नवीन लेखन...

माध्यमातील सुवर्णसंधी

अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टी आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनात आपल्या रोजच्या जीवनात वर्तमानपत्र (मुद्रित माध्यम) रेडिओ (श्राव्यमाध्यम), दूरचित्रवाणी (दृक्श्राव्यमाध्यम) आणि अलीकडच्या गेल्या १०-१५ वर्षांत झपाट्याने जगाला गवसणी घालणारा सोशल मिडिया अर्थात समाजमाध्यम या विविध माध्यमस्रोतांनी मानवी जीवनाचा आणि जगण्याचा चेहरा आमूलाग्र बदलला आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात आणि जीवन वाटचालीत यामुळे प्रगतीचा, कर्तृत्वाचा एक वेगळा यशस्वी आलेख येऊ घातलाय. त्यामुळे समाजाचे सांस्कृतिक आणि व्यावहारिक जीवन हे खऱ्या अर्थाने परिपूर्ण यशस्वी राजपथावर विसावलेय. माध्यमक्षेत्राचे सिंहावलोकन केले तर प्राधान्याने मुद्रित माध्यमाचा (लिखित) विचार करणे, समाजावून घेणे आज काळाची गरज आहे. रोजचे वर्तमानपत्र हा आपल्या नित्य जीवनातला महत्त्वाचा घटक आहे.

संत महंतांच्या वैभवशाली परंपरेतल्या गौरवशाली महाराष्ट्र भूमीबद्दल बोलायचे म्हटले तर दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या रूपाने प्रथमच देशाच्या पत्रकारितेत मराठी वर्तमानपत्र क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकले आणि मराठी वृत्तपत्रकारितेचा नवा अध्याय १९ व्या शतकात सुरू झाला. वाडी, वस्ती, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्व घडामोडी, घटना, प्रसंग, सांस्कृतिक उपक्रम यांची माहिती-बातमी रूपाने आज पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेषकरून वर्तमानपत्र माध्यमामुळे जगाला मिळू लागली आहे. आपल्या राज्याचा विचार केला तर हजारो वर्तमानपत्रे अर्थात दैनिक, मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक हे साहित्यिक विचारांचे धन आज सहस्रावधी प्रकारांनी उपलब्ध झाले आहे. गाव, शहरातल्या छोट्या दैनिकांपासून राज्य-राष्ट्रीय स्तरावरच्या अग्रगण्य दैनिकांची आज आपल्या राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत यशस्वी आणि अभिमानास्पद कारकीर्द यशस्वी झाली आहे. महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि साहित्य सांस्कृतिक परंपरेचे आजच्या घडीला हे मोठे वैशिष्ट्य आहे. अर्थात, भविष्यकाळाचा विचार करता प्रत्येकाला बालपणापासून-प्राथमिक शाळेच्या दिवसापासून-वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. माझे तर याबाबतीत ठाम मत असे आहे की, सामाजिक भान आणि प्रादेशिक ज्ञान वाढवायचे असेल तर रोजची वर्तमानपत्रे घरा-घरात वाचणे नितांत गरजेचे आहे.

मी प्राथमिक शाळेत, रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. ३ मध्ये शिकत असताना आमच्या विलणकर वाडीतील घराशेजारी राहणारे श्री. यशवंत पावसकर हे पेशाने ड्रायव्हर होते. त्यांच्या घरी त्या काळात ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ हे दोन पेपर यायचे. अख्ख्या वाडीत तेच एक घर असे होते की, त्यांच्याकडे रोज वर्तमानपत्र येत असे. आमच्या घरी आर्थिक तुटपुंजीमुळे रोजचा पेपर येणे अशक्य होते. त्या दिवसांत मी शेजारी पावसकरांकडे जाऊन रोज पेपर वाचायचो. तेव्हा मुंबईतील दैनिकाचे अंक एस.टी. ने संध्याकाळी रत्नागिरीत पोहचायचे. सकाळचे पेपर संध्याकाळी-रात्री उशिरा घराघरात मिळत असत. कालांतराने एस.टी. ची रातराणी सेवा सुरू झाली आणि मुंबईची वर्तमानपत्रे रत्नागिरीकरांना सकाळी वाचायला मिळू लागली. बालपणातल्या त्या वर्तमानपत्र वाचनाने मी स्वत:च अपडेट होत गेलो. समाजातल्या छोट्यामोठ्या गोष्टींचे, घटनांचे आकलन होऊ लागले. सभोवतालच्या सामाजिक व्यथा, वेदना, समस्या, विचार, संवेदना यांच्याशी नाळ जुळून आली. सामान्यज्ञानात (जनरल नॉलेज) भर पडली. वाचन छंदाची सुरुवात ही प्रत्येकाच्या जीवनात वर्तमानपत्राने होणे ही आज बौद्धिक क्षमतेसाठी अत्यावश्यक बाब आहे. म्हणूनच वाचाल तर वाचाल ही उक्ती सर्वार्थाने सार्थ आहे.

