वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये?
स्वानंदी सुरेल व ‘भाव’ जपून नवी ज्येष्ठालये उभारणे, आता जाणिवेने साक्षेपी व परिपक्व झालेल्या ज्येष्ठत्वाचा नव्या तारुण्यात ’मला काय मिळेल?’ यापेक्षा ’मी समाजाला व नव्या पिढीला काय देऊ शकतो?’ हा विचारच सकारात्मक वानप्रस्थ आहे. नव तारुण्याची तीच प्रगल्भ वासंतिक डहाळी आहे.
जनात राहूनही विजनाची अनुभूती देणारी पहाट
वयाचं ज्येष्ठपण ही काही फार अभिमानानं मिरवावी अशी गोष्ट नाही. तो नैसर्गिक योग आहे. परंतु या योगाला साधनेची जोड लाभली तर ते ज्येष्ठपण तपोज्येष्ठ होते. अशा तपोज्येष्ठतेला आपोआपच वंदन केले जाते आणि त्यात सन्मान होतो वंदन करणार्याचा. कारण नमस्काराला अशी व्यक्तिमत्त्व भेटणं हेही पूर्वसुकृत असते.
आचार्य विनोबांनी अशा तपोज्येष्ठतेलाच ज्येष्ठता संबोधले आहे. या वयोसंधीतही विद्याध्यय साधना सुरू ठेवली तर त्या ज्येष्ठतेत एक प्रवाहीपण असते. निर्झराची चमक असते. प्रत्येकाने आमरण विद्यार्थी असले पाहिजे असं जेव्हा आचार्य विनोबा म्हणतात, तेव्हा ते बालवयातील विद्यार्थीपणाबद्दल बोलत असतील असे मला वाटत नाही. रूढ अर्थाने जेव्हा विद्यार्थीदशा संपते असे समाज मानतो, तेथेच खरे तर ती सुरू होते, असे ज्येष्ठपण सुचवते. शाळेने आणि महाविद्यालयाने डोक्याच्या पिशवीत खरे तर मेंदूच्या पिशवीत जी शिळी व निरस माहिती कोंबलेली असते आणि आदल्या दिवशीच्या पाठांतराने जी दुसर्या दिवशी ’आठवून आठवून’ वा ‘कॉपी’ करून आजमावली जाते, त्या खरे तर न घेतलेल्या परीक्षेला परीक्षा मानून जेथे पात्रता ठरवली जाते, अशा अभ्यासक्रमाच्या बाहेर गेल्यावर, प्रपंचाचे, माणसा माणसातील संवाद-विसंवाद व्यवहाराचे, आपले कोण? खरंच कोण आपले? नि आपण कुणाचे? या विनाभिंतीच्या अनुभवाच्या विद्यापीठातून तावून सुलाखून निघाल्यावर उरते ते ‘ज्येष्ठपण’!
वयाच्या ज्येष्ठपणाला जाणिवेचे ज्येष्ठपण कायम झाले की सुंदरतेचीच फळे येतात. कंटकही मखमाली होते, संध्याकाळही ‘संधी-काळ’ होऊ शकतो. ‘आता सारे संपले’ नि ’आताच तर कुठे सुरू झाले’ हा प्रबळ आज्ञावाद निसर्ग देत असलेल्या शरीराच्या कुरबुरीलाही सुसह्य करतो.
आज नक्कीच कालबाह्य वाटणारी आपली आश्रम व्यवस्था ही खरे तर आधुनिक काळाचे संदर्भ जोडून पुनरुज्जीवित करायला हवी. आपल्याकडे पूर्वजांच्या वैचारिक नवनीतालाही, ते पूर्वजांचे म्हणजे पूर्वीचे आता जुने झाले, असं मानण्याचा प्रघात आहे. खरे तर ते आश्रम ही केवळ समाजाची बाह्य व्यवस्था नव्हती, तर ती आंतरिक व मानसिक व्यवस्था आहे. हजार वर्षांपूर्वी वानप्रस्थ वनात घालवणे शक्य असेल, पण आज ते शक्य नाही. पण वनात राहणे ही काही आता आपण निरुपयोगी झालो, म्हणून तरुण पिढीने ज्येष्ठांना बाजूला सारले अशी व्यवस्था नव्हती. आयुष्याची उमेदीची वर्षे जीवन संघर्षात व्यतीत केल्यानंतर आता उर्वरित जीवन आत्मानंदात व्यतीत करावे, मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करावे. पण त्यात गुंतू नये. हा एक साक्षीभाव! एक सच्चिदानंदी उत्कट भाव या ज्येष्ठतेत घ्यावा हीच व्यवस्था होती. पर्णकुटी म्हणजे काही वृद्धजनांचे उपेक्षित वृद्धाश्रम नव्हते, तर ती मन:शांतीची अध्यात्मालये होती.
