निसर्गाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आयुष्यात एकदा तरी डांग बागलाणात जायलाच हव. सटाणा तालुक्यातील डांग भाग निसर्गाने पुर्णत: वेढलेला आहे. ह्या भागातील प्रामुख्याने डांगसौंदाणे, तताणी, केळझर, वग्रीपाडा, बारीपाडा, साकोडे, भावनगर, करंजखेड, घुलमाळ, तर ईकडे चाफ्याचे पाडे, किकवारी ह्या गावांना निसर्गाची जी देणगी लाभलेली आहे ती इतर कुठेच नाही. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका तसा सर्वगुण संपन्न. ह्या तालुक्याला धार्मिक व ऐतीहासिक महत्व तर आहेच पण त्याबरोबरच तुम्हाला खरोखर निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला डांग बागलाणात फिरायलाच हव. सटाण्यापासुन अवघ्या २१ किलोमीटर अंतरावर डांगसौंदाणे हे बाजारपेठेचे गाव. ह्या गावापासुन बागलाणचे निसर्गरुपी वैभव बघायचे असेल तर तुम्हाला थेट डांगसौंदाणे ते केळझर मार्गाने सरळ बारीपाडा तर ईकडे साकोडे ते करंजखेड मार्गाने सरळ घुलमाळ पर्यंतचा परीसर फिरायला हवा. मुळातच येथे पर्जन्यमान जास्त असल्याने पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असतेच पण खरी मजा येथे हिवाळ्यातच असते. हिवाळ्यात येथील जंगली भागात अनेक विविधरंगी फुलांचा जो अविष्कार बघायला मिळतो तो बहुदा नाशिक जिल्ह्यात तरी ईतर कुठेही नसावा. अनेक विवीध जातीच्या फुलझाडांबरोबरच मोठमोठाली आंब्याची झाडे तसेच अगदी जुनाट अशा वटवृक्षांनी व विविध प्रकारच्या भव्य दिव्य अशा वेगवेगळ्या झाडांनी येथील परीसर अजुनच खुलुन दिसतो. रस्त्यावरुन जातांना द-या खो-यांत तसेच डोंगरबा-यांवर नजर टाकली तर अनेक मोर, काळतोंडी माकडे, रानमांजरी व इतर अनेक पशुपक्षी व प्राणी हमखास नजरेस पडतात. तर बिबट्या, लांडगा, कोल्हा व वाघ यांसारखी अनेक जंगली श्वापदे देखील अनेकदा दिसुन येतात. फिरत असतांना कोणतेही गाव लागले तरी त्या गावात झाडांची संख्या इतकी प्रचंड व दाट आहे की ते गाव जणु झाडांच्या गर्द छायेत झाकले गेले असावे असा भास होतो. ह्याच भागाला बागलाणातील कोकण असे देखील म्हटले जाते. येथील लोकजिवनाचा आभ्यास केला तर प्रकर्षाने जाणवते की येथील लोकसंखेत आदिवासी व कोकणी समाजाच्या बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. येथील लोकांचा पेहराव व वेशभुषा देखील रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार कोकणी बांधवांच्या पेहरावाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे आपण नक्की कोकणात आलोय की काय हा प्रश्न पडतो. येथील लोककला देखील वाखाणण्याजोगी आहे. डोंग-यादेवाचा उत्सव म्हणजे येथील प्रमुख उत्सव मानला जातो. हा उत्सव देखील बघण्यासारखा असतो. ह्या भागात तुम्हाला चुकुनही कुठेही सिमेंट काँक्रेटचे रंगीबेरंगी घरे दिसणार नाहीत. दिसतील ती फक्त कौल व कुडाची घरे. ह्या घरांचे देखील एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घरात प्रवेश करतांना तुम्हाला वाकुनच जावे लागेल. प्रथम दर्शनी घराबाहेर एक सुसज्ज अशी वसरी व ह्या वसरीतच सर्व देवदेवतांची फोटो लावलेली दिसतात तर फोटोंच्या खाली घरात घुसण्याचे मुळ प्रवेशद्वार. ह्या दाराची उंची देखील अगदी कमी त्यामुळे वसरीतुन घरात घुसतांना आपोआपच वाकुन जावे लागते त्यामुळे न सांगताच सर्व देवांसमोर वाकुन पुढे गेल्याने देवदेवतांबरोबरच घरातील वडीलधा-या माणसांचाही मान राखला गेल्याची भावना मनाला स्पर्शुन जाते. घरात गेल्यावर तुम्हाला दिसतील त्या कुडाच्या भिंती तर त्या भिंतींना चिखलमातीचा मुलामा. तर खाली शेणाने सारवलेला स्वच्छ असा घरातील संपुर्ण परीसर. वर छतावर नजर टाकली तर छत पुर्णत: कौलाचे. घरातील भिंतींना कुठल्याही प्रकारच्या केमीकल युक्त रंग दिलेला आढळत नाही. दिसलाच तर तो नैसर्गिक रंग दिलेला आढळतो. पण बहुदा त्या घरातील भिंती चिखलमातीनेच सारवलेल्या दिसतात. एवढे असुनही त्या घरांमधे प्रचंड अशी स्वच्छता बघुन मन प्रसन्न होते. त्या घरांमधे मन अगदी रमुन जाते. ह्या भागातील लोकांच्या मनात घरी येणा-या पाहुण्यांविषयी खुपच प्रेम. जर तुम्ही ह्या घरात पाहुणे म्हणुन गेलाच तर येथील लोकांचा प्रचंड आग्रह बघुन तुम्हाला येथे जेवणासाठी थांबावेच लागेल. येथील पाहुणचार देखील ठरलेला असतो. अस्सल गावराण कोंबडीचे चिकन व भाकरी ते ही चुलीवर शिजवलेले.आणि सोबतीला मातीच्या मडक्यातील शुध्द दही खातांना तर संपुर्ण जगाचा विसर पडतो. नक्कीच येथील जेवणाचा स्वाद घेतांना आपण आयुष्यात अगदी कमी वेळेस एवढे अप्रतीम जेवण जेवल्याची प्रचीती येते. आपल्या पुर्वजांची अगदी जुनी संस्कृती आजच्या काळात देखील येथील जनतेने टिकवुन ठेवलेली आहे. ह्याच भागात कै.गोपाळ मोरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले केळझर येथील गोपाळ सागर हे धरण. तर धरणाजवळुन साल्हेर, तिळवण, मांगीतुंगी येथील इतीहासकालीन गड किल्ले देखील दृष्टीस पडतात. हा सर्व परीसर फिरतांना येथुन कदापी निघुच वाटत नाही एवढा हा भाग विलोभनीय आहे. तेव्हा आपल्या सटाण्यापासुन अगदी जवळ असलेल्या ह्या भागात प्रत्येकाने आपल्या घरी येणा-या पाहुण्यांना हा भाग बघण्यासाठी एकदा तरी जाऊन फेरफटका नक्की मारावा म्हणजे बागलाणातील ह्या कोकणाचे महत्व जगाला कळु शकेल.
– श्री यशवंत निंबा सोनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३
Leave a Reply