पुढे गोगटे कॉलेजमधल्या माझ्या महाविद्यालयीन दिवसांत पुढे गोगटे कॉलेजमधल्या माझ्या महाविद्यालयीन दिवसांत “मी दैनिक नवकोकण चा वार्ताहर” पत्रकार म्हणून काम सुरु केले. दैनिकाचे मालक स्व. संपादक बाळ भिसे, कार्यकारी संपादक श्री. गजानन नाईक, यांच्या सावलीत काम करण्याची संधी मिळाली. स्व. बाळासाहेबांनी मला दिलेला पहिला पगार रु.१००/-. ती शंभराची नोट पहिलीवहिली कमाई वृत्तपत्रातल्या नोकरीने मला दिली. त्याच कृतज्ञतेने काम करण्याची सवय लागली. त्यावेळेला खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र जगताची वृत्तपत्रकारितेच्या या महान विश्वाची प्राथमिक ओळख झाली आणि लक्षात आले की, आपली मातृभाषा जर आपणांस परिपूर्णपणे, दर्जेदारपणे लिहिता-वाचता येत असेल तर पत्रकारितेच्या क्षेत्रात चांगले काम घडू शकरते. इथे प्रूफ रीडरपासून वार्ताहर, पत्रकार, संपादक अशा विविध घटकांमध्ये तुम्ही काम करू शकता.

कुणालाही उत्तम वक्ता व्हायचे असेल तर भाषेवर प्रभुत्व अत्यावश्यक आहे. व्यावसायिक आणि लोकप्रिय व्याख्याता म्हणून तुम्हांला नावारूपाला यायचे असेल तर ओघवत्या वक्तृत्वशैली बरोबर रोजची वर्तमानपत्र आणि विविध विषयावरील पुस्तके ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो, हे करणे खऱ्या अर्थाने अनिवार्य आहे. वाचन, लेखनाच्या आवडीमुळे, छंदामुळे अगणित लेखक, साहित्यिक, नाटककार, पटकथाकार, बुद्धिवंत, विचारवंत, कलावंत यांची नवी पिढी सांस्कृतिक आणि साहित्यिक संवर्धनाचे काम आपल्या देशात नव्या उन्मेषाने करीत आहे. जर आपल्याला विविध भाषा अवगत असतील तर आपण भाषांतरकार,अनुवादक, दुभाषी या घटकांमध्येही खूप काही काम करू शकतो. व्यावहारिक जगात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी तुमची भाषासमृद्धी तुम्हांला तुमची वेगळी व्यक्तिगत ओळख देऊ शकते. आज वृत्तपत्रपत्रकारितेचे स्वरूपच बदललंय. पूर्वीची मुद्रण व्यवस्था आणि आत्ताची नव्या तंत्र छपाईची यंत्रणा यात जमीनअस्मानाचा फरक झाला आहे. छपाईतंत्रात विलक्षण नावीन्यपूर्ण बदल झाला आहे. प्रत्येक गाव, शहर आता वर्तमानपत्र प्रतिनिधी, वार्ताहर अर्थात पत्रकार यांनी जोडले गेले आहे. नव्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका क्षणात बातमीचा प्रचार आणि प्रसार वाढला आहे. गतिमानता आली आहे. वार्ताहर पत्रकार या पेशाला चांगला व्यावसायिक दर्जा मिळू लागला आहे. मोबाईलच्या अमर्यादित गरजेमुळे मोबाईलवरून पत्रकारिता करणे सहज शक्य झाले आहे. सेल्फीने तर जगात धुमाकूळ घातला आहे. असे असले तरी वृत्तपत्रकारितेच्या व्यावसायिक क्षेत्रात आजही फोटोग्राफर अर्थात छायाचित्रकार पत्रकार (प्रेस फोटोग्राफर) या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता संगणकावर बातम्या टंकलिखित करण्यापासून मुद्रण तपासण्यापर्यंत सर्वच कार्यपद्धती, हे सर्व घटक ही नव्या रोजगाराची येऊ घातलेली नवी क्षेत्रे आहेत. ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. आपण त्याचा लाभ घ्यायला हवा. त्यामुळे प्रत्येकाचे जीवन, कर्तृत्व निश्चितच समृद्ध होईल.

