शरीराला झालेले श्रमही नाहीसे होतात व झोपही चांगली येते.
शुभदा पटवर्धन
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply