नवीन लेखन...

बेटी – धनाची पेटी ( सत्य घटनेवर आधारित एक लघुकथा )

नेहमीच्‍या कोपर्‍यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्‍या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्‍हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्‍या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्‍याच्‍या खेळकर स्‍वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्‍याचं लग्‍न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्‍याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्‍ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्‍यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्‍हणाला. पण त्‍याच्‍या बोलण्‍यात उत्‍साह दिसत नव्‍हता.

कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्‍प गप्‍प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्‍प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्‍या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्‍याचं काय आहे, मुलगी झाली म्‍हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्‍पच. त्‍याला समजवत मी म्‍हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्‍हायचं? उलट खूषच व्‍हायला हवं. म्‍हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्‍या मागे लागायला हवं, म्‍हणजे मुलीच्‍या लग्‍नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्‍ट आहे ! त्‍यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्‍हणाला. त्‍याला लग्‍नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्‍या लग्‍नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्‍यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्‍यातून शिल्‍लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे !  मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्‍यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्‍हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्‍लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्‍न करायचं कसं ?’’, साठे व्‍यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्‍न उद्यावर येऊन ठेपलं होतं !

मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्‍या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्‍हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्‍य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्‍हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्‍हाला दोन्‍ही मुलगेच आहेत. जावें त्‍याच्‍या वंशा तेव्‍हां कळे !’’.

खरं म्‍हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्‍स मला नव्‍हता, हे त्‍याला सांगायचं होतं. हल्‍ली मुली मुलांच्‍या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्‍याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्‍यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही  उरलेला रस्‍ता गप्‍पच राहिली.

संध्‍याकाळी साठे ओव्‍हरटाईमला थांबल्‍यामुळे आमच्‍याबरोबर नव्‍हता. साहजिकपणें पुन्‍हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्‍याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्‍हणालो , ‘‘खरं म्‍हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्‍या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ ,  इति पाटील.

पाटील सांगूं लागला, म्हणाला,  ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्‍ला डॉक्‍टरांनी दिला होता. पण ह्या       सद्.गृहस्‍थाला मुलगा हवाच होता, म्‍हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्‍या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्‍यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्‍या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्‍ट म्‍हणजे गर्भपाताच्‍या वेळी ती बाई रक्‍तस्‍त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्‍हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्‍या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्‍वेषानं उद्गारला.  ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्‍हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्‍हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्‍या लिमयेला अगदी धन्‍य धन्‍य झालं असेल!’’ मी म्‍हणालो.  ‘‘हो ना ! त्‍याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्‍वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.

 

”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्‍या या अवस्‍थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्‍हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्‍ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्‍या होतो. पलिकडच्‍या मालतीकाकू त्‍यांच्‍या पुष्‍पाच्‍या बाळाला घेऊन जात होत्‍या. त्‍या आमच्‍याशी बोलायला थांबल्‍या. मी कौतुकानं म्‍हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्‍हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्‍ट लागेल’. मला अस्‍सा राग आला. नंतर मी सुमाला म्‍हटलं सुद्धा, आमची कशी दृष्‍ट लागेल ? आम्‍हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्‍कच झालो . म्‍हटलं , ‘मालतीकाकूंचं  जाऊं दे ;  अल्पशिक्षित म्‍हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्‍सची लेक्‍चरर आहेस ! दृष्‍ट लागणं अन त्‍यातूनही निपुत्रिकेची दृष्‍ट लागणं असल्‍या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्‍हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्‍वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्‍हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्‍वास असो वा नसो, समाज आपल्‍याला अशा गोष्‍टींमध्‍ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्‍याला मूल नव्‍हतं. तेव्‍हां याच बायकांच्‍या बोचर्‍या नजरा मला घायाळ करत, त्‍यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्‍यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्‍यांची बोलणी कां म्‍हणून ऐकून घ्‍यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द  झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली.  मग काळेनं विचार मांडला,   ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्‍या रूढी बदलायला हव्‍यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्‍हणून दुःखी होणार नाहींत”.

*

पाटील अन् काळे नेहमीच्‍या कोपर्‍यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्‍ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्‍थान मिळेल ? आपल्‍यासारखी माणसं त्‍यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.

विचारांच्‍या नादात घर केव्‍हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्‍या गेल्‍या लगेचच  स्‍त्रीस्‍वातंत्र्य-पुरस्‍कर्त्‍या आपल्‍या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.

घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन्  ‘मुलगा व्‍हावा’  म्‍हणून कुठलसं व्रत धरल्‍याचं ती माझ्या बायकोला सांगत होती.  मी ओठावरचे शब्‍द तात्‍पुरते गिळून टाकले.

+ + +

( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).

_ _ _

[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती  दि. ०१.०९.१९९६.

कांहीं बदल  :  १४ फेब्रु. २०१८  ]

= = =

– सुभाष स. नाईक    Subhash S. Naik
मुंबई.
M –  9869002126
eMail  : vistainfin@yahoo.co.in
Website  :  www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com

 

 

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..