समाजप्रगतीच्या पाऊलखुणा पाहिल्यावर लक्षात येते मुद्रित माध्यमानंतर माध्यमविश्वातील महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे श्राव्य माध्यम. अर्थात रेडिओ. आपल्या देशाबद्दलच बोलायचे तर असे म्हणता येईल आकाशवाणीने भारताच्या कानाकोपऱ्यात कोट्यवधी सामान्य जनांचे – श्रोत्यांचे मनोरंजन माहितीच्या रूपाने विविध कार्यक्रम, बातम्या यातून केले. यामुळे मोठी सांस्कृतिक क्रांती झाली. झपाट्याने विकसित होत गेलेल्या दूरचित्रवाणीच्या लाटेपुढेही आसेतुहिमाचल अशा भारताच्या कानाकोपऱ्यात, घराघरात रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले. म्हणूनच रेडिओचे महत्त्व आजही तितकेच अबाधित आहे, अनन्यसाधारण आहे.

आपले मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी आकाशवाणीचे महत्त्व ओळखून २०१४ पासून अवघ्या जगात ‘मन की बात’ हा कार्यक्रम सर्वदूर पोहचवला. विचारांच्या सादरीकरणातून विविध योजना, उपक्रम, विकासाचे टप्पे कोट्यवधी भारतीयांनी घरबसल्या ऐकले. आपल्या देशातील अभिजात भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत हे खऱ्या अर्थाने जगवले-जागवले ते आकाशवाणीने. देशातल्या विविध प्रादेशिक भाषामधली त्या-त्या राज्यातल्या आकाशवाणी केंद्रांनी भारतीय संगीताचा हा अनमोल ठेवा प्रसार-प्रचाराच्या रूपाने लोकांपर्यंत पोहचवला.आकाशवाणीतील ध्वनिचित्र मुद्रणापासून कार्यक्रम निर्मितीच्या विविध टप्प्यांवर, विविध घटक आज कार्यरत आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञ, अभियंता, कार्यक्रम निर्माते, निवेदक, वृत्तनिवेदक यांची नवीन पिढी निर्माण होत आहे.

रेडिओ कार्यक्रमामुळे विविध कार्यक्रमांचे लेखन (स्क्रिप्ट रायटिंग) नभोनाट्यलेखन, कार्यक्रम सूत्रसंचालन यांना चांगले दिवस आले आहेत. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात वर्तमान शिक्षण व्यवस्थेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायचे आणि डिग्री खिशात ठेवून कारकुनी करायची हा मध्यमवर्गीय, अल्पसंतुष्ट दृष्टिकोन आता बदलत चालला आहे.

मित्रहो, आकाशवाणीत कार्यक्रम निर्माता, साहाय्यक निर्माता, कार्यक्रम लेखक, निवदेक, वृत्तनिवेदक, वृत्तविभागातील स्टोरी रायटर-संपादक ही विविध पदे रोजगार देणारी आहेत. माध्यमातले हे नवविश्व आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण त्याची माहिती घ्यायला हवी. त्याची ओळख करून घ्यायला हवी. नव्या पिढीच्या शिलेदारांनी स्वतःलाच विचारायला हवे की, आपण ज्या जिल्ह्यात राहतो तिथल्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला आपण कधी भेट दिली काय? ती यंत्रणा समजावून घेतली काय? या विश्वाची ही ओळख नव्या पिढीने करून घ्यायला हवी. माझ्या उमेदीच्या दिवसांत, गद्धेपंचविशीच्या त्या विलयांकित वेगळ्या दिवसांत हे सारे अनुभवण्याचे भाग्य मला आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने दिले. सन १९८२ ते१९८५ या कालावधीत मी तिथे कॅज्युअल मराठी अनाऊन्सर (हंगामी मराठी निवेदक) म्हणून काम केले. महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट अर्थात पगार रु. १८० – मिळायचा. टाईप कॉन्ट्रॅक्टमध्ये सरकारी उल्लेख सहा दिवसांचा, काम मात्र महिनाभर करायचे (आजही सहा दिवसांचे महिना कॉन्ट्रॅक्ट ही पद्धत आकाशवाणी दूरदर्शनमध्ये सन्मानपूर्वक चालू आहे.) करायला लागायचे. पण एक मात्र खरे की, खऱ्या अर्थाने समाजाच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख मला आकाशवाणी रत्नागिरी केंद्रामुळे लाभली. या शिदोरीवरच पुढे आयुष्याच्या वाटचालीत मी मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम निर्मिती नोकरीत सहजपणे काम करू शकलो. आपल्याला आकाशवाणीतील कार्यक्रम निर्मिती आणि वृत्तविभागात आज विविध पदावर काम करता येऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. तुमची भाषा चांगली असेल, भाषा सादरीकरणाची शैली वेगळी असेल, लेखनाचे वेगळेपण असेल तर निश्चितच आकाशवाणीत एक वेगळे करिअर घडू शकते. माझ्या बेछूट आणि बेधडक पंचविशीतल्या तरुणपणाला जगात विधायक पद्धतीने खूप काही करण्यासारखे आहे, याची जाणीव मला प्रथम आयुष्यात करून दिली ती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने.

काळाच्या ओघात दूरचित्रवाणीचे आगमन झाले. टेलिव्हिजन संच अर्थात टी.व्ही. हा प्रत्येक कुटुंबाचा एक अपरिहार्य घटक झाला. देशात १९५१ पासून कृषी कार्यक्रमांनी दिल्ली दूरदर्शनचा प्रारंभ झाला. कृष्णधवल छायाचित्रण असणाऱ्या टी.व्ही. संचातल्या त्या कार्यक्रमाला पर्यायाने टी. व्ही. ला ‘इडियट बॉक्स’ म्हणून हेटाळणीसुद्धा झेलावी लागली. मात्र, पुढे देशाच्या सांस्कृतिक परंपरेत दूरदर्शनने आमूलाग्र बदल केला. भारताच्या ग्रामीण भागातल्या सांस्कृतिक लोकजीवनाचे खरेखुरे दर्शन दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांना घडू लागले. दूरदर्शन कार्यक्रम विभाग, दूरदर्शन वृत्तविभाग यामध्ये नोकऱ्या उपलब्ध झाल्या. साहाय्यक निर्माता, कार्यक्रम लेखक, सूत्रसंचालक, निवेदक, डबिंग कलाकार, वृत्तविभागात वृत्त निवेदक-संपादक, वार्ताहर रिपोर्टर, कॅमेरामन, संकलक (एडिटर), साऊंड रेकॉर्डिस्ट, लाईटिंग एक्स्पर्ट, नेपथ्यकार, मेकअपमन हे आणि इतर अनेक रोजगार घटक आज व्यावसायिक नोकरीसाठी उपलब्ध आहेत.

लेखनमर्यादेमुळे सर्व तपशील सांगणे अशक्य असले तरी मी एका कलावंत व्यक्तिमत्त्वाचा आवर्जून उल्लेख करेन ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचा लोकप्रिय सूत्रसंचालक, मुलाखतकार, निवेदक सुधीर गाडगीळ. पुणेरी मिश्कील स्वभावाच्या सुधीरने ‘केसरी’ तील नोकरी धाडसाने सोडली आणि पूर्ण वेळ मुलाखतकार निवेदक या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. मराठी कार्यक्रम क्षेत्रात सूत्रसंचालन, निवेदन याला व्यावसायिक दर्जा देण्याचे काम खऱ्या अर्थाने सुधीर गाडगीळ या निवेदक कलावंताने केले. त्याने सिद्ध करून दाखवले की, भाषा आणि वक्तृत्व यांच्या प्रभुत्वाने आपण आपल्या आयुष्याचा चरितार्थ बिनबोभाट चालवू शकतो.