आज तोच आत्मसुंदर भाव ठेवून नवी ज्येष्ठालये, एकमेकांच्या सहवासात हास्य विनोदात रममाण होण्यासाठी निर्माण होऊ शकतात. आजचे संदर्भ पूर्ण बदलले आहेत. ‘मुले परदेशी, पालक मायदेशी’हे सत्य स्वीकारावेच लागेल. दरघरटी ‘एकच मूल’ वा ‘मूलच नको’ हा दृष्टिकोन रुजला आहे. अशा वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये? अंतरातील चंद्र हरवला तर बाहेरचा चंद्र हाती लागून उपयोग काय? आतले चांदणेच ज्येष्ठत्वाची वाट रमणीय करू शकते.
ज्येष्ठत्वाला मी नवतारुण्याची पहाट समजतो. हे केवळ औपचारिक नाही. वयाच्या तारुण्यात अपरिपक्व उत्साह असतो. एक प्रकारचे भांबावलेपण असते. परंतु वयाच्या ज्येष्ठत्वात समजुतीचे स्थिरावलेपण असते. जे राहून गेले नि ते स्वार्थ, लोभ अल्पजीवी यशाच्या भासाहून निराळे असते, याची जाण येते. निवड येते. झेपेल तसे, पण अभिरुचिपूर्ण कार्य करावे हा सारासार विवेक येणं हे अपेक्षित असते. वाचनातील सैरभैरपण आटतो नि साक्षेप येतो. निदान माझातरी ‘साठी’ ओलांडतानाचा हा प्रकाशात्मक अनुभव आहे. आता निसर्गाने अशा चाहुलक्षणी आणून ठेवले आहे की आता विधात्याने दिलेल्या उर्वरित ऊर्जेतून नव्या पिढीसाठीच विधायक काम व्हावे असे वाटते. मला माझ्या आजोबांच्या नि आई-बाबांच्या पिढीने जे दिले, त्या पूर्वसुकृतावर मी आज उभा आहे. मग आता हे गुरू व मातृ-पितृ ऋण फेडण्याची संधी मला नियतीने दिली आहे. याच जाणिवेने माझ्या ज्येष्ठत्वाची पहाट झांजरली आहे. रंगरंगोटी करून तरुण ’दिसण्या’पेक्षा नव्यापिढीची अंतरंग रंगोटी करून त्यांना मानसिकरित्या भक्कम करणं हीच मला तरी नव्या तारुण्यपहाटेची महापूजा वाटते.
लेखन, वाचन व चिंतनाचे माझे विचार व आयाम आता बदलेले. ’स्व’पलीकडे जाऊन ’समश्री’चा विचार करण्याची प्रबळ ओढ निर्माण झाली. रंजनाची माध्यमे बदलली, मित्रांशी होणार्या चर्चेतले आशय व विषय बदलले. हाती काय येईल? यापेक्षा या हातून काय देता येईल याचा शोध सुरू झाला.
हे वैयक्तिक होतेय असं वाटेल, पण ते या ज्येष्ठत्वाच्या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास प्रत्येकाला लागू होईल. मात्र वाटतं, हा विचारच जनात राहून ही विजनातील नव्या वानप्रस्थाकडे जाण्याचा विचार आहे आणि तो विचार संत-वसंतांकडे घेऊन जाणारा आहे. वसंताची नवी सुकुमार डहाळी ज्येष्ठत्वात रुजवण्याचा विचार आहे.
–प्रा. प्रवीण दवणे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply