अप्रिय कोरोना,
तुझ्या जन्माला आता सहा महिने उलटून गेली आहेत. एखाद्या जीवाच्या वाढीसाठी सहा महिने हा खर तर फार मोठा कालावधी नाहीये. पण या सहा महिन्यात तुझी वाढ मात्र अपेक्षेपेक्षाही फारच झपाट्याने झाली. खरतर तुझी पिढी दर पिढी रोजच जन्माला येत आहे असे प्रकर्षाने जाणवत आहे. तुझ जन्माला येण आणि अस सारखच वृद्धिंगत होत राहण कोणालाच फारस आवडलेल नाहीये.
तुझा जन्म नेमका कसा झाला याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी की नैसर्गिक हे तुलाच माहीत. पण तुझा जन्म मानवी चुका मधून झाला किमान एव्हढे तरी नक्की मानायला काही हरकत नाही. मानवी चुकांमधून जन्माला आलास म्हणून समस्त मानव जातीवर एवढा प्रचंड सुड उगवशिल असे मात्र अजिबात वाटले नव्हते. संपूर्ण जगात चार लाखांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेऊनही तुझी भूक मात्र अजूनही थांबलेली दिसत नाही. अर्थात मानवी चुकांमधून घडलेली कुठलीच गोष्ट फलदायी नसते म्हणा. पण आता चूक झालीच आहे तर चूक सुधारणे सुद्धा भाग आहे.
स्पष्टच बोलायच म्हणजे आता तुझा कायम स्वरूपी बंदोबस्त करायला हवा. मानव जातीविरुद्ध पुकारलेल्या युद्धात आजघडीला तुझे पारडे भलेही जड असेल पण आम्ही अगदीच हार मानलेली नाहीये. तू आजपर्यंत जेवढ्या जणांवर हल्ला केलास ते सर्वच जण धारातीर्थी पडले असे देखील काही नाहीये. त्यापैकी बरेच जण बचेंगे तो और भी लढेंगे अस म्हणत तुझ्याविरुद्ध नेटाने लढले आणि तुला मात देखील दिली. जगात जिथे जिथे तुझ्यात आणि मानवात संघर्ष सुरू आहे त्यापैकी बरेच ठिकाणी तुझे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. तुला संपवण्याचा अंतिम रामबान उपाय भलेही अजून सापडलेला नाही पण तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी सध्या आम्ही वापरत असलेले बचावात्मक तंत्र यशस्वी होताना बघून आम्हाला परत परत लढण्याची प्रेरणा देत आहे. पण जेव्हा आम्हाला अंतिम रामबाण उपाय सापडेल तेव्हा तू बचावात्मक भूमिकेत आणि आम्ही हातात शस्त्र घेऊन उभे असु हे लक्षात ठेव.
तू एकमेव असा जीव नाहीयेस जो मानव जातीवर संकट बनून चालून आलास. तुझ्या आधीही तुझ्या सारखेच काही सूक्ष्म जीव संकट बनुन प्रहार करत होते पण वेळोवेळी मानवाने त्या सर्वांना मात दिली. त्यामुळे तुलाही एक दिवस हार पत्करावी लागणार हे नक्की.
पत्रलेखन संपवताना एका गोष्टीत मात्र तुझे नक्की आभार मानायची इच्छा आहे. तू भलेही मानवी चुकातून जन्माला आला आहेस पण तुझ्या विरुद्धच्या लढाईने मानवाला त्याच्या इतरही चुका दाखवून द्यायला भाग पाडले. त्यामुळे तू भलेही आमचा शत्रू असलास तरीही मानवाच्या इतर चुका समजून घेण्यासाठीचे तू एक मोठे निमित्त देखील ठरला आहेस.
आता लिखाण थांबवतो.
कळावे आणि दुरूनच नमस्कार असावा.
एक कॉमन मॅन…….
— राहूलकुमार गोपाळराव बोर्डे
Leave a Reply