मित्रहो, घेण्यासारखे खूप आहे. आपण किती आणि कसे घेतो यावरच आपले भवितव्य अवलंबून आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनात मुंबई दूरदर्शनच्या माझ्या कार्यक्रम निर्मिती विभागातील त्या कलासक्त नोकरीने मला खऱ्या अर्थाने राज्याच्या, देशाच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख झाली. विविध वैभवी कलाक्षेत्रांचा आनंद घेता आला. समाजातल्या विविध घटकांना भेटता आले. समाजातल्या सामान्य कष्टकरी माणसापासून असामान्य महनीय व्यक्तींना जवळून पाहता आले. व्यासंगी, बुद्धिमान, महान व्यक्तिमत्त्वांना जाणून घेता आले. माझ्या जीवन वाटचालीतील माझी सांस्कृतिक शिदोरी समृद्ध झाली ती मुंबई दूरदर्शनमुळेच. मुंबई दूरदर्शन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक देव्हारा आहे. म्हणूनच मित्रहो, दूरचित्रवाणी हे माध्यम आपण समजावून घेतले पाहिजे. त्यातील रोजगाराच्या विधायक वाटा आपण शोधल्या पाहिजे. या छोट्या पडद्यामागे मोठ्या कर्तृत्वाचा यशस्वी राजपथ आहे.

आज अवघे जग मोबाईल या एका संकल्पनेभोवती वेढले गेले आहे. संगणकाने महान क्रांती केली. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती याची जागा आता पर्याय म्हणून माहितीच्या तंत्रज्ञान विश्वाने घेतली. गुगलसारख्या अगणित अपने मानवी जीवन झपाट्याने बदलले. अवघे जग खूप जवळ आलेय. गतिमानतेची एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडीत सोशल मिडियाने समाजव्यवस्थेचा संपूर्ण ताबा घेतला आहे, असे म्हटले तर चुकीचे भाष्य होणार नाही, वावगे ठरणार नाही. विविध विषयावरील माहिती आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या गतिमान सोशल मिडियामुळे क्षणाचा विलंब न लागता जगात पोहचू लागली आहे. सोशल मिडियाचे एक नवे दालन उपलब्ध झाले आहे. विविध पोर्टल आणि वेबसिरीजने तुम्हां-आम्हां सर्वांना एक वेगळे आकर्षण दिले आहे. अर्थात अतिरेकी वापर, पर्यायाने मानसिक व्यसनाधीनता ही नवी समस्या, हा नवा आजार सर्वच जगाला भेडसावू लागला आहे. असे असले तरी जे जे उदात्त, ते ते घ्यावे, या सूत्राने आपण सोशल मिडीयाकडे पाहिले पाहिजे. यातल्या रोजगाराच्या वैविध्यपूर्ण संधी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. तिथले नावीन्यपूर्ण घटक, त्यांचे तंत्रज्ञान कालानुरूप अवगत करून घेणे, ही भविष्यकाळातील आत्यंतिक अपरिहार्य बाब आहे. ती स्वीकारायला हवी.

मुद्रित माध्यम (वर्तमानपत्र), श्राव्यमाध्यम (आकाशवाणी), दृक्श्राव्य माध्यम (दूरचत्रवाणी)दूरदर्शन या तीनही क्षेत्रात भविष्यकाळात करिअर करण्यासाठी उत्तम रोजगाराची संधी आहे. सुदैवाने माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत दैनिक नवकोकण, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्र या तिन्ही माध्यम यंत्रणात मला काम करायला मिळाले, खूप काही शिकायला मिळाले. म्हणूनच या माध्यमांचा मी आजन्म ऋणी आहे. युवा पिढीच्या तमाम शिलेदारांनो, भविष्यात या माध्यमातील सुवर्णसंधींचा तुम्हां सर्वांनी लाभ घ्यायला हवा.

-जयू भाटकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..