नवीन लेखन...

मनाशी संवाद

a dialogue with your mind

माणसाचं मन, मन म्हणजे नेमकं काय असावं? कुठे असावं ते? मेंदूत की हृदयात? की कोठेच नाही? माझ्या मनाला हे रुचलं नाही किवा खूप आवडलं असं म्हणतो आपण; पण न रुचणं किवा आवडणं म्हणजे काय? कारण काहीवेळा एखादा पदार्थ, घटना, व्यक्ती एखाद्याला आवडते किवा आवडतही नाही. दुसर्‍याला बिलकूल न आवडलेली गोष्ट पहिल्याला खूपच आवडते, हे कसं? हे काही त्या घटनेवर किवा व्यक्तीवर अवलंबून असतं? नाही, तर ते आवडलं की नाही ठरविणार्‍या व्यक्तीवर अन् तिच्या मनावर! म्हणजे असंही म्हणता येईल, की प्रत्येकाचं मन हे वेगळं असतं. मनाच्या अवस्था आणि त्याचं पृथक्करण करण्याचे प्रयत्न विज्ञानानं केलेत पण ते सारे मेंदूच्या पातळीवरचे आणि त्याचे निष्कर्षही वेगवेगळे. आवड आणि नावड व्यक्त होताना काय होतं याचा शोध त्यात प्रामुख्यानं घेतला गेल्याचं दिसतं; पण मन म्हणजे तुमच्या क्रिया, प्रतिक्रिया, माहिती, त्यांचं पृथक्करण, त्यांची चिकित्सा या सार्‍यांचा साठा. आता हेच पाहा ना की, तुम्हाला सापाची भीती वाटते. कारण सापाची भीती वाटण्यापेक्षाही त्याच्या परिणामाची भीती अधिक असते. तुम्ही झोपेत आहात अन् तुमच्या अंथरुणात साप शिरला आहे, असं कोणी तुम्हाला ओरडून सांगितलं, तर काय अवस्था होईल. भीतीनं गाळण उडेल. अंथरुणातून सहिसलामत बाहेर पडण्यासाठी धडपडाल.

सापाऐवजी तो साप कुठे गेला याचा पत्ता लागला नाही तर तो सापडल्याची खात्री होईतो झोप येणार नाही. काही वेळातच तो साप नाही तर एक नळी आहे हे कळलं, तर त्याच प्रसंगानं हसाल. ती भीती नसेल. किल्लारी इथं झालेल्या भूकंपाच्या वेळी मी माझ्या काही सहकार्‍यांसह तिथं गेलो होतो. अगदी दुसर्‍याच दिवशी. बातमीचं काम आटोपून आम्ही निलंग्याला पोहोचलो. तिथं एका लॉजमध्ये जागा घेतली. एका हॉलमध्ये खाटा टाकलेल्या होत्या. आम्ही झोपलो. पहाटे जाग आली, तर हॉटेलसमोरच्या मैदानात गाद्या टाकून लोक झोपलेले होते. त्यांनी हॉटेलचं भाडं दिलं होतं; पण ते मैदानात झोपले. का? तर भूकंपाची भीती. मनाचे खेळ. खरं म्हटलं तर निव्वळ भास. त्यांच्या अन् आमच्यात एक भेद होता. त्यांनी आदल्या दिवशी ती इमारत गदगदा हलताना अनुभवली होती. डोक्यावर छप्पर असावं म्हणून माणूस आयुष्य वेचतो अन् इथं माणसं छप्परालाच घाबरत होती.

त्यालाच मन म्हणायचं का? हेच कशाला. आपल्याला काही गोष्टी आठवतात अन् काही आठवतही नाहीत. काही आठवणीनं कपाळाच्या आठ्या ताणल्या जातात, डोकं गरम होतं, संताप वाढत जातो. काही आठवणीनं मन व्याकूळ होतं, डोळ्यात आसवं जमा होतात, उमाळे येऊ लागतात, स्वर गदगदतो; तर काही वेळा त्या जीवघेण्या संकटाच्या आठवणीनंही माणूस तजेला होतो. त्या संकटाला नाही भ्यालो, तर आता काय? असा विश्वास त्याच्यात दिसतो. खरंतर त्यावेळीही तो घाबरलेला असतो; पण काळाची पुटं त्यावर पडतात अन् त्या घटनेतला थरार आता रंजक वाटू लागतो. माणसाचं मन कसं असतं पाहा. एखादा माणूस. त्याची भेट ही न विसरण्याजोगी. त्या दिवशी त्यानं ज्या शब्दात, ज्या पद्धतीनं, ज्या लोकांसमोर तुम्हाला अपमानित केलं तो प्रसंग विसरणं कसं शक्य आहे? आजही तो माणूस भेटला, की तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आज तो तुमच्याशी कितीही चांगला वागला, तरी तुमच्या मनातील त्याची प्रतिमा पुसायला मन तयार होत नाही. प्रत्येक भेटीगणिक ती प्रतिमा गडद होत जाते. आठवा जंजीर! काही वेळा एखाद्याच्या एखाद्या अनुभवावर आपण इतके खूष होतो, की त्या व्यक्तीची एक आदर्श प्रतिमा मनात घट्ट होते. इतकी, की तीच व्यक्ती याच प्रतिमेचा लाभ घेऊन तुम्हाला हातोहात फसवून जाते तरी त्यानं ही फसवणूक केली असावी याचा पत्ता लागत नाही. ‘मनं वढाय, वढाय, जसं उभ्या पिकातलं ढोरं’ असं बहिणाबाईनं लिहून ठेवलं. याची अनुभूती तर जागोजागी मिळते. प्रत्येकाला ती घेता येते. मग येतात मन एकाग्र करण्याच्या एकेक पद्धती, मार्ग. योगा सहजसमाधी किवा ध्यानधारणा. साधी गोष्ट आहे. ‘उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म’ असं म्हटलं असतानाही जेवताना आपण जेवत नाही. त्यावेळी टी.व्ही. पाहातो, गप्पा मारतो, विचार करतो, हसतो, रागवतोही. जेवताना केवळ जेवण करावं हे आपल्याला म्हणजे आपल्या मनाला मान्यच नसावं. कधी काळी मला एक गाणं खूप आवडायचं. ‘दिल जोभी कहेगा, मानेंगे हम, दुनियामे हमारा दिलही तो है!’ आज जाणवतंय एका अर्थानं मनाचा तो विजय होता. स्वतःच्या अस्तित्वासाठी मनानं केलेला माझा तो वापर होता. मनाच्या क्षमतांचा, व्यापक क्षमतांचा आपण आपल्याला हवा तसा वापर केला तर? मनानं आपल्यावर राज्य गाजविण्याऐवजी मनावर आपण स्वार झालं तर? मनाची चपळता, मनाची क्षमता, सर्वदूर पोहोचण्याची, भविष्यातलं वास्तवात आणि भूतकाळातलं वर्तमानात आणण्याची त्याची योजकता आपण वापरली तर? विचारा तरी ! मनाशी संवाद साधून तर पाहा!